Raj Thackeray : रस्ते, फ्लायओव्हर आणि ब्रिज बांधणे म्हणजे विकास नव्हे; ती फक्त सूज - राज ठाकरे

20 Feb 2026 16:58:51

raj thackeray
 
मुंबई : ( Raj Thackeray ) मुंबईत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले होते, जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील ‘नंदनवन’ निवासस्थानी भेट घेतली. या अनपेक्षित भेटीनंतर संभाव्य राजकीय समीकरणांच्या चर्चा रंगल्या. मात्र या सर्व चर्चांना स्वतः राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे. शुक्रवारी दिनांक २० फेब्रुवारीला मनसेच्या जिल्हा व तालुका प्रमुखांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की, कोणतीही भेट म्हणजे युती किंवा राजकीय डावपेच असे समजणे चुकीचे आहे. “आता निवडणुका संपल्या आहेत. पुढील निवडणुका तीन वर्षांनी आहेत. आज जे सत्तेत आहेत, त्यांना काही सूचना द्यायच्या असतील किंवा राज्यासाठी चांगल्या गोष्टी घडवून आणायच्या असतील, तर भेट घेण्यात गैर काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “उद्या मी मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
शहरांच्या प्रश्नांवर चर्चा
राज ठाकरे यांनी या भेटीमागील मुख्य कारण शहरांतील बिकट परिस्थिती असल्याचे सांगितले. “रस्ते, फ्लायओव्हर आणि ब्रिज बांधणे म्हणजे विकास नव्हे; ती फक्त सूज आहे,” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरांमध्ये सुरू असलेल्या रिडेव्हलपमेंटमुळे लोकसंख्या प्रचंड वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. जिथे पूर्वी ४० लोक राहत होते, तिथे आता ४०० लोक राहत आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
वाहनसंख्येत वाढ आणि रस्त्यांवर होणारी पार्किंग ही गंभीर समस्या असल्याचे सांगत त्यांनी रस्त्यावर गाड्या उभ्या करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सूचना केल्याचे सांगितले. शिंदे यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना, भुषण गगराणी यांना याबाबत फाईल पाठवण्याचे निर्देश दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
राजकीय तर्कांना नकार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला राजकीय वर्तुळात संभाव्य युतीचा रंग देण्यात येत असताना, राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की प्रत्येक भेटीतून राजकारण शोधणे योग्य नाही. “निकोप राजकारण उरलेले नाही. कुणी कुणाला भेटले की लगेच युती-आघाडीचे तर्क लावले जातात,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
 
मनसैनिकांना निवडणुकीची तयारी
राज ठाकरे यांनी आज दिनांक २० फेब्रुवारीला पक्ष कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला. “सत्तेत असलेल्यांचीही एक्सपायरी डेट असते. महाराष्ट्र सध्या आयसीयूमध्ये आहे,” असे म्हणत त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर टीका केली. मात्र ही परिस्थिती कायमस्वरूपी नसल्याचे सांगत त्यांनी आंदोलनांपेक्षा आगामी निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले.
एकूणच, शिंदे-ठाकरे भेटीमुळे निर्माण झालेल्या राजकीय चर्चांवर स्वतः राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण देत पडदा टाकला असला, तरी येत्या काळात या भेटीचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0