मुंबई : (Mumbai Monorail) चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मोनोरेल मार्गिकेची सेवा सप्टेंबर २०२५ पासून बंद आहे. अत्याधुनिकरण करण्यासाठी मोनोरेल मार्गिकेवरील सेवा अनिश्चित काळासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बंद केली होती. मात्र, आता अत्याधुनिक करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून या सेवेला स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन कर्ता (आयएसए) यांचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे मोनोरेल सेवा पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने मोठी प्रगती झाली आहे.
हे प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी उत्पादन प्रकल्प स्तरावर नवीन रेकची सविस्तर तपासणी करण्यात आली. मंजूर आराखड्यांनुसार कठोर सुरक्षा निकषांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी व्यापक चाचण्या घेण्यात आल्या. ऑसिलेशन चाचण्यांची यशस्वी पूर्तता करण्यात आली असून, इजिप्त मोनोरेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रणालीस अनुरूप सीबीटीसी सिग्नलिंग प्रणालीची स्थापना व इंटरफेस-स्तरीय चाचणीही पूर्ण करण्यात आली. मागील दोन महिन्यांत मोनोरेल मार्गिकेच्या विविध टप्प्यांवर कठोर चाचण्या घेऊन संपूर्ण प्रणालीच्या कार्यसज्जतेची खातरजमा करण्यात आली.
हेही वाचा : Ovary trafficking racket: बदलापूरमध्ये अंडाशय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; तीन महिला अटकेत, नेमकं प्रकरण काय?
अद्यायावत नवे डबे
मोनोच्या नवीन डब्यांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी प्रगत सस्पेन्शन प्रणाली, मेट्रो-मानकानुसार प्रशस्त अंतर्गत रचना, दिव्यांग-स्नेही आसनव्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, चार्जिंग सॉकेट्स तसेच अंतर्गत व बाह्य गतिशील प्रवासी माहिती प्रणालीचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय अग्निसुरक्षा मानकांनुसार स्वयंचलित अग्निशमन व शोध प्रणाली, सीसीटीव्ही देखरेख, रिअल-टाईम मॉनिटरिंग, सुधारित कपलर्स आणि इव्हेंट रेकॉर्डर्स यामुळे सुरक्षितता व विश्वासार्हतेत वाढ झाली आहे. आयपी-आधारित ट्रेन नियंत्रण प्रणाली, ऊर्जा-कार्यक्षम मोटर्स आणि स्वदेशी उत्पादनामुळे कार्यक्षमता वाढणार असून आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे.
प्रवासी वाहतुकीसाठी अंतिम वैधानिक प्रमाणपत्र
सद्यस्थितीत, नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत अभियंत्याची नियुक्ती प्रक्रियेत आहे. नियुक्त अभियंता संपूर्ण मोनोरेल मार्गिकेची सविस्तर तपासणी करून प्रवासी वाहतुकीसाठी अंतिम वैधानिक प्रमाणपत्र प्रदान करणार आहेत. अंतिम मंजुरी प्राप्त होताच, सार्वजनिक हित व मुंबईकरांच्या सोयीसाठी नवीन रेकसह मोनोरेल सेवा लवकरच पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहितीही एमएमआरडीएने दिली आहे.