टिपू सुलतान : आख्यायिका आणि वास्तव

21 Feb 2026 19:03:08

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची टिपू सुलतानशी केलेली तुलना आणि नंतर मागितलेली माफी, मालेगावच्या उपमहापौरांनी टिपू सुलतानचा दालनात फोटो लावण्यावरुन झालेला वाद आणि काल पुन्हा काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी ‌‘टिपू सुलतान यांनी शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आपले कार्य केले,‌’ असे केलेले वादग्रस्त विधान पाहता, टिपू सुलतान हा खरंच कोणी तरी महान शासक होता, अशा उदात्तीकरणातून फसव्या प्रतिमानिर्मितीचे प्रयत्न मागील काही दिवसांत महाराष्ट्राने पाहिले. पण, खरंच टिपू कसा होता? टिपूने केलेल्या हिंदूंच्या कत्तली, धर्मांतरे, मंदिरांचा विद्ध्वंस, त्याचा महिलांचा जनानखाना याविषयी खराखुरा इतिहास काय सांगतो? याचा समग्र आढावा घेणारा इतिहास संशोधक, लेखक सत्येन वेलणकर यांचा ऐतिहासिक संदर्भ आणि तपशीलांवर आधारित हा माहितीपूर्ण लेख...

टिपू सुलतान हा पाकिस्तानातील लोकांसाठी आदराचा विषय आहे. त्यांचा त्याच्या विषयीचा हा आदर स्वाभाविकच. कारण, टिपू सुलतान इस्लामसाठी जगला आणि इस्लामसाठीच मेला. इस्लामाबादमधील एका रस्त्याला त्याचे नाव देण्यात आले आहे आणि पाकिस्तानने आपल्या एका क्षेपणास्त्रालादेखील टिपूचे नाव दिले आहे. भारतातदेखील टिपूचे प्रशंसक आहेत. टिपूला स्वातंत्र्यसैनिक, उदारमतवादी, सहिष्णू आणि प्रबुद्ध शासक मानणारा एक गट भारतात आहे. तर, काहीजण तो धर्मांध, सामूहिक हत्याकांडे करणारा आणि स्त्रियांवर अत्याचार करणारा होता, असे मानतात. तो नक्की कसा होता आणि त्याच्या सल्तनतीचा हेतू तरी काय होता, हे चार मुद्द्यांच्या अनुषंगाने जाणून घेता येईल. हे चार मुद्दे पुढीलप्रमाणे :

1) टिपू सुलतानाची उक्ती आणि कृती

2) टिपू सुलतानाच्या बाजूच्या समकालीन लोकांनी त्याच्याविषयी करून ठेवलेल्या नोंदी

3) टिपू सुलतानाच्या शत्रूंनी त्याच्याविषयी करून ठेवलेल्या नोंदी
4) तुलनेने तटस्थ म्हणता येतील, अशा समकालीन लोकांनी त्याच्याविषयी केलेल्या नोंदी

टिपू आणि मुसलमानेत्तर

टिपूकडे अनेक तलवारी होत्या. त्यांपैकी त्याच्या मसनदीजवळ ठेवली जाणारी त्याची खास तलवार, 1799 साली टिपू मारला गेल्यावर इंग्रज सैन्याचा क्वाटर्र मास्टर जनरल मेजर ॲलन याने गव्हर्नर मार्किस वेलस्ली (लॉर्ड मॉर्निंग्टन) याला इंग्रज सैन्याच्या वतीने भेट दिली. त्या तलवारीवर पुढील आशयाचा मजकूर ‌‘फारसी‌’ भाषेत कोरलेला आहे :

“माझी विजयी तलवार ही काफिरांच्या म्हणजे हिंदू आणि इतर मुसलमानेत्तरांच्या नाशाकरिता असलेली वीज आहे. हैदरने काफिरांचा नाश केला. अल्ला काफिरांविरुद्ध आम्हाला साहाय्य कर, जो मुहम्मदी धर्माचा म्हणजे इस्लामचा उत्कर्ष करतो, त्याला विजयी कर; जो मुहम्मदी धर्म नाकारतो, त्याचा नाश कर.” (संदर्भ :- History of Mysore, C. Hayavadana Rao, Vol 3, pp.1072-73)

टिपूने त्याच्या तलवारीवर कोरून घेतलेला हा मजकूर ही केवळ त्याने मारलेली बढाई होती की, तो त्याप्रमाणे खरेच वागत असे, ते आता पाहू.

1799 साली टिपूच्या पराभवानंतर त्याच्या राजवाड्यात इंग्रजांना त्याने विविध अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रांच्या स्थळप्रती नकलून ठेवलेले एक रजिस्टर मिळाले. त्यात फेब्रुवारी 1785 ते डिसेंबर 1793 या काळातील तारखांची सुमारे दोन हजार पत्रे आहेत. कर्नल विल्यम कर्कपॅट्रिक याने त्या पत्रांपैकी 435 पत्रांचा इंग्रजी अनुवाद केला आहे. तो त्याने दिलेल्या विस्तृत टीपांसह ‌‘सिलेक्ट लेटर्स ऑफ टिपू सुलतान‌’ या नावाने 1811 साली प्रसिद्ध झाला.

या संग्रहात टिपूने त्याच्या सैन्यातील अधिकारी झैनुल आबिदीन याला दि. 17 सप्टेंबर 1785 रोजी लिहिलेले एक पत्र छापलेले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे :
“अलीकडेच आम्हाला म्हणजे टिपू सुलतानाला कळविण्यात आले आहे की, कोडगांनी म्हणजे कुग लोकांनी जफराबाद येथे काही आगळीक केली आहे, म्हणून तुम्हाला तुमची ‌‘कुशून‌’ म्हणजे ‌‘ब्रिगेड‌’ व दोन तोफा यांच्यासह तिथे पाठवावे, असे आम्ही सैन्याच्या बख्शीला लिहिले आहे.

तुमच्या कुशूनच्या पगारापोटी तुम्हाला दोन हजार बहादुरी होन आणि जखमी होतील त्या सैनिकांना भरपाई म्हणून देण्याकरिता एक हजार रुपये आगाऊ द्यावेत, असाही हुकूम त्याला दिला आहे. उस्मानखानाच्या कुशूनमधील ज्या सैनिकांवर भरवसा ठेवता येणार नाही, त्यांच्यावर पहारा करण्याकरिता सैनिक ठेवून तुम्ही हुकुमाप्रमाणे जफराबादला जावे, तेथील फौजदार झैनुल अबिदीन महादवी याला आम्ही लिहिलेले पत्र सोबत जोडले आहे.

तुम्ही त्याच्या सहयोगाने कोडगांवर हल्ला करावा. त्या सर्वांना ठार मारल्यावर किंवा कैद केल्यावर ठार मारलेले व कैद केलेले या सर्वांना बायका-मुलांसह मुसलमान करा (म्हणजे त्यांची सुंता करा) फारसी - “कुर्गेहा रा थाया ब-तेग आवरदे व कत्ले आम नमुदे व दस्तगीर साख़्त कसानीके कुश्ता शुदंद व कसानी के असीर शुदंद माए जन ओ बच्चा हमा हा रा मुसलमान नुमायंद.” सारांश- त्यांना पुन्हा बंड करता येऊ नये, अशाप्रकारे कारवाई करावी. (संदर्भ :- ‌‘सिलेक्ट लेटर्स ऑफ टिपू सुलतान‌’, विल्यम कर्कपॅट्रिक, Letter No. CXVII (pp. 150-51)

ठार मारलेल्या आणि कैद झालेल्या सर्वांना बायका-मुलांसकट मुसलमान करा म्हणजे त्यांची सुंता करा, असे टिपू सांगत आहे. ती अनुवादकाची चूक नाही. अनुवादक विल्यम कर्कपॅट्रिक यानेदेखील मुद्दाम तळटीप देऊन तसा खुलासा केला आहे आणि मूळ फारसी वाक्यच तिथे उद्धृत केले आहे.

हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्या नोकरीत असलेल्या आणि या दोघांनाही जवळून पाहिलेल्या मीर हुसैन अली वलद सय्यीद अब्दुल कादिर किरमानी याने आपल्या ‌‘निशान-इ-हैदरी‌’ या आपल्या ग्रंथात टिपूच्या राज्याचे उद्दिष्ट काय होते, ते सांगितले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे :

“त्या हजरतांना म्हणजे टिपू सुलतानाला ब्राह्मण व इतर हिंदू जातींविषयी अत्यंत तिटकारा होता; ते इस्लामच्या लोकांखेरीज म्हणजे मुसलमानांखेरीज इतर कोणालाही आपले मानत नसत. कोणत्याही प्रकारे इस्लामच्या लोकांचे पालन, हाच हेतू त्यांच्या दृष्टीसमोर असे. ” (संदर्भ :- ‌‘निशान-इ-हैदरी‌’ फारसी पाठ, पृ. 371-72; इंग्रजी अनुवाद - History of the reign of Tipu Sultan, pp. 230-32)
टिपू आणि त्याने जबरदस्तीने

केलेली धर्मांतरे

टिपूने बद्रुझ्झमानखान या आपल्या अधिकाऱ्याला दि. 19 जानेवारी 1790 रोजी लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. त्यामध्ये टिपू त्याला लिहितो की,

“आम्ही मलबार(सध्याचा केरळ)मध्ये नुकताच मोठा विजय मिळवून चार लाख काफिरांना म्हणजे हिंदूंना मुसलमान केले आहे. आता विलंब न लावता, आम्ही शापित रामा नायर याच्याविरुद्ध कूच करणार आहोत. अल्लाच्या कृपेने व प्रेषिताच्या साहाय्याने त्याला म्हणजे रामा नायरला व त्याच्या प्रजाजनांना लवकरच मुसलमान करण्यात येईल.” (संदर्भ : The Asiatic Annual Register, Vol.XII, p.395 (Letter No. XXV)

“मी मलबारमधील चार लाख हिंदूंना मुसलमान केले आहे,” असे टिपू स्वतःच त्याच्या पत्रामध्ये सांगतो. त्याच्यावर अविश्वास का दाखवावा? दक्षिणेतील विविध राज्यांमधील मुसलमानांच्या लोकसंख्येची टक्केवारी पाहिली, तर तामिळनाडूमध्ये ती सहा टक्के आहे, कर्नाटकात ती सुमारे 13 टक्के आहे आणि केरळमध्ये मात्र ती जवळजवळ 27 टक्के आहे. ही टिपूने केरळला दिलेली देणगी आहे, असे म्हणावे लागते.

नाना फडणवीसांनी महादजी शिंद्यांच्या माहितीकरिता दि. 5 सप्टेंबर 1784 रोजी पाठविलेले एक पत्र उपलब्ध आहे, हे पत्र गो. स. सरदेसाई यांनी ‌’Historical Papers Relating to Mahadji Sindia' या पुस्तकात पृ. 442-444 वर छापले आहे (पत्र क्रमांक 331)

या पत्रात टिपूने नूरमुहम्मद खान याला लिहिलेले एक पोटपत्र उद्धृत केले आहे. त्या पोटपत्रात पुढील उल्लेख आहे ः

“एके दिवशी 50 हजार हिंदू बायका-मुलेसुद्धा बाटवून मुसलमान केले. अशी गोष्ट पूव पातशाह व वजीर मोठमोठे जाले; परंतु जाली नाही, परंतु खुदाचे फजलेकरून जाली.”

नूरमुहम्मद खान हा पुण्याला पेशव्यांच्या दरबारात टिपूचा वकील म्हणून कार्यरत होता. याखेरीज इतर अनेक समकालीन साधनांमध्ये टिपूने, त्याने चढाई केलेल्या विविध प्रदेशांमध्ये केलेल्या धर्मांतराचे भयानक आकडे आढळतात. यामध्ये इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच आणि टिपूच्या नोकरीत असलेल्या त्याच्या नोकरांनी लिहून ठेवलेल्या वृत्तांतांचा समावेश आहे.

टिपूने केलेला मंदिर विध्वंस

टिपूने 1789 साली मलबार(सध्याचे केरळ)मधील मोहिमेत चर्च आणि देवळे पाडल्याचे उल्लेख बार्तोलोमिओ या पोर्तुगीज पाद्य्रीच्या वृत्तांतात म्हटले आहे. (संदर्भ : Voyage to the East Indies, p.141) या मोहिमेतच टिपूने, “मी आठ हजार देवळे पाडली आहेत,” असे उद्गार काढल्याचे इंग्रज अधिकारी लेफ्टनंट कर्नल मार्क विल्कस्‌‍ याने नमूद केले आहे. (संदर्भ : Historical Sketches of the South of India, Vol. II, pp. 331-32)

टिपूने मोठ्या प्रमाणावर देवळांचा विध्वंस केला असला, तरी तो तितकाच अंधश्रद्धाळूदेखील होता. टिपू ज्या देवळांना घाबरत असे, ती तीन देवळे म्हणजे श्रीरंगपट्टण येथील रंगास्वामीचे देऊळ, मेलकोटे येथील देऊळ आणि कोइंबत्तूर येथील मेल चिदंबरम मंदिर.

फ्रान्सीस बुखानन हा एक स्कॉटिश डॉक्टर होता. टिपूचा पराभव केल्यानंतर त्याला दक्षिण भारताचा सर्व्हे करायच्या कामावर नेमण्यात आले. त्याने आपल्या सर्व्हेदरम्यान आलेल्या अनुभवांवर - ‌’Journey from Madras through the Countries of Mysore, Canara and Malabar (1807)' हे पुस्तक लिहिले, त्या पुस्तकाच्या दुसऱ्या खंडाच्या पृ. 251 वर तो लिहितो ः

“टिपूने जेव्हा आपल्या राज्यातील सर्व देवळे पाडून टाकण्याचे फर्मान काढले, तेव्हा त्यामधून वरील तीन देवळांना वगळण्यात आले.”

तिसऱ्या ॲग्लो-म्हैसूर युद्धानंतर टिपूला आपले जवळजवळ अर्धे राज्य गमवावे लागले. आपला नाश आता जवळ आला आहे, हे लक्षात आल्यानंतर हल्लीच्या काही राजकीय पुढाऱ्यांप्रमाणेच तोदेखील अंधश्रद्धेपोटी देवळांना देणग्या दे, श्रुंगेरीच्या शंकराचाऱ्यांना आपल्या शत्रूंच्या नाशासाठी जप करायला सांग, अशा गोष्टी करू लागला.

टिपूच्या या अवस्थेचे यथार्थ वर्णन इंग्रज अधिकारी विल्कस्‌‍ याने केले आहे. ‌’Historical sketches of the South of India' या आपल्या पुस्तकाच्या पहिल्या खंडाच्या पृ. 254-55 वर तो लिहितो,

“मुसलमानांमध्ये सर्वात धर्मवेडा असलेला आणि हिंदू धर्म आणि त्या धर्मातील आचार्य असलेल्या ब्राह्मणांबद्दल उघड द्वेष आणि तिरस्कार बाळगणारा, त्यांची देवळे पाडणारा आणि मठ अपवित्र करणारा असा टिपू, जेव्हा संकटात येतो, तेव्हा त्याच लोकांना आपल्यासाठी जप करायला सांगतो. टिपूचे हे वागणे म्हणजे उद्दाम धर्मवेड आणि भीतीयुक्त अंधश्रद्धा, दुसऱ्या धर्माबद्दल असलेली असहिष्णुता आणि संकटाची वेळ आल्यावर ज्यांच्यावर अत्याचार केले, त्यांच्याबद्दल सोयीस्करपणे दाखवलेला आदर याचे विलक्षण उदाहरण आहे.”

टिपूचा जनानखाना

छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू आणि औरंगजेबाच्या नोकरीत असलेला खाफीखान त्यांच्या आपल्या ‌‘मुन्तखबुल्लुबाब‌’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहितो,

“एखादी हिंदू किंवा मुसलमान स्त्री शिवाजीच्या सैनिकांच्या हाती पडली, तर तिच्याकडे वाईट नजरेने बघायची कोणाचीही हिंमत होत नसे. ” (संदर्भ:- ‌‘मुन्तखबुल्लुबाब‌’, फारसी, खंड 2, पृ. 118.)

टिपू मात्र आपल्या कब्जात आलेल्या स्त्रियांना आपल्या जनानखान्यात डांबण्यासाठी कुप्रसिद्ध होता. टिपूच्या सैन्याने 1785 साली नरगुंदच्या किल्ल्याला वेढा दिला, त्यावेळी नरगुंदच्या किल्ल्याचा मराठी ब्राह्मण किल्लेदार काळोपंत पेठे याने आपल्याला आणि आपल्या परिवाराला काही इजा न करता तेथून जाऊ दिले जाईल, या अटीवर किल्ला टिपू सुलतानाच्या हवाली केला. टिपूने साहजिकच आपला शब्द पाळला नाही आणि त्याने काळोपंत पेठ्याला कैद केले आणि काळोपंताच्या अत्यंत सुंदर आणि विवाहित मुलीची रवानगी आपल्या जनानखान्यात केली. (संदर्भ : Memoirs of Hyder and Tippoo, page 37; Historical Sketches of the South of India, Vol. II, pages 286-87; Nishane Haidari, Persian text, page 289, Eng. Tr. - The History of the Reign of Tipu Sultan, page 65)

दि. 2 जुलै 1800 रोजी कॅप्टन मॅरियट याने टिपूच्या जनानखान्याची पाहणी करून एक अहवाल मद्रास सरकारला सादर केला. त्या अहवालानुसार :

टिपूच्या जनानखान्यात एकूण 601 व्यक्ती होत्या. यापैकी हैदर अलीच्या 268 बायका आणि रखेली आणि टिपूच्या 333 बायका आणि रखेली होत्या.
अहवालाच्या पुढच्या विभागात दोघीजणींचे वगकरण ‌‘टिपूच्या बायका‌’ असे केलेले आहे, 80 जणींचे वगकरण ‌‘उच्च‌’ दर्जाच्या स्त्रिया असे केलेले आहे आणि बाकीच्या बायकांचे वगकरण त्यांच्या दासी किंवा गुलाम म्हणून केलेले आहे.

या ‌‘उच्च‌’ दर्जाच्या स्त्रियांमध्ये कुर्गच्या राजाच्या दोन बहिणी, म्हैसूरच्या वाडियार घराण्यातील तीन बायका आणि पंडित पूर्णैय्याच्या पुतणीचा समावेश आहे. यातील बहुतांश जणी हिंदू होत्या, असे कॅप्टन मॅरियटने आपल्या अहवालात म्हटले आहे.(संदर्भ : Tiger Of Mysore : Life And Death Of Tipu Sultan, Denys Forest, पृ. 211)

टिपू सुलतानाने आपल्या इतर हिंदू नोकरांच्या स्त्रियांना जबरदस्तीने आपल्या जनानखान्यात घातले होते, हे त्याच्या नोकरांनीच लिहून ठेवले आहे. त्याचे दाखले पुढीलप्रमाणे आहेत ः

1) हैदरच्या काळापासून त्याचा टपाल खात्याचा आणि हेर खात्याचा प्रमुख असलेला शामय्या आणि त्याचा भाऊ रंगय्या याच्या स्त्रियांना टिपूने आपल्या जनानखान्यात डांबले - टिपूचा नोकर रामचंद्रराव पंगानुरी - Memoirs of Hyder and Tippoo : rulers of Seringapatam, pg. 35

2) टिपूचा खजिनदार कृष्णराव याच्या पत्नीला टिपूने आपल्या जनानखान्यात घातले - टिपूचा नोकर मीर हुसेन अली खान किरमानी, इंग्रजी अनुवाद, History Of The Reign Of Tipu Sultan, pg. 193

आपला बाप हैदर अली याच्याप्रमाणे टिपूलादेखील खच्ची केलेल्या मुलांची आवड होती. 1785 साली इस्तंबूलला पाठविलेल्या आपल्या वकिलांना नऊ-दहा वर्षांचे खच्ची केलेले बारा मुलगे खरेदी करावेत आणि त्याकरिता लागेल तो खर्च सरकारी पैशातून करावा, अशा लेखी सूचना त्याने दिल्या आहेत. (संदर्भ :- State and Diplomacy under Tipu Sultan, editor : Irfan Habib, pg. 53)
स्वातंत्र्यसैनिक टिपू?

टिपू सुलतानाला स्वातंत्र्यसैनिक - किंबहुना, ब्रिटिशांविरुद्धच्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा ‌‘पहिला स्वातंत्र्यवीर‌’ म्हणून काही लोक गौरवितात.

दि. 5 फेब्रुवारी 1797 रोजी अफगाणिस्तानचा शासक झमानशाह याला लिहिलेल्या आपल्या पत्रात (संदर्भ : Official Documents Relative to the Negotiations Carried on by Tippoo Sultaun with the French Nation and Other Foreign States, दस्तऐवज क्र. 26, पृ. 66; तसेच The Despatches, Minutes, and Correspondence, of the Marquess Wellesley, खंड 5, पृ. 20) टिपू सुलतान झमानशाहला लिहितो :

“अल्ला आणि त्याच्या प्रेषिताच्या मुहम्मदच्या आज्ञेप्रमाणे आपण काफिरांविरुद्ध पवित्र युद्ध (जिहाद) करण्यासाठी एकत्र आलो पाहिजे आणि आपल्या धर्माच्या शत्रूंच्या अपवित्र स्पर्शातून हिंदुस्थानच्या प्रदेशाची मुक्तता केली पाहिजे. या प्रदेशातील इस्लामधमय अनुयायी दर शुक्रवारी ठरावीक वेळी एकत्र येऊन प्रार्थना करतात - “हे परमेश्वरा, मार्ग बंद करणाऱ्या काफिरांचा संहार कर! त्यांच्या पापांचे ओझे त्यांच्या स्वतःच्या मस्तकावरच पडू दे आणि त्यांना योग्य ती शिक्षा मिळू दे!”

यावरून असे सूचित होते की, टिपू सुलतानाच्या तथाकथित ‌‘वसाहतवादविरोधी‌’ धोरणामागील व्यापक संकल्पना ही भारताच्या सर्वसमावेशक स्वातंत्र्याची नव्हे, तर इस्लामी सत्तेच्या पुनर्स्थापनेची होती. नियोजन असे होते की, अफगाण शासक झमानशाहने दिल्लीतील मराठ्यांना हुसकावून लावावे; उत्तरेकडून त्याची फौज आणि दक्षिणेकडून टिपूची सेना एकत्र येऊन दख्खनमधील उर्वरित मराठा शक्तीचा संपूर्ण पराभव करावा. अशाप्रकारे भारत पुन्हा एकदा इस्लामी सत्तेखाली आणला जावा, अशी रूपरेषा दिसून येते आणि तरीही, काही इतिहासकार टिपू सुलतानाला ‌‘भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा स्वातंत्र्यवीर‌’ म्हणून त्याचा गौरव करतात.

फेब्रुवारी 1797 मध्ये एक फ्रेंच जहाज मंगळुर येथे येऊन थांबले. त्याचा कप्तान फ्रान्स्वा रिपो हा एक लफंगा इसम होता. त्याने स्वतःला त्यावेळी फ्रेंच आधिपत्याखाली असलेल्या मॉरिशसमधील फ्रेंच सैन्याचा उपप्रमुख असल्याचे भासवले आणि भारतातून इंग्रजांना हुसकावून लावण्यासाठी आधीच सैन्य सज्ज असल्याचा दावा केला. टिपू सुलतानाने त्याच्या या दाव्यावर विश्वास ठेवून फ्रेंच अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार सुरू केला.

दि. 2 एप्रिल 1797 रोजी फ्रेंच प्रतिनिधींना दिलेल्या आपल्या सूचनांमध्ये टिपूने असा प्रस्ताव मांडला की, फ्रेंचांनी दहा हजार फ्रेंच सैनिक आणि 30 हजार कृष्णवणय सैनिक (Negroes) पाठवावेत. त्याबदल्यात इंग्रज आणि पोर्तुगीजांकडून जिंकले जाणारे प्रदेश व संपत्ती फ्रेंच आणि टिपू यांच्यात समसमान वाटून घ्यावेत. (संदर्भ : The Asiatic Annual Register, सन 1799, पृ. 195, "Supplement to the Chronicle' विभाग.)

यावरून असे दिसते की, टिपू सुलतानाची तथाकथित वसाहतवादविरोधी भूमिका म्हणजे ब्रिटिशांना हटवून त्यांच्या जागी फ्रेंच सत्तेची स्थापना करणे, एवढ्यापुरतीच मर्यादित होती.

रॉकेटचा प्रणेता टिपू?

अनेक लोकांनी टिपू सुलतानाला रॉकेटच्या विकासाचे, किंबहुना शोधाचेही श्रेय दिले आहे. परंतु, हा समज वस्तुस्थितीशी सुसंगत नाही. हैदर अलीच्या जन्मापूवच भारतात शंभराहून अधिक वर्षे रॉकेट्‌‍सचा वापर प्रचलित होता. मुघल आणि मराठे टिपूच्या जन्माच्या आधीपासून रॉकेट किंवा अग्निबाणांचा वापर युद्धामध्ये करीत असत. याचे प्रमुख संदर्भ पुढीलप्रमाणे आहेत ः

1) 1658 साली दाराशुकोह आणि औरंगजेब यांच्यात सामूगढ येथे झालेल्या युद्धात रॉकेटचा वापर झाल्याचा उल्लेख फ्रेंच प्रवासी फ्रान्स्वा बर्निए याने केला आहे. (संदर्भ : Travels in the Mogul Empire, page 48 )

2) 17 जुलै 1659 रोजी वाई येथे झालेल्या एका महजरात हजर असलेल्या अमृतराऊ बाणकरी याने आपली खूण म्हणून दारूच्या बाणाचे (रॉकेट) चित्र काढले आहे.

टिपू सुलतानाच्या जन्माच्या 92 वर्षे आधी झालेला हा ‌‘महजर‌’ म्हणजे ‌‘दारूचे बाण‌’ टिपूच्या जन्माच्या आधी 92 वर्षांपासून वापरात होते, याचा दृश्य पुरावा आहे. (संदर्भ :- महजर - महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार, डॉ अनुराधा कुलकण, पृ. 263)

समारोप

टिपूच्या स्वतःच्या उक्ती आणि कृती, त्याला जवळून पाहिलेल्या त्याच्या पक्षातील लोकांनी त्याच्याविषयी केलेल्या नोंदी, त्याच्या शत्रूंनी आणि तुलनेने तटस्थ असलेल्या लोकांनी केलेल्या नोंदी त्याच्याविषयी काय सांगतात, ते आपण इथवर पाहिले. तो नक्की कसा होता? स्वातंत्र्यसैनिक, उदारमतवादी, सहिष्णू आणि प्रबुद्ध शासक की, धर्मांध; सामूहिक हत्याकांडे करणारा आणि स्त्रियांवर अत्याचार करणारा, हे ठरवण्याचे काम मी वाचकांवर सोपवतो. शेवटी वाचकांचा निरोप घेण्यापूव प्रोफेसर रमेशचंद्र मजुमदार यांनी ‌‘द हिस्ट्री ॲण्ड कल्चर ऑफ द इंडियन पीपल‌’ या ग्रंथमालेच्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत मांडलेला विचार सांगून लेखाचा समारोप करतो -

इतिहास हे काही विशिष्ट राजकीय, सामाजिक आणि आर्थिक कल्पनांचे वाहन म्हणून वापरण्याची प्रवृत्ती जगात सर्वत्र आढळते. सध्या ती, एखाद्या ढगाप्रमाणे माणसाच्या तळहाताइतकी लहान दिसली, तरी ती वाढत जाऊन आकाश झाकोळून टाकू शकेल. या प्रवृत्तीविरुद्ध लढण्याकरिता इतिहासकाराकडे एकच शस्त्र आहे; ते म्हणजे परिणामांची तमा न बाळगता सत्य सांगत राहणे. इतिहासकाराने वारा वाहील त्याप्रमाणे आपले शीड फिरविता कामा नये; त्याने सत्याचा शोध हे त्याच्या प्रवासाचे ध्येय नजरेसमोर ठेवून सरळ रेषेत जात राहिले पाहिजे.

- सत्येन वेलणकर
Powered By Sangraha 9.0