राज्य सरकारकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीसाठी दिला जाणारा ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला. राज्याच्या कानाकोपर्यातून साहित्य-संस्कृतीचा जागर करणार्या लेखकांची नावं या यादीमध्ये झळकली व त्यांच्या लिखाणाचा उचित सन्मान झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. प्रख्यात लेखिका सानिया यांच्यापासून ते मेजर मोहिनी-गर्गे कुलकर्णी, अभिजित जोग, भानू काळे अशा ज्ञानवंतांचा या पुरस्कारार्थींच्या यादीमध्ये समावेश. तसेच शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी झटणार्या मयूर बागुल यांना प्रौढ वाङ्मय विभागांतर्गत शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लिखाणासाठी त्यांच्या ‘सर्जक’ या लेखसंग्रहाला ‘वसंतराव नाईक’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर दुसर्या बाजूला प्रथम प्रकाशन विभागात कवितेसाठी दिला जाणारा ‘बहिणाबाई चौधरी’ पुरस्कार सचिन शिंदे यांना त्यांच्या ‘पातीवरल्या बाया’ या काव्यसंग्रहासाठी जाहीर करण्यात आला. मयूर बागुल आणि सचिन शिंदे यांच्या साहित्यात युवा जाणिवांचा प्रतिध्वनी अधिक लुभावणारा आहे, त्याचबरोबर पुढच्या पिढीला दिशा देणारासुद्धा. त्यानिमित्ताने त्या दोघांशी केलेली ही खास बातचीत...
पुरस्काराची बातमी समजल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय होती?
साहजिकच, प्रचंड आनंद झाला आहे. आपल्या कवितासंग्रहाला ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार’ मिळावा, हा क्षण माझ्यासाठी आयुष्यभर काळीजकुपीत जपून ठेवण्यासारखा आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाचा पुरस्कार जेव्हा आपल्या पुस्तकाला मिळतो, तेव्हा निश्चितच आभाळाला गवसणी घातल्याचा आनंद माझ्या मनात साठलेला आहे. पुढील लेखनप्रवास घडण्यासाठी एक जबाबदारीही वाढली असल्याची जाणीव झालेली आहे, असं मला वाटतं.
‘पातीवरल्या बाया’ या आपल्या काव्यसंग्रहाचा नेमका विषय काय आहे?
ग्रामीण मराठी साहित्य शेतीच्या अनुषंगाने पुढे आलेलं आहे. कवितेच्या बाबतीत सांगायचं झालं, तर शेतीव्यवस्थेशी निगडित असलेल्या अनेक गावपातळीवरच्या असंख्य अडीअडचणी, समस्यांचा भवताल कवितेतून अनेकांनी टिपलेला आहेच. माझी कविता ही ग्रामीण श्रमजीवी, कष्टकरी महिलांच्या जगण्याचे संदर्भ अधोरेखित करते, असं मला वाटतं. ‘पातीवरल्या बाया’ म्हणजे केवळ शेतातल्या पातीवर किंवा बांधावर काम करणार्या स्त्रिया असा त्याचा अर्थ सीमित होत नाही. शीर्षकाच्या अनुषंगाने विचार केला, तर तो खूप व्यापक अंगाने आलेला आहे. पूर्वी एखाद्या सावकाराच्या किंवा जमीनदाराच्या शेतामध्ये वर्षानुवर्ष काम करत आलेल्या स्त्रियांनाही ‘पातीवरल्या बाया’ म्हटलं जायचं.
मग कधी-कधी या स्त्रियांना जमीनदाराच्या शेतातील काम नसेल, तेव्हा त्यांना कणगीतील धान्य नीट करणं, घर आणि अंगण सारवून घेणं, भिंती लिंपणं, घरातील धुणं नदीवर नेऊन आपटून आणणं, शेणाच्या गोवर्या थापणं इत्यादी कामं दिली जायची; पण त्यांना दुसर्यांच्या शेतावर किंवा इतर ठिकाणी कामाला जाऊ दिलं जायचं नाही किंवा त्या स्त्रियाही जायच्या नाहीत. त्यांना कोणी इतर व्यक्तींनी कामावर येण्यासंबंधी विचारणा केली, तर मी अमुकतमुक व्यक्तींच्या पातीवर आहे, अशा त्या म्हणायच्या. म्हणजे, त्यांची सावकार आणि जमीनदाराच्या प्रती प्रचंड निष्ठा असायची. हा बायांच्या जगण्याचा, सोसण्याचा कोलाज म्हणजे ही कविता आहे. यात नदी आहे, तिचं सौंदर्य आहे, तिच्या बदलत्या पात्राचं रुदन आहे, त्याचबरोबर नदीचं रौद्ररूप आहे. दुष्काळ आहे, पूर आणि महापूर आहे. त्यातही वेगवेगळ्या अभिनिवेशाशी आणि शिवाराशी संबंधित असलेले अनेकानेक संदर्भ या पुस्तकात आहेत. त्यामुळे स्त्रीच्या श्रमसंस्कृतीबरोबर त्यांच्या वेदनेचा, त्यांच्या जिद्दीचा, त्यांच्या कणखरपणाचा, त्यांच्यातील लढाऊवृत्तीचा पट या पुस्तकातून विस्तारत जातो.
आपल्या काव्यलेखनामागच्या प्रेरणेविषयी काय सांगाल?
लहानपणी आईबरोबर मजुरीला जावं लागायचं. सकाळपासून दिवस मावळेपर्यंत दुसर्यांच्या शेतात, बांधावर किंवा अन्यत्र कुठे कष्ट करावे लागायचे. तत्कालीन भोवताल आपल्या मनात साठवून कवितेच्या रूपात तो यावा, असं वाटत राहायचं. नदीकाठी हुंदडणं, तिच्या काठावर बसून तिच्याशी एकरूप होणं, तिच्या सौंदर्याचं, रुद्रावताराचं चित्र डोळ्यात साठून राहायचं. यांचं चित्रण शब्दांत यावं, असं वाटत राहिलं आणि काव्यलेखनाचा मार्ग मोकळा झाला.
‘कविता’ या साहित्यप्रकाराच्या उद्देशाकडे आपण नेमकं कसं बघता?
‘पद्य’ प्रकारात ‘कविता’ हा एक महत्त्वाचा साहित्यप्रकार आहे आणि कविता ही आपल्या काळजाची भाषा असते. कवितेत कवी आपल्या भावनांना शब्दाच्या रूपातून वाट मोकळी करून देत असतो. एखादं बीज मातीत रुजावं, त्याला कोवळा अंकुर फुटावा, त्याचं डेरेदार वृक्षात रूपांतर व्हावं, असाच काही प्रवास हा कवितेच्या बाबतीत असतो, असं म्हणावं लागेल.
आपल्या लिखाणावर कुणाचा प्रभाव आहे? कोणाची शब्दसंपदा आपल्याला भावते?
मुळात कविता ही त्या-त्या कवीची स्वतंत्र अशी अभिव्यक्ती असते. आपण पाहतो की, मराठी साहित्यविश्व हे अनेक कवींनी समृद्ध केलेलं आहेच. एक वाचक म्हणून आपण इतर कवींच्या कविता वाचून त्यांच्या अनुभवाशी किंवा लेखनाची तादात्म्य साधत असलो, तरी कवी म्हणून किंवा लेखक म्हणून आपण आपलीच वेदना किंवा आपलीच अनुभूती मांडत असतो. प्रत्येक कवी हा स्वतःलाच आपल्या स्वानुभवाच्या आरशात डोकावू पाहतो. आपण कोणत्या परिवेशात जगलो, त्याचा संदर्भ तो कवितेतून मांडत असतो. मराठी ग्रामीण कवितेत ना. धो. महानोर, विठ्ठल वाघ, श्रीकांत देशमुख, कल्पना दुधाळ, इंद्रजित भालेराव, तसेच नव्या पिढीतील कवी नामदेव कोळी, संदीप जगदाळे, अमृत तेलंग आदी कवींच्या कविता वाचून आपण समृद्ध झालो असलो, तरी यांच्या कविता या आपापल्या स्वतंत्र शैलीचे आणि भवतालचे दुःख उजागर करत जाणारी कविता आहे. म्हणून, कोणाच्या कवितेचा प्रभाव न म्हणता, आपली कविता म्हणून एक स्वतंत्र ओळख निर्माण करणारी कविता आहे, असं मला वाटतं.
भाषेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत सोपवताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?
मुळात भाषा ही आपली एक सांस्कृतिक बाब आहे, असं मला वाटतं. आपल्या भाषेला पुढच्या पिढीपर्यंत सोपवताना आपलं भाषिक संक्रमण हे मूल्यात्मक पातळीवर उतरायला हवं. भाषा ही आपल्या वाचनातून, लेखनातून आणि बोलण्यातून जपली जाते. जसे की- आपण म्हणतो, आपली मातृभाषा जपली पाहिजे. तिचा प्रचार, प्रसार आणि विस्तार झाला पाहिजे. म्हणण्यापेक्षा कृतीला इथे फार महत्त्व असतं. मनुष्याच्या जीवनात भाषिक जडणघडणीचा फार महत्त्वाचा वाटा असतो. हल्ली इंग्रजी भाषेच्या प्रभावाखाली आपण सर्वच दबत चाललो आहोत, तर इंग्रजीबरोबर आपली मातृभाषा मराठीही तितकीच मोलाची, महत्त्वाची भाषा असल्याने जुन्या पिढीने भाषेचे जतन-संवर्धन करण्याबरोबरच पुढल्या पिढीमध्ये तिचे स्थान अढळ कसे राहील, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहेत.