अस्सी: करुण सामाजिक वास्तव आणि दारुण न्यायव्यवस्थेचे चित्रण (Film review)

21 Feb 2026 15:07:19
Assi
 
दररोज सकाळी हातात येणारं वर्तमानपत्र असो, टीव्हीवर झळकणार्‍या ‘ब्रेकिंग न्यूज’ असोत किंवा मोबाईलवर स्क्रोल होत राहणारी सोशल मीडियाची फीड, गुन्हेगारी विश्वाशी निगडित बातम्या आता धक्कादायक न राहता, नित्याच्याच झाल्या आहेत. पण, गुन्हेगारीसंबंधी या प्रत्येक ‘हेडलाईन’मागे एक जिवंत आयुष्य, एक उद्ध्वस्त कुटुंबही दडलेले असते. याच अस्वस्थ वास्तवाला भिडणारा ‘अस्सी’ हा चित्रपट दि. २० फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे.
 
या चित्रपटाचे नाव जरी साधे वाटले, तरी त्यामागचा आकडा काळजाचा ठोका चुकवणारा आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा ज्यांनी याआधी ‘मुल्क’ आणि ‘आर्टिकल १५’ सारख्या गंभीर चित्रपटांतून समाजातील ज्वलंत प्रश्नांवर थेट बोट ठेवले होते. त्यांनी या चित्रपटातही असाच आणखीन एक धाडसी आणि अस्वस्थ करणारा विषय हाताळला आहे. ‘अस्सी’ ही फक्त एका गुन्ह्याची कथा नाही, तर ती आपल्या व्यवस्थेची, मानसिकतेची आणि मौनाची गोष्ट आहे. ‘अस्सी’ अर्थात ‘८०’ हा केवळ आकडा नाही, देशभरात दररोज सरासरी ८० महिलांवर लैंगिक अत्याचार (बलात्कार) होतात, ही आकडेवारी अधोरेखित करण्यासाठी या चित्रपटाला ‘अस्सी’ असे अतिशय समर्पक नाव देण्यात आले आहे. चित्रपटात प्रत्येक २० मिनिटांनंतर एक लाल पट्टी येते. ते हेच दर्शवण्यासाठी की, आपल्या देशात प्रत्येक २० मिनिटाला कुठेतरी बलात्काराची एक वाईट घटना घडत आहे.
 
‘अस्सी’ मध्ये निरनिराळ्या गुन्ह्यांच्या घटनांचा उल्लेख असला, तरीही चित्रपटाची मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे परिमा (कानी कुसरुती) केरळमधून दिल्लीला स्थायिक झालेली, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी एका शाळेची शिक्षिका. पती (झीशान अय्युब) आणि मुलासोबत तिचं साधं, नियमित आयुष्य सुरू असतं. पण, एकेदिवशी अनर्थ घडतो. एका पार्टीहून घरी परतताना तिचे अपहरण करून पाच तरुणांकडून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला जातो आणि तिला गंभीर अवस्थेत रेल्वे रुळांवर टाकून दिले जाते. या घटनेनंतर तिच्या कुटुंबाचे आयुष्य, पोलीस तपास आणि न्यायालयीन लढा पूर्णपणे बदलून जातो. या प्रकरणात रावी नावाची वकील (तापसी पन्नू) परिमासाठी न्याय मिळवण्याचा प्रयत्न करते. ती कायद्यावर विश्वास ठेवते आणि न्यायव्यवस्थेच्या चौकटीत राहून लढाही देते. मात्र, या प्रवासात पोलीस यंत्रणेतील भ्रष्टाचार, पुराव्यांशी छेडछाड, साक्षीदारांवर दबाव आणि
समाजाची असंवेदनशीलता उघड होत जाते. आरोपी श्रीमंत घरातील असल्याने त्यांचा बेफिकीर वावर आणि न्यायप्रक्रियेची खिल्ली उडवणारी वृत्ती अधिक संतापजनक ठरते.
 
चित्रपट केवळ या एकाच गुन्ह्याची व्यथा सांगत नाही, तर देशातील बलात्काराच्या घटना, पीडितांच्या कुटुंबावर येणारी सामाजिक लाज आणि व्यवस्थेतील उणिवांवरही थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे, सर्वच कलाकारांचा कसदार अभिनय. तापसी पन्नूने वकिलीच्या भूमिकेत राग, अस्वस्थता प्रभावीपणे साकारली आहे. तिच्या कारकिर्दीतील आजवरची ही एक दमदार भूमिका म्हणावी लागेल. कानी कुसरुतीनेही अत्याचारातून सावरणार्‍या स्त्रीची वेदना आणि मानसिक आघात अतिशय वास्तववादी पद्धतीने मांडला आहे. कुमुद मिश्रा, जीशान अय्यूब आणि रेवती यांसारख्या साहाय्यक कलाकारांनीही प्रभावी साथ दिली आहे. काही न्यायालयीन प्रसंग धारदार संवादांमुळे लक्षात राहतात. पण, चित्रपट काही ठिकाणी अतिमहत्त्वाकांक्षी वाटतो.
 
पोलिसांचा भ्रष्टाचार, समाजाची मानसिकता, सूडाची भावना असे अनेक मुद्दे एकत्र हाताळताना कथानक थोडे विस्कळीत होते. सुरुवातीचे काही प्रसंग अत्यंत अस्वस्थ करणारे आहेत आणि काही प्रेक्षकांसाठी ते त्रासदायकही ठरू शकतात. उत्तरार्धात कथानकाची गती थोडी मंदावते आणि काही भाग रटाळ जाणवतात. कथा फिरुन फिरुन तेच दाखवते, असे जाणवते. चित्रपट चक्रावून टाकतो, विचार करायला भाग पाडतो. मात्र, ठोस उपाय सुचवत नाही आणि शेवटी नेमके काय निष्पन्न झाले, असा प्रश्न पडतो. त्यामुळे उत्तम दिग्दर्शनासह लेखनावर आणखी भर देण्याची गरज होती, असे भासते.
 
जर तुम्हाला सामाजिक वास्तवावर भाष्य करणारे, विचारप्रवर्तक चित्रपट आवडत असतील, तर हा चित्रपट नक्की पाहण्यासारखा आहे. दमदार अभिनय, ठोस संवाद आणि न्यायालयीन नाट्यमय घटना यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांवर प्रभाव टाकतो. मात्र, केवळ हलक्या-फुलक्या मनोरंजनाच्या अपेक्षेने जाणार्‍यांसाठी हा चित्रपट जड आणि भावनिक ठरू शकतो. ‘अस्सी’ हा केवळ एका गुन्ह्याचा मागोवा घेणारा चित्रपट नाही. तो व्यवस्थेच्या मर्यादा, न्यायप्रक्रियेतील अडथळे आणि पीडितेच्या आयुष्यावर होणार्‍या दीर्घकालीन परिणामांचा विचार करायला भाग पाडतो. प्रेक्षकांना अस्वस्थ करणं, हा त्याचा उद्देश आहे आणि त्यात ते यशस्वी ठरले आहेत.
 
दिग्दर्शक : अनुभव सिन्हा
 
पटकथा लेखक : अनुभव सिन्हा, गौरव सोलंकी
 
निर्मिती : टी सीरिज, बनारस मीडियावर्स प्रो.
 
कलाकार : तापसी पन्नू, कानी कुसरुती, कुमुद मिश्रा, रेवती, सत्यजित शर्मा, जतिन गोस्वामी, मोहम्मद झीशान अय्यूब
 
रेटिंग : ३.० स्टार
 
 
- अपर्णा कड
 
 
 
Powered By Sangraha 9.0