मुंबई: अवधूत वाघ लिखित ‘जयोस्तुते’ पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ‘संघाची पुढची दिशा व आव्हाने’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. यावेळी ‘पुढारी’ माध्यम समूहाच्या मुख्य संपादिका मृणालिनी नानिवडेकर, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार, ज्येष्ठ गांधीवादी पत्रकार जतिन देसाई, ‘मॅक्स महाराष्ट्र’चे संपादक रवींद्र आंबेकर, ‘जय महाराष्ट्र’चे संपादक प्रसाद काथे यांचा विशेष सहभाग होता. सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार स्वप्नील सावरकर यांनी केले. जतिन देसाई आणि रवींद्र आंबेकर यांनी संघावर अनेक प्रश्न उपस्थित केले; तर किरण शेलार आणि प्रसाद काथे यांनी त्याचे खंडण केले. मृणालिनी नानिवडेकर यांनी संघाच्या अनेक चांगल्या गोष्टींचे कौतुक करत, काही बदल आवश्यक असल्याचेदेखील सांगितले. दरम्यान, ‘आमचेच आणि एवढेच असे संघ मानत नाही. जे हिंदू समाजाचे आहे, ते सर्व संघाचे आहे,” असे मान्यवरांनी सांगितले.
सिंहावलोकन करणे आवश्यक
रवींद्र आंबेकर म्हणाले की, “आज संघ शताब्दी साजरी करत असताना संघाने सिंहावलोकन करणे आवश्यक आहे. आज संघाचा शिष्य म्हणून पाहावे, तर ‘बजरंग दल’ दिसते आणि गुरू म्हणून जर डॉ. हेडगेवार पाहावेत, तर संघाची राजकीय पाट हेडगेवारांचा फोटो लावायचा सोडून वल्लभभाई पटेल आणि डॉ. आंबेडकरांचा फोटो का लावतात, ही दुटप्पी भूमिका ठरते.”
संघाकडून वेळोवेळी अनेक बदल
आंबेकरांच्या या मुद्द्याचे खंडण करताना किरण शेलार म्हणाले की, “अनेकजण संघाचे आकलन करत असताना त्यांच्या चष्म्यातून पाहत असतात. डॉ. आंबेकरांनी केलेले वक्तव्य पूर्णपणे चुकीचे ठरते. कारण संघाने आज शताब्दीच्या वर्षात येईपर्यंत वेळोवेळी अनेक बदल केले आहेत, म्हणूनच आज संघ इथपर्यंत पोहोचला आहे. जे-जे हिंदू समाजाचे आहे, ते-ते संघ घेतो; जे चुकीचे आहे, त्याला संघ चुकीचेच म्हणतो.”
...जातिव्यवस्था कशी हाताळणार?
जतिन देसाई म्हणाले की, “मी संघाचा विरोधक आहे, हे माहीत असूनही मला याठिकाणी बोलावले, हे विशेष आहे. संघावर अनेक आक्षेप आहेत, त्याचीही चर्चा व्हायला हवी.” मृणालिनी नानिवडेकर म्हणाल्या की, “पत्रकार म्हणून संघापुढील आव्हाने पाहत असताना आज देशातील युवक, महिला, तंत्रज्ञान, लोकशाही आणि जातिव्यवस्था संघाकडून कशी हाताळली जाणार, हे संघासमोरचे आव्हान आहे.”
संघविरोधकांनी डोळ्यावरची पट्टी काढली पाहिजे?
प्रसाद काथे म्हणाले की, “आज संघ पाहत असताना डोळ्यावरची पट्टी काढली पाहिजे? आज संघाच्या व्यासपीठावर विरोधकांनादेखील बोलावले जात आहे. या व्यासपीठावर संघाचा विरोध करणारे ‘जमाते इस्लामी’च्या व्यासपीठावर जाऊन सांगतील का की, तुम्ही जरा द्वेष कमी करा, ‘लॅण्ड जिहाद’ करू नका?”
आरोपांचे खंडन
स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुद्द्यांवर चर्चा आली असताना आंबेकर म्हणाले की, “हिंदू भेसळ करत नाहीत का? हिंदूंमुळे कॅन्सर होत नाही का? मग हिंदू जिहादी ठरत नाहीत का? त्यामुळे बजरंग दलाने उत्तरे देण्यापेक्षा प्रशासन आणि कायदा व्यवस्थेने उत्तरे द्यावीत.” याचे खंडण करत असताना किरण शेलार यांनी डाव्यांची हेकेखोरी दाखवून दिली. ते म्हणाले की, “अनेकांना वाटते स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आमची स्वतःची मक्तेदारी आहे. परंतु, संघाने आणि स्वयंसेवकांनी समरसता सांगितली की, अनेकजण त्याला थोतांड म्हणतात. खरेतर असे बोलणारेच खरे ढोंगी आणि धूर्त ठरतात.”
संघविरोधकांनी समजून घेतले पाहिजे
डॉ. आंबेकरांच्या मुद्द्यावर नानिवडेकर म्हणाल्या की, “स्वातंत्र्य, समता, बंधुता या फ्रेंच राज्यक्रांतीच्या संकल्पना आहेत. त्या आधीदेखील भारत होता, हे संघविरोधकांनी समजून घेतले पाहिजे.” धर्मांतरण या मुद्द्यावर त्या म्हणाल्या की, “आपले लोक का धर्मांतरण करतात, याचा हिंदूंनीदेखील विचार करायला हवा.”
चारित्र्य संस्काराने ठरते
जतिन देसाई म्हणाले की, “मी नास्तिक आहे; परंतु धर्मांतरणाच्या घटना आहेत, त्याचा गंभीरतेने विचार करायलाच हवा.” तर, डॉ. आंबेकरांनी धर्मांतरणाआधी संघ आणि भाजपच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, “पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर चरित्र बदललेले दिसते, ही देशासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे.” यावर काथे म्हणाले की, “कोणाचेही चारित्र्य पैसा आणि प्रसिद्धीने नाही, तर संस्काराने ठरते. त्यामुळेच ‘सीओईपी’चा संघाचा स्वयंसेवक असलेला मुलगा त्याच्या शेवटी 70 लाख रुपये दान करून ‘5/5’च्या खोलीत राहतो.”
विशिष्ट चष्म्यातून पाहणे योग्य नाही
रवींद्र आंबेकर यांच्या संघावरील टीकेला उत्तर देताना किरण शेलार म्हणाले की, “कोणाचीही चिकित्सा करत असताना त्याला तटस्थतेने सामोरे जावे लागते. एका विशिष्ट चष्म्यातून त्याकडे पाहणे योग्य नाही. महापुरुषांचा प्रश्न असेल, तर संघ काही सेमेटीक रिलीजन नाही. आमचेच आणि एवढेच असे संघ मानत नाही. जे हिंदू समाजाचे आहे, ते सर्व संघाचे आहे.”