२०२६ साली प्रलय होणार?

21 Feb 2026 13:37:16

लोकांना भीती-भय यांचे एक विचित्र, विलक्षण असे आकर्षण असते. लोकांना दुसर्‍यांना घाबरवून सोडायला आवडते; दुसरा भयभीत झालेला बघायला तर फारच आवडते; पण स्वतः घाबरून जायलाही आवडते. आपण अत्यंत ‘रॅशनल’ आणि ‘लॉजिकल’ आहोत, अशी दिवसा हुशारी मारणारे कित्येक लोक रात्री अंधारात घराबाहेर पडायला, अगदी शहरातसुद्धा घाबरतात. म्हणून, तर विज्ञान-तंत्रज्ञानाच्या सर्वोच्च पातळीवर उभे असलेले पाश्चिमात्य लोक परग्रहावरून होणार्‍या संभाव्य आक्रमणाला घाबरतात. फेब्रुवारी २०२६ मध्ये अमेरिकन काँग्रेसने (संसदेने) उडत्या तबकड्यांसंदर्भात जास्तीत-जास्त माहिती संसदेला देण्याचा कायदाच पारित केला आहे. त्यानिमित्ताने...

ब्रायन टायलर कोहेन हा एक अमेरिकन पत्रकार, राजकीय विश्लेषक, समालोचक, यूट्यूबर आहे. ‘नो लाय विथ ब्रायन टायलर कोहेन’ हा त्याचा साप्ताहिक दूरदर्शन कार्यक्रम बराच लोकप्रिय आहे. विविध छोट्या-मोठ्या राजकीय नेत्यांना त्यात निमंत्रित करून विविध विषयांवर बोलते करण्याचे काम तो करत असतो. गेल्या आठवड्यात त्याच्या या कार्यक्रमात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आले होते. २००९ साली ओबामा हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येणारे पहिले आफ्रिकन-अमेरिकन नेते होते. २००९ ते २०१७ असे सलग दोन कार्यकाळ ते राष्ट्राध्यक्ष होते.

गेल्या आठवड्यातल्या ओबामांच्या मुलाखतीत कोहेनने त्यांना विचारलेल्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न होता की, "परग्रहावर सजीव आहेत का?” परग्रहावरच्या सजीवांसाठी पाश्चिमात्य लोक ‘मानव’ किंवा ‘सजीव’ असा शब्द न वापरता ‘एलियन्स’ असा शब्द वापरतात. कोहेनच्या या प्रश्नावर ओबामा उत्तरले, "होय, ते (म्हणजे एलियन्स) खरेच आहेत. मात्र, मी त्यांना पाहिलेले नाही.” ते पुढे म्हणाले, "त्यांना (म्हणजे एलियन्सना) ‘एरिया-५१’मध्ये ठेवलेले नाही. तिथे भूमिगत जागेत काहीतरी गुप्त हालचाली (एलियन्स संबंधी) चालतात आणि त्या राष्ट्राध्यक्षांनादेखील सांगितल्या जात नाहीत, इत्यादी ‘कॉन्स्पिरसी थिअरीज’मध्ये काही अर्थ नाही.”

ओबामांच्या या उत्तराने सर्वत्र खळबळ उडाली. वृत्तपत्रे, समाजमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे सर्वांनी या मुद्द्याला चांगलीच प्रसिद्धी दिली. अखेर ओबामांनी आपल्या अधिकृत ‘इन्स्टाग्राम’वरून खुलासा प्रसिद्ध केला. त्याची शब्दरचना अगदी मुत्सद्देगिरीला साजेशी आहे. ओबामा म्हणतात, "गणिती आकडेवारीनुसार आपले हे विश्व इतके अफाट आहे की, अन्यत्र सजीवसृष्टी असणे शक्य आहे. मात्र, सूर्यमालांमधले अंतर इतके दीर्घ आहे की, एलियन्सनी कधी पृथ्वीला भेट दिली असण्याची शक्यता फारच कमी आहे. परग्रहवासीयांनी पृथ्वीला भेट दिल्याची घटना माझ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत तरी घडलेली नाही.”

किती ‘नॉन-कमिटेड’ शब्दरचना आहे पाहा. अन्यत्र सजीवसृष्टी नाही किंवा आहे, असे ते म्हणत नाहीत; ‘असणे शक्य आहे’ तसेच ‘परग्रहवासीयांनी पृथ्वीला भेट दिल्याची घटना माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीत घडलेली नाही’ म्हणजे, त्या आधी किंवा नंतर असूदेखील शकते. आता यावरून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खवळले आहेत. त्यांनी ‘क्लासिफाईड’ म्हणजे ‘अधिकृत सरकारी गौप्य’ असणार्‍या मुद्द्यावर भाष्य केल्याबद्दल ओबामांना फटकारले आहे. ओबामा हे ‘डेमोक्रॅटिक’ पक्षाचे आहेत, तर ट्रम्प हे ‘रिपब्लिकन’ पक्षाचे आहेत. ओबामा दोनवेळा राष्ट्राध्यक्ष होते. त्यामुळे अमेरिकन कायद्यानुसार ते आता कोणत्याही राजकीय पदासाठी उभे राहू शकत नाहीत. हिलरी क्लिटंन यादेखील आता राष्ट्राध्यक्ष बनण्याची शक्यता जवळपास नाहीच. पण, हे दोघेही पडद्यामागच्या राजकारणात चांगलेच सक्रिय आहेत. न्यूयॉर्कच्या महापौरपदावर ममदानी हा मुसलमान निवडून आणण्यात या दोघांची पडद्यामागे बरीच मोठी भूमिका आहे, असे म्हटले जाते.

त्यामुळे सध्या डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोन प्रमुख राजकीय पक्षांमधले संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. ‘नॅशनल डिफेन्स ऑथोरायझेशन अ‍ॅक्ट, २०२६’ हा प्रस्ताव आता अगदी नुकताच पारित करून अमेरिकन संसदेने संबंधित खात्याला असा आदेश दिला आहे की, ‘अनआयडेंटिफाईड अ‍ॅनोमलस फेनोमेना-यू.ए.एफ.’ संबंधी जास्तीत-जास्त माहिती संसदेसमोर ठेवण्यात यावी. या शब्दरचनेवरून कुणाला फारसे काही कळले नसते; पण ‘एलियन्स’, ‘एरिया-५१’ इत्यादींचा उल्लेख करून ओबामांनी एकप्रकारे सरकारी गुपित फोडले आहे. त्यामुळे ट्रम्प तात्यांना खवळायला निमित्तच मिळाले आहे. आता हा वाद आणखी वाढतो की, कसे हे येणार्‍या काळात दिसेलच.

काय आहे ही सगळी भागनड? या सगळ्या भानगडीची सुरुवात १९४७ सालीच झालेली आहे. न्यू मेक्सिको हा अमेरिकेचा एक प्रांत आहे. तिथल्या रोझवेल या गावी अमेरिकन वायुदलाचा एक तळ आहे. दि. ४ जून १९४७ या दिवशी एका गुराख्याला या तळापासून काही अंतरावर काहीतरी उडणारी वस्तू एका शेतात कोसळताना दिसली. जवळ जाऊन पाहिल्यावर त्याला काहीतरी विचित्र दृश्य दिसले. त्याने ते पोलिसांना सांगितले. पोलिसांनी वायुदलाच्या लोकांना सांगितले. प्रारंभीच्या बातम्या अशा आल्या की, ते परग्रहावरून आलेले अवकाशयान असून, काहीतरी अपघात होऊन ते कोसळले. त्यात दोन ‘एलियन्स’चे मृतदेह आढळले. त्या यानाच्या अंतर्भागातील यांत्रिक रचना फारच विचित्र असून, ती कशी ऑपरेट होत असेल, हेच वायुदलाच्या तज्ज्ञांना समजत नाहीये, इत्यादी.

या बातम्यांमुळे केवळ अमेरिकेतच नाही, तर संपूर्ण जगभर प्रचंड खळबळ उडाली. ‘ग्रीक पुराणे’, ‘रोमन पुराणे’, ‘बायबल’ इत्यादी ग्रंथांमधून परग्रहवासीय पृथ्वीवर येत-जात असल्याच्या कथा प्रचलित होत्याच. शिवाय, आकाश निरीक्षकांना आकाशात विचित्र वस्तू उडताना दिसल्याचे उल्लेख केलेल्या नोंदीदेखील भरपूर होत्या. त्या विचित्र वस्तू साधारणपणे बशीसारख्या दिसत असल्यामुळे ‘फ्लाईंग सॉसर-उडती तबकडी’ हे त्यांचे नावही जनमानसात केव्हाच रूढ झाले होते. आता रोझवेल गावी घडलेल्या या घटनेनंतर अमेरिकन शास्त्रज्ञांनी त्यांना उडत्या तबकड्याऐवजी ‘अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेट’ किंवा ‘यू.एफ.ओ.’ असे शास्त्रीय नाव दिले आणि त्यांचा कसून अभ्यास सुरू केला.

यातून संपूर्ण जगात; पण विशेषतः पाश्चिमात्य जगात ‘युफोलॉजी’ असे नवे शास्त्रच उदयाला आले. अनेक लोक आपापल्या दुर्बिणी आणि कॅमेरे सरसावून आकाशाकडे डोळे लावून बसू लागले. अनेक पुस्तके, अनेक अहवाल, अनेक अभ्यास प्रकाशित होऊ लागले. एकीकडे हे सगळे चालू असताना अमेरिकेने १९५८ साली ‘नॅशनल एअरोनॉटिस अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ उर्फ ‘नासा’ची स्थापना करून अवकाश संशोधनाला प्रचंड गती दिल्ली. मग सोव्हिएत रशिया कसा मागे राहील? ‘रशियन अ‍ॅकेडमी ऑफ सायन्स’ ही जगातली तिसरी जुनी विज्ञान संस्था. (स्थापना सन १७२४) तिने खास अवकाश संशोधन विभाग सुरू केला.

रशिया, अमेरिकेसह सगळेच युरोपीय देश अवकाश संशोधन तर जारीने करत होते; पण त्याच वेळी हळूहळू त्यांचा कल उडत्या तबकड्या आणि ‘युफोलॉजी’ या विषयांना नाकारण्याचा दिसू लागला. उदा. ‘नासा’ची स्थापना होण्यापूर्वीच म्हणजे १९५२ सालीच ‘मॅजेस्टिक-१२’ या नावाच्या एका संशोधन गटाने एक अती-अती गुप्त अहवाल अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसेन हॉवर यांना सादर केला होता. त्याचा आशय असा होता की, रोझवेल गावाजवळ खरोखरच एका परग्रहावरील अपघातग्रस्त यानाचे अवशेष ताब्यात घेण्यात आलेले होते. त्यात चार ‘एलियन्स’चे मृतदेह होते. या सगळ्या अवशेषांना किंवा एकंदरीत संशोधनालाच जनतेपासून गुप्त ठेवण्यात यावे. कारण, या परग्रहवासीयांचा पृथ्वीला भेट देण्यामागचा हेतू उलगडलेला नसून, जनता मात्र विविध प्रकारच्या अफवांनी घाबरून गेलेली आहे.

त्यामुळे आता मुख्यतः अमेरिकन सरकार आणि इतर सर्व सरकारे अधिकृतपणे असे सांगतात की, १९४७ची रोझवेल घटना किंवा त्यानंतर उडत्या तबकड्या दिसण्याच्या घटना म्हणजे अमेरिकन वायुदल किंवा ‘सीआयए’ किंवा देशोदेशींची वायुदले यांनी चालवलेले अतिशय संवेदनशील असे अतिउच्च वैज्ञानिक प्रयोग होते. त्यामुळे ती अंतराळयाने नसून, मानवनिर्मित वेगळ्या प्रकारची विमानेच होती किंवा विविध अवकाशीय नैसर्गिक कारणांमुळे झालेले दृष्टिभ्रम होते. जसे अतितप्त जमिनीवर लांबून पाणी असल्याचे भासते, त्यालाच ‘मृगजळ’ म्हणतात. तसेच हे अवकाशीय दृष्टिभ्रम असतात इत्यादी.

सिडने शेल्डन हा एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अमेरिकन कादंबरीकार होता. त्याने १९९१ साली ‘द डूम्स डे कॉन्स्पिरसी’ नावाची अत्यंत थरारक कादंबरी लिहिली. एका अमेरिकन गुप्तहेराला स्वित्झर्लंडमध्ये कोसळलेल्या उडत्या तबकडीचे दृश्य बघणारे दहा प्रत्यक्ष साक्षीदार हुडकण्याची कामगिरी देण्यात येते, तो मोठ्या हिकमतीने ती पार पाडतो. मग अचानक त्यांच्या लक्षात येते की, आपल्याच खात्याने या दहाही साक्षीदारांना ठार मारलेले आहे आणि आता आपल्यालाही उडवण्याचा हुकूम सुटलेला आहे; पण तो कथानकाचा नायक असल्यामुळे बचावतो. त्या उडत्या तबकडीमधले दोन परग्रहवासी ठार झालेले असतात; पण तिसरी बचावलेली स्त्री नायकाला सांगते की, तुम्ही पृथ्वीवासीयांनी अमर्याद हाव बाळगून हवा, पाणी, जमीन सगळे कमालीचे प्रदूषित केले आहे.

हे थांबवा, असे सांगायला आम्ही आलो होतो. तुमच्यावर आक्रमण करण्याचा आमचा हेतू नाही इत्यादी. लेखक सिडने शेल्डन यांनी या कादंबरीला प्रदीर्घ प्रस्तावना जोडली आहे. आपण या कादंबरीसाठी किती अभ्यास केला, अंतराळ संशोधन प्रकल्पांमध्ये काम करणार्‍या किमान २३ शास्त्रज्ञांचे कसे गूढ मृत्यू झाले; आकाशात रहस्यमय वस्तू उडताना दिसल्याच्या किमान ७० हजार घटना (पुस्तक प्रसिद्ध होईपर्यंत) कशा रीतसर नोंदवल्या गेल्या आहेत आणि त्यातल्या अर्ध्याहून अधिक घटनांबद्दल वैज्ञानिक काहीही खुलासा करू शकलेले नाहीत, अशा अनेक गोष्टी स्पष्टपणे नोंदवलेल्या आहेत.

आता हे पुस्तक प्रसिद्ध झाले १९९१ साली. म्हणजे ३४-३५ वर्षे झाली. २००७ साली सिडने शेल्डन मरण पावले; पण उडत्या तबकड्या दिसणे थांबलेले नाही. ‘एरिया-५१’ या नावाचा अमेरिकन वायुदलाचा एक फार मोठा तळ नेवाडा (किंवा निवाडा) या प्रांतात लास वेगास या प्रसिद्ध पर्यटन केंद्राजवळ आहे. तिथे उडत्या तबकड्यांबद्दल काहीतरी जबरदस्त संशोधन चालू आहे, अशी अमेरिकन जनतेची समजूत आहे. आता जर उडत्या तबकड्या किंवा ‘एलियन्स’ हे सगळे बोगस असेल, तर अमेरिका संसदेला ‘डिफेन्स ऑथोरायझेशन अ‍ॅक्ट’ का पारित करावासा वाटला? तर त्याचे तोंडोतोंडी असे एक कारण सांगितले जात आहे की, २०२६ या वर्षी एक भयंकर धूमकेतू किंवा उल्का किंवा तत्सम वस्तू पृथ्वीवर आदळून संपूर्ण विनाश ओढवणार आहे. चला, आता घाबरा पाहू!


- मल्हार कृष्ण गोखले



Powered By Sangraha 9.0