India AI Impact Summit 2026 Congress Protest : ‘एआय समिट’चे थरुरांकडून स्वागत, युवा काँग्रेसकडून गदारोळ

    20-Feb-2026
Total Views |
SHASHI THAROOR
 
नवी दिल्ली : (India AI Impact Summit 2026 Congress Protest) नवी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये सुरु असलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट- 2026’ बाबत काँग्रेस पक्षातील वैचारिक दुफळी समोर आली आहे. एकीकडे या परिषदेच्या यशाचे आणि भव्यतेचे स्वागत काँग्रेस नेते शशी थरुर करत असतानाच, ‘युथ काँग्रेस’च्या कार्यकर्त्यांनी भारत-अमेरिका करारावरुन परिषदेच्या ठिकाणी आंदोलन करीत अपशकून करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिषदेवर काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न उपस्थित होतो. ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ या परिषदेच्या आयोजनाचे कौतुक करताना काँग्रेस नेते शशी थरुर यांनी म्हटले की, “परिषदेचे सुरुवातीचे दिवस अतिशय चांगले गेले असून, नंतरच्या टप्प्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असल्या, तरीही एवढ्या मोठ्या कार्यक्रमात अशा गोष्टी होत असतात.” तसेच, या कार्यक्रमाला असलेल्या जागतिक नेत्यांच्या उपस्थितीमुळे ‘एआय’ क्षेत्रात सर्वसमावेशकता पाहण्याची जगाची इच्छा असल्याचा संदेशही गेल्याचे थरुर यांनी म्हटले.
 
ज्यावेळी थरुर या परिषदेच्या आयोजनाचे कौतुक करत असताना, ‘काँग्रेस युथ’कडून मात्र परिषदेच्या ठिकाणी घुसखोरी करत अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नुकत्याच जाहीर झालेल्या भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेस युथच्या कार्यकर्त्यांनी भारत मंडपममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिषदेच्या ठिकणी अनेक जागतिक नेते आणि विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांची सीईओ उपस्थित होते. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराचा विरोध करणारे फलक घेऊन परिषदेच्या ठिकाणी घुसखोरी करताना, सुरक्षा रक्षकांनी या कार्यकर्त्यांना अडवले. त्यामुळे काँग्रेस युथच्या कार्यकर्त्यांनी टीशर्ट उतरवत अर्धनग्न अवस्थेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन, कार्यक्रमस्थळापासून बाहेर काढले.
देशाच्या प्रगतीमध्ये व्यत्यय हीच काँग्रेसी विरोधाची कल्पना!
‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट, 2026’मध्ये काँग्रेसने केलेले आंदोलन काँग्रेसचा अहंकार आणि निराशा दर्शवणारे असून, सरकारला लक्ष्य करण्यासाठी भारताचा अपमान करणे, हीच राहुल गांधींच्या विरोधाची कल्पना आहे. देशाने केलेल्या व्यापार करारांविषयी खोटे बोलून, राहुल गांधी भारताच्या विकासाला अडथळा आणू इच्छित असतानाच, तुमचे कार्यकर्तेही प्रतिष्ठित ‘एआय’ शिखर परिषदेत शर्टलेस मार्च करत आहेत. यातून ते 140 कोटी भारतीयांचा जागतिक स्तरावर अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसची ही कृती राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाच्या देशाविषयीच्या दृष्टिकोनाचे कटु सत्य उघड करते.
- पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्य मंत्री