मुंबई : (Sarvam AI) नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट,2026’ मध्ये सादर करण्यात आलेल्या भारताच्या ‘सर्वम एआय’ प्रारुपाची ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाई यांना भुरळ पडली असून, ‘सर्वम एआय’च्या कामगिरीवर ते प्रभावित असल्याचे त्यांनी परिषदेत केलेल्या संबोधनात म्हटले आहे. ‘एआय’ क्षेत्रात भारतीय भाषा आणि संदर्भांनुसार, ‘सर्वम’ने केलेले कार्य उत्तम असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. त्याचवेळी जेव्हा जेव्हा भारतामध्ये येतो, तेव्हा इथे आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या विकास, नव्या विचारांवर होत असलेले कार्य ऊर्जा देणारे ठरत असल्याचेही सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे.
‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट, 2026’ मध्ये बंगळुरुच्या ‘सर्वम एआय’ प्रारुपांनी उत्तम कामगिरी करत ‘चॅटजीपीटी’ आणि ‘गुगल’च्या ‘जेमिनी’ला देखील मागे टाकले आहे. त्यामुळे ‘सर्वम’ची कामगिरी या क्षेत्रातील तज्ज्ञांनाही आचंबित करणारी ठरत आहे. ‘सर्वम’चे ‘सर्वम व्हिजन’ आणि ‘बुलबुल व्ही3’ ही प्रारुपे सध्या चर्चेत असून, यातील ‘सर्वम व्हिजन’च्या मदतीने एखाद्या छायाचित्रातील मजकूर टेक्स्ट स्वरुपात उपलब्ध होणार आहे. अशा पद्धतीचे कार्य करणार्या प्रारुपामध्ये अचूकता हाच सर्वात महत्त्वाचा निकष असतो. ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये सार्वजनिक केलेल्या या प्रारुपाद्वारे अचूकतेच्या संदर्भात ‘सर्वम व्हिजन’ने ‘गुगल जेमिनी’ला सुद्धा मागे टाकले आहे. छायाचित्रातील मजकूर टेक्स्ट स्वरुपात घेण्याबाबतची ‘सर्वम व्हिजन’ची अचूकता 84 टक्के असून, त्या तुलनेमध्ये ‘जेमिनी’ 80 टक्के तर चॅटजीपीटी 69.80 टक्के असल्याचे समोर आले आहे. याचबरोबर गणिते, तांत्रिक माहितीचे तक्ते अशा माहितीचे आकलन करण्याची ‘सर्वम व्हिजन’ची क्षमताही 94 टक्के असल्याचे ‘सर्वम’चे सर्वेसर्वा प्रत्युश कुमार यांनी सांगितले, तर त्याचवेळी ‘सर्वम’चे ‘बुलबुल’ हे कोणत्याही मजकुराचे ध्वनीमध्ये रुपांतरण करुन देणारे प्रारुप ‘सर्वम’ने विकसित केले असून, अनेक भारतीय भाषांचा आवाज ठरणार आहे.
‘सर्वम’ आणि ‘चॅटजीपीटी’मध्ये फरक काय?
भारतातील ‘सर्वम एआय’ राशप, ‘जेमिनी’ आणि ‘चॅटजीपीटी’मधील एक प्रमुख फरक म्हणजे ‘जेमिनी’ आणि ‘चॅटजीपीटी’ इंग्रजीला प्राधान्य देण्याबरोबच, उर्वरित भाषांना दुय्यम स्थान देते, तर ‘सर्वम’ला 22 भारतीय भाषांमध्ये प्रशिक्षित केले असल्याने, ते प्रादेशिक भाषांमध्ये उच्च अचूकता देऊ शकते. तसेच ‘सर्वम एआय’ दिसणार्या सर्व घटकांचे सखोल अर्थ लावण्यासही सक्षम आहे. भारतीय भाषांबरोबरच ‘सर्वम’ने जागतिक दर्जाच्या इंग्रजीसाठीचे मानकही पूर्ण केले आहेत.