मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याला अंडरवर्ल्डकडून धमकी दिल्याप्रकरणी मोठी खळबळ निर्माण झाली होती. तसेच बॉलिवूड आणि खंडणी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलं आहे. दरम्यान, आता याच प्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित हरिचंद्र उर्फ ‘हॅरी बॉक्सर’ याने रणवीरच्या मॅनेजरला व्हॉइस नोट पाठवत कोट्यवधींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर रणवीर सिंगची सुरक्षा देखील वाढवण्यात आली असून मुंबई क्राइम ब्रँचनं आरोपीविरुद्ध लुकआउट सर्क्युलर (LOC) जारी केला आहे.
१० की २० कोटींची मागणी? तपासात नवा खुलासा
मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंहच्या मॅनेजरला अमेरिकन नंबरवरून धमकीचं व्हॉइस नोट पाठवण्यात आलं होतं. सुरुवातीला १० कोटी रुपयांची मागणी केल्याची चर्चा होती; मात्र पुढील चौकशीत २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे समोर आले. हे व्हॉइस नोट तपासासाठी पंजाब आणि हरियाणा पोलिसांकडे पाठवण्यात आले. आवाज हॅरी बॉक्सरशी साधर्म्य दर्शवतो, अशी प्राथमिक पुष्टी झाल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या साऊथ रीजन सायबर सेलने १७ फेब्रुवारी रोजी एफआयआर दाखल केली. रणवीरचे सोशल मीडिया हँडलर आणि मॅनेजर विजय सुब्रमण्यम यांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली. त्यांना +340 या आंतरराष्ट्रीय कोडवरून अनेक धमकीचे कॉल आले होते. हा कोड व्हर्जिन आयलंड समूहाशी संबंधित असल्याची माहिती आहे.
या प्रकरणाचा तपास सायबर सेल आणि अँटी-एक्सटॉर्शन सेल (AEC) संयुक्तपणे करत आहेत. अमेरिकन नंबरच्या तपासासाठी परदेशी यंत्रणांशीही संपर्क साधण्यात आला आहे.
रोहित शेट्टी फायरिंग प्रकरणानंतर वाढली खळबळ
चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर २ फेब्रुवारी २०२६ रोजी रणवीरला धमकीचं व्हॉइस नोट पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. व्हॉइस नोटमध्ये रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी यांना ‘लाईनवर या’ असा इशाराही देण्यात आला होता. तसेच पोर्तुगालमधील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावाही करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर रणवीर सिंगची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शूटिंगदरम्यान आणि प्रवास करताना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोपी हॅरी बॉक्सर कॅनडामध्ये लपून बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच परदेशातून शूटरांना निर्देश देणाऱ्या कथित विदेशी हँडलर आरजू बिश्नोईच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे.
कोण आहे हॅरी बॉक्सर?
हॅरी बॉक्सरचं खरं नाव हरिचंद आहे. पोलिस भरतीची तयारी करत असताना तो बॉक्सिंगही करत होता, त्यामुळे त्याला ‘बॉक्सर’ ही उपाधी मिळाली. मात्र नंतर तो लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संपर्कात आला. राजस्थानातील सीकर, ढोलपूर, जयपूर, करौली आणि अलवर येथे त्याच्याविरुद्ध खून व खुनाच्या प्रयत्नाचे अनेक गुन्हे नोंद आहेत.
सध्या मुंबई पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आरोपीला लवकरच अटक करण्यासाठी हालचाली वेगात सुरू आहेत. बॉलिवूडमध्ये वाढत्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर ही घटना पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.