‘ध्रुवा’कार अदिती

21 Feb 2026 14:37:19
Aditi Madhavan
 
केवळ पुस्तकी संस्कृत न अभ्यासता; नृत्य, संगीत, वक्तृत्व, निबंध अशा वेगवेगळ्या स्पर्धा-उपक्रमांमधून संस्कृतचा परिचय करून देणार्‍या ‘ध्रुवा फेस्ट’च्या निर्मात्या अदिती माधवन यांच्याविषयी...
  
भारतीय कुटुंबपद्धती म्हटली की, आजीच्या गोष्टी आणि आजोबांसमोर बसून स्तोत्र म्हणून दाखवणे आलेच. त्यात जर आजोबा पौरोहित्य करणारे असतील, तर हे अधिक ठासून केले जाते. त्यांना पाठ असलेले सगळे श्लोक त्यांच्यासमोर बसून नातवंडांना म्हणून दाखवायला लागतात. मोघे कुटुंबात मात्र तेव्हा अदिती एकट्याच शाळकरी असल्यामुळे ‘परवचा’ पाठ करण्यासाठी त्यांना एकटीलाच बसवले जाई; पण त्यामुळे वाणीवर आणि मनावर जे संस्कार झाले, त्यातून संस्कृतशी नाळ जोडली गेली. शाळेत आठवीला संस्कृत घ्यावे की हिंदी, हा संभ्रम राहिला नाही. पण, आठवी-नववीला त्यांना संस्कृत अजिबात समजत नव्हते. पण, दहावीत त्यांना खरा गुरू भेटला. जगदीश इंदलकर सरांकडून आठवीपासूनचे सगळे व्याकरण शिकून त्यांनी दहावीला संस्कृतमध्येच सर्वाधिक गुण मिळवले. त्या सुटीमध्ये अदिती यांनी ‘संस्कृतभारती’चा शिक्षक प्रशिक्षण वर्ग पूर्ण केला. त्यामुळे संस्कृत संभाषणावर त्यांना प्रभुत्व मिळवता आले. त्यासोबतच ‘संस्कृतभारती’मध्ये वयाचे बंधन नसल्यामुळे तेथे उपस्थित सर्व वयोगटांच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे प्रशिक्षणदेखील मिळाले. त्यानंतर ‘संस्कृतभारती’च्या संभाषण शिबिरांत शिकवणे त्यांना आवडू लागले. पुढे त्यांनी अकरावीसाठी रुईया महाविद्यालयातच प्रवेश घेतला. अदिती या प्रारंभीपासून तशा स्वाभिमानी. आईवडिलांच्या त्या एकुलत्या एक असल्या, तरी त्यांच्यावर आपल्या शिक्षणाचा भार टाकणे त्यांना मान्य नव्हते. म्हणून बारावीनंतर लगेचच छोटी-मोठी नोकरी त्यांनी स्वीकारली. पण, वय १८ पेक्षा कमी असल्यामुळे त्यावर बंधने होती. तेव्हाच त्यांना एका लासमध्ये शिकवण्याची संधी मिळाली.
 
रुईयामध्ये शिकत असताना ‘मराठी वाङ्मय मंडळा’तील विविध उपक्रम, संस्कृत विभागाचे काही उपक्रम, संस्कृत नाटकांच्या छोट्या-मोठ्या स्पर्धा यामध्ये अदिती मोठ्या उत्साहाने सहभागी होत. त्यामुळे संस्कृत क्षेत्राची व्याप्ती आणि त्याचे कंगोरे उलगडत गेले. तसेच संस्कृतसोबत मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांवरही प्रभुत्व असल्यामुळे त्यांची सांगड घालण्याचाही अनुभव त्यांना रुईयातच मिळाला. तेथील विद्यार्थ्यांनी चालवलेले ‘मिळून सारे’ या मासिकाच्या त्या संपादिकादेखील होत्या. त्याच काळात गुरूंच्या मार्गदर्शनाने अदिती यांनी मुंबई विद्यापीठासोबतच ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’तूनही शिक्षण घेत संस्कृतात ‘विशारद’ पदवी मिळवली. पदवीनंतरच्या सुटीत त्यांनी ‘आयईएस संस्कृत केंद्रा’चा शिक्षक प्रशिक्षण वर्ग पूर्ण केला. त्यात त्यांना अभ्यासक्रम बनवण्याचेदेखील प्रशिक्षण मिळाले. याचा फायदा त्यांना पुढे ‘एमईटी’च्या ‘ऋषिकुल विद्यालया’त शिकवताना झाला. ‘एमए’साठी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर तेथूनच सुचवले गेल्यानुसार त्या तेथे शिकवू लागल्या. पण, ती शाळा नवीनच उभी राहात असल्यामुळे अदिती यांना अभ्यासक्रम तयार करण्याचेही कसब आजमावायची संधी मिळाली.
 
शाळेत शिकवण्यासोबतच अदिती यांचे ‘एमए संस्कृत (व्याकरण)’ शिक्षणही चालू होते. तेव्हा त्यांना डॉ. मल्हार कुळकर्णी आणि डॉ. बा. रा. दीक्षित सरांसारखे गुरू लाभले. त्यांच्याकडून त्या पारंपरिक गुरुपरंपरेनुसार व्याकरण शिकल्या. ‘एमए’ पूर्ण झाल्यावर त्या आणखी एका शाळेसाठी पाठ्यक्रम निर्माण करत. पण, पूर्णवेळ शिक्षण क्षेत्रातच काम करायचे ठरवल्यावर ‘बीएड’देखील पूर्ण केले. त्याच काळात त्या माधवन यांच्याशी लग्न होऊन एका तामिळ कुटुंबाचा भाग झाल्या. पण, त्यांनी तीही भाषा सहज आत्मसात केली. संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे, याचा त्यांना खरा प्रत्यय आला. लग्नानंतर निवास बदलल्यामुळे अदिती माधवन या आधीची नोकरी सोडून मुलुंडमधील वझे-केळकर महाविद्यालयात शिकवू लागल्या. संस्कृत शिकवताना नवनवीन प्रयोग करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे आणि विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे त्यांनी महाविद्यालयाचा ‘ध्रुवा’नामक एक ‘संस्कृत फेस्ट’ सुरू केला. यात नावाप्रमाणेच नाटक, संगीत आणि नृत्य यांचा समावेश असतो.
 
त्याचबरोबर आणखी काही उपक्रम घेत, एकूण दहा ‘इव्हेंट्स’ घेतले जातात. अर्थातच, या सर्वांची भाषा संस्कृतच. ‘ध्रुवा’वरील प्रेमाखातर विद्यार्थ्यांना नवनवीन गाणी पुरवण्याचेही काम काही संस्कृतप्रेमी लेखक, माजी विद्यार्थी स्वखुशीने करतात. त्यामुळे ‘ध्रुवा’च्या माध्यमातून आधुनिक संस्कृत साहित्यातही भर पाडण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. अदिती माधवन यांना २०१९ साली उद्यमशील शिक्षिका म्हणून ‘रघुनाथ पंडित राष्ट्रीय पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. तसेच २०२३चा ‘महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड’चा ‘संस्कृत भाषा प्रसार-प्रचार पुरस्कार’देखील त्यांना मिळाला आहे. संस्कृत अध्यापनात वेगवेगळे प्रयोग करत, संस्कृतेतर जनांनाही संस्कृतकडे आकर्षित करणार्‍या अदिती माधवन ‘दिवसेनैव तत् कुर्याद् येन रात्रौ सुखं वसेत्|’ या तत्त्वाने गेली २५ वर्षे कार्यरत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा!
 
 
 
- ओवी लेले
 
 
Powered By Sangraha 9.0