राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासावर आधारित ‘शतक : संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून संघकार्याचा इतिहास, विचारधारा, संघर्ष आणि समाजाशी असलेले नाते यांचे चित्रण पाहायला मिळेल. चित्रपटाची संकल्पना, निर्मितीमागील उद्देश, तांत्रिक वैशिष्ट्ये, संशोधनातील आव्हाने, तसेच समाजात संघाविषयी असलेल्या विविध धारणा आणि टीकांबाबत चित्रपट निर्माते वीर कपूर आणि दिग्दर्शक आशिष मल्ल यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही सविस्तर बातचीत...
‘शतक’ चित्रपटाची कल्पना नेमकी कशी आणि कधी सुचली?
वीर कपूर : चित्रपटामागची कल्पना हा खरं तर एक विचार आहे. संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासाचे चित्रण या चित्रपटात केले आहे. आम्ही आधीपासूनच चित्रपटसृष्टीशी जोडलेलो आहोत. संघाचे स्वयंसेवकही आहोत. त्यामुळे आम्ही पुस्तके वाचली. वाचनानंतर लक्षात आले की, विषय रोचक आहे आणि समाजात जे काही भ्रम आहेत, ते कसे दूर करता येतील, यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आणि वैयक्तिकरीत्या हा चित्रपट तयार केला. आम्ही संघाचे स्वयंसेवक आहोतच; परंतु संघ असे कार्य करत नाही. स्वयंसेवक किंवा कार्यकर्ते हे करू शकतात. त्यामुळे कथा रोचक असल्याने ती चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणावी, असे वाटले. तिथूनच या कथेची सुरुवात झाली आणि आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. चित्रपट तयार आहे.
दिग्दर्शक म्हणून चित्रपटनिर्मितीच्या वेळी कोणकोणती आव्हाने आली? आणि त्यातून आपण कशाप्रकारे मार्ग काढला?
आशिष मल्ल : सर्वात मोठे आव्हान हे होते की, आजच्या आपल्या पिढीने पुस्तके वाचणे सोडून दिले आहे. वाचन सहसा ते टाळताना दिसतात. चित्रपटाच्या निमित्ताने मी जेव्हा संशोधन सुरू केले, तेव्हा माझ्याकडे खूप पुस्तके पाठवण्यात आली आणि ती निर्मात्यांनी (वीर कपूर यांनी) वाचायला सांगितली. त्यानुसार, मी पुस्तके वाचायला सुरुवात केली; पण आमच्या टीममधील इतर सदस्यांना ती वाचणे कठीण जात होते. कारण, पुस्तकाची भाषा अतिशय लिष्ट हिंदीमध्ये होती. तेव्हाच एक गोष्ट लक्षात आली की, संघाला अधिकाधिक लोकांपर्यंत, समाजाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवायचे असेल, तर त्यात थोडा ‘ग्लॅमर’ जोडावा लागेल. आम्ही जी पुस्तके वाचत होतो, ती चांगलीच होती; पण आम्हाला ती दृश्यात्मक स्वरूपात सादर करायची होती. त्यानंतर आमच्या टीमने वर्षभर मेहनत करून संशोधन सुरू केले. १९२५ मध्ये संघाची स्थापना झाली; पण चित्रपटात आम्ही त्यापूर्वीचीही माहिती दाखवली आहे. संघाने कधीही आपले दस्तऐवजीकरण केले नाही. फोटो वगैरेची नोंद ठेवली नाही. त्यामुळे पूर्वीपासून आतापर्यंतचे संशोधन करणे थोडे कठीण होते. एकंदरीत, मिळालेल्या साहित्याला आजच्या भाषेत रूपांतरित करून ते प्रेक्षकांसाठी सादर करणे, हे एक मोठे आव्हान होते.
संघाच्या शताब्दी वर्षावर चित्रपट करणे, ही ऐतिहासिक जबाबदारी कशी पेलली?
वीर कपूर : संघाची यात्रा १९२५ पासून सुरू झाली. दिग्दर्शक साहेबांच्या (आशिष मल्ल) म्हणण्यानुसार, आम्ही या चित्रपटात संघस्थापनेच्या आधीपासूनची माहितीही दाखवली आहे. यामध्ये संघसंस्थापक प.पू.डॉ. हेडगेवार यांचे जीवन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यांना या मार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा कशी मिळाली, हे चित्रपटात दाखवणे आवश्यक होते. संघाने ज्या संघर्षातून पुढे येऊन १०० वर्षांची वाटचाल पूर्ण केली, यादरम्यान समाजाचा जो पाठिंबा संघाला मिळत गेला, त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखे संघटन आज इथपर्यंत येऊन पोहोचले आहे. त्यामुळे हा एकंदरीत प्रवास जनमानसापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून केले आहे. या चित्रपटाद्वारे ही कथा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, हीच आमची भावना आहे. संघाबद्दल पुस्तके आणि साहित्य उपलब्ध आहे, त्यावर बरेच काही लिहिले गेले; पण आजकालची मुले पुस्तके फारशी वाचत नाहीत. त्यामुळे आम्हाला समजले की, चित्रपट हे माध्यम थोडे अधिक सोपे आहे. २०० पानांचे पुस्तक वाचायला दिले, तर कदाचित काही जण २०-२५ पाने वाचतील; पण १०० टक्के लोकांपैकी फक्त पाच ते दहा टक्के लोकच संपूर्ण पुस्तक वाचू शकतात. ९० टक्के मुले पुस्तके वाचत नाहीत. चित्रपट हे असे माध्यम आहे की, दोन तास पाहिल्यानंतर कदाचित संपूर्ण ज्ञान मिळणार नाही; पण किमान एवढी जाणीव होईल की, संघाच्या इतिहासात असे-असे घडले होते. आपला इतिहास जो मोडतोड करून सांगितला गेला, तो प्रत्यक्षात एका सरळ रेषेप्रमाणे होता. शताब्दी वर्षानिमित्त आपला खरा इतिहास जनमानसापर्यंत पोहोचावा, यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे.
चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मधूनही ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना ठळकपणे उमटलेली दिसते; त्यामागचा मुख्य संदेश काय आहे?
वीर कपूर : संघाचे कार्य असे आहे की, राष्ट्राला सर्वोच्च मानून समाजाने पुढे जावे. राष्ट्राप्रती असलेले आपले कर्तव्य प्रत्येकाने पार पाडले पाहिजे. भारतमातेप्रती आपली जी कर्तव्ये आहेत, ती आपण पूर्ण केलीच पाहिजेत. भारताच्या या मातीशी आपण जोडलेलो आहोत आणि ही मातीच आपली आई आहे; ही भावना प्रत्येकात जागृत व्हायला हवी. सरसंघचालक प. पू. डॉ. मोहनजी भागवत यांनीसुद्धा आपल्या उद्बोधनातून बर्याचदा सांगितले की, "भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. जोपर्यंत येथे एकही हिंदू राहील, तोपर्यंत ही भूमी हिंदूराष्ट्र आहे आणि आपले हे राष्ट्र ‘भारत’ हिंदूराष्ट्रच राहील.” असे विविध प्रकारचे संदेश या चित्रपटाच्या माध्यातून देण्यात आले आहेत.
खरं तर शंभरी ओलांडलेल्या आणि तो ही रा. स्व. संघासारख्या संघटनेचा इतिहास दोन तासांत मोठ्या पडद्यावर मांडणे, हे सर्वस्वी आव्हानात्मकच. तेव्हा संघ शताब्दीच्या प्रवासातील कोणते टप्पे चित्रपटात विशेषतः अधोरेखित केले आहेत?
आशिष मल्ल : आपण पाहिले तर डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुजी यांविषयी आपण बरेच वाचले असेल, यापूर्वी आलेल्या चित्रपटांतून पाहिलेही असेल. ‘शतक’ चित्रपटातही या दोघांविषयी माहिती आहे; परंतु संघावर बंदी का लादण्यात आली? त्यामागची कारणे काय होती? आणि संघाने या आव्हानाचा सामना कशा पद्धतीने केला? याविषयी खासकरून चित्रपटातून पाहायला मिळेल.
कलाकारांचे ‘कास्टिंग’ कसे केले? त्यावेळी काय आव्हाने होती? चित्रपटात ‘एआय’चा वापर करण्यात आला आहे का?
आशिष मल्ल : चित्रपटामध्ये कुठेही ‘एआय’चा वापर केलेला नसून, एका अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. अशाप्रकारे ‘मोशन कॅप्चर’ करून संपूर्ण चित्रपट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे यास ‘एआय’ न म्हणता, ‘मशीन लॅण्डिंग’ तंत्रज्ञान म्हणणे उचित ठरेल. कलाकारांनी अभिनय करताना त्यांचे सर्वप्रथम चित्रीकरण केले गेले, त्यानंतर ‘मशीन लॅण्डिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून ‘फायनल शॉट्स’ तयार झाले. भारतात हे करणे शय होते? अशाप्रकारच्या प्रतिक्रियासुद्धा त्यानंतर आम्हाला मिळाल्या.
संघाविषयी असलेल्या टीका आणि वादग्रस्त मुद्द्यांना चित्रपटात कसे हाताळले आहे?
वीर कपूर : टीका करणारे टीका करतच असतात. इतिहासात ज्या गोष्टी घडल्या नाहीत, अशी कुठलीच गोष्ट आम्ही दाखवली नाही; जे घडले तेच समोर आणले. जे सत्य आहे, तेच जगासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान होते की नव्हते, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
विरोधकांकडून होणार्या टीकेकडे आपण कसे पाहता? हा चित्रपट त्यांचे मत बदलू शकेल, असे वाटते का?
आशिष मल्ल : संघाने आपल्या १०० वर्षांच्या प्रवासात अशी कुठली गोष्ट केलीच नाही, ज्याविरोधात टीका केली जाईल. विरोधकांकडून होणार्या टीका हा त्यांचा संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. तो स्थिर न राहता, काळानुसार बदलतच राहणार. तुम्ही कितीही चांगले करा, संघाने नवीन काही करण्याचा प्रयत्न केला की, विरोधक त्यांच्या दृष्टिकोनाप्रमाणे टीका करतच राहणार. कोणाला चंद्र चांगला दिसतो, तर कोणाला चंद्रावर डाग दिसतात, तसेच काहीसे.
वीर कपूर : आता जे संघाला उद्देशून टीका करताहेत, ते चित्रपट पाहिल्यानंतर टीका करणार नाहीत, हे निश्चित. हा चित्रपट समाजासाठी आहे आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती समाजाचे अंग आहे. संपूर्ण चित्रपट पाहिल्यास नक्कीच संघाकडे विरोधकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, असे वाटते.