Ovary trafficking racket: बदलापूरमध्ये अंडाशय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; तीन महिला अटकेत, नेमकं प्रकरण काय?

21 Feb 2026 15:05:44
 
Ovary trafficking racket
 
बदलापूर : (Ovary trafficking racket) गोरगरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची बेकायदेशीर काढणी करून तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या टोळीला अटक केली असून तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने आरोपींना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Ovary trafficking racket)
 
नेमकं प्रकरण काय?
 
ही घटना एका पीडित महिलेने उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधल्यानंतर उघड झाली. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ज्युवेली गावातील आरोपी महिलांकडून गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून इंजेक्शन्स देण्यात येत होते. डॉक्टरांचा सल्ला न घेता बेकायदेशीरपणे सोनोग्राफी चाचण्या करण्यात येत होत्या. त्यानंतर संबंधित महिलांना आयव्हीएफ सेंटरमध्ये नेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये अंडाशय काढण्यात येत असल्याचा आरोप आहे. (Ovary trafficking racket)
 
या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार म्हणून सुलक्षणा गाडेकर हिच्यासह अश्विनी चाबूकस्वार आणि मंजुषा वानखेडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. गाडेकरच्या घरावर छापा टाकून गर्भाशयासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शन्सचे फोटो, सोनोग्राफी अहवाल, खोटी प्रतिज्ञापत्रे, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या रॅकेटला आणखी किती महिला बळी पडल्या आहेत, याचा पोलिसांकडून कसून तपास सुरू असून आरोग्य विभागही या प्रकरणात सक्रिय झाला आहे. (Ovary trafficking racket)
 
 
Powered By Sangraha 9.0