किशोरीताईंना ‘नो एन्ट्री’

    20-Feb-2026   
Total Views |

Kishori Pednekar

मुंबई महापालिकेत उबाठा गटातील सत्तासमीकरण आणि अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली. उबाठा गटाने माजी महापौर तथा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना स्थायी समितीपासून यावेळी दूर ठेवले. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विरोधी पक्षनेत्याला स्थायी समिती किंवा इतर कोणत्याही समितीत स्थान मिळालेले नाही. त्यातही किशोरीताईंना तिजोरीपासून लांब ठेवले असल्यास साहजिकच चर्चा तर होणारच. अलीकडेच, महानगरपालिकेच्या सभागृहात स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती आणि ‘बेस्ट’ समितीच्या सदस्यांची निवड-प्रक्रिया पार पडली. आतापर्यंत चालत आलेल्या इतिहासानुसार, विरोधी पक्षनेता हा नेहमी स्थायी समितीचा सदस्य असतो. मात्र, उबाठा गटाने पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला स्थायी समितीपासून लांब ठेवले. महापौरांकडे दिलेल्या नावांच्या यादीत किशोरी पेडणेकर यांचा नावाचा समावेश नसून, उबाठा गटाने माजी महापौर श्रद्धा जाधव यांना स्थायी समितीत संधी दिली.

सध्यातरी यामागे दोन कारणे दिसतात. विरोधी पक्षनेतेपदी किशोरीताईंची निवड झाल्यानंतर पक्षांतर्गत नाराजी वाढली आणि त्यामुळेच अंतर्गत समतोल साधण्यासाठी पक्षाकडून हे पाऊल उचलण्यात आले असावे. दुसरी शयता म्हणजे, ‘कोरोना’ काळातील कथित ‘खिचडी’ आणि ‘बॉडी बॅग’ घोटाळ्यांचे आरोप. पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होऊ नये म्हणून आर्थिक निर्णय-प्रक्रियेपासून अर्थात, तिजोरीच्या चाव्यांपासून त्यांना दूर ठेवण्यात आले असावे. विरोधी पक्षासाठीही स्थायी समितीत स्थान मिळणे महत्त्वाचे असते. कारण, शहराच्या आर्थिक निर्णय-प्रक्रियेत आपला आवाज पोहोचवण्याची ही एक संधी असते. मात्र, आता किशोरी पेडणेकर यांना या अतिमहत्त्वाच्या समितीतून डावलण्यात आल्याने त्यांचे ‘मातोश्री’तील वजन कमी झाले का? असा सवाल उपस्थित होतोय. किशोरताईंनी मात्र या सगळ्या प्रक्रियेवर कमालीचे मौन बाळगल्याचे दिसते.
 
आता उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचाराविरोधात उचललेले हे पाऊल म्हणावे की, केवळ गटनेते आणि विरोधी पक्षनेतेपदाने किशोरी पेडणेकर यांची केलेली बोळवण म्हणावी, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे.

‘राज’कारणातला ‘यू-टर्न’


मुंबईच्या राजकारणात पडद्यामागील हालचाली कधीच थांबत नाहीत. फक्त प्रत्येक वेळी या हालचालींना वेगवेगळे संदर्भ असल्याने त्या कायम चर्चेचा विषय ठरतात. नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. इतर वेळी या भेटीला ‘सदिच्छा भेट’ असे नाव देऊन सोडूनही दिले गेले असते. परंतु, भेटीच्या ‘टायमिंग’मुळे ती चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
 
महिनाभरापूर्वी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती विरुद्ध ठाकरे बंधू अशी सरळ लढत रंगली होती. यादरम्यान, प्रचारसभांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू होती. राज ठाकरे यांनी तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला. मात्र, निकालानंतर चित्र बदलले. कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला. यावरून उबाठा गटाला मळमळही झाली. या सगळ्या घडामोडींनंतर आता राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंची भेट घेतली. उबाठा गटाने मुंबईत जागावाटपात मनसेला दिलेला दुय्यम दर्जा असो किंवा मग उबाठाच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचा प्रचार न केल्याचा आरोप असो, यामुळे या युतीतील हवा केव्हाच निघून गेली होती. शिवाय, मुंबईकरांनी या युतीला फारसा प्रतिसादही दिला नाही. म्हणूनच, कदाचित राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा शहाणपणा दाखवला असावा. मात्र, मनसेच्या या निर्णयावरही संजय राऊतांनी त्यांच्यावर नको-नको ते आरोप केले आणि नंतर चंद्रपूरमध्ये स्वत:च तोंडावर आपटले. या सगळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत उद्धव आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता, तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते, हे खुद्द राऊतांनीच कबूल केले.
 
थोडयात, उशिरा का होईना; उद्धव ठाकरेंसोबत युती फायद्याची नाही, याची जाणीव कदाचित राज ठाकरे यांना झाली असावी. आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमागचे कारण जरी अस्पष्ट असले, तरी बंधुप्रेमाचे गोडवे गाणार्‍या उबाठा गटाला ही जोरदार चपराक म्हणावी लागेल.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....