शिवाजी चाळक ही केवळ एक व्यक्ती नसून, ती एक नवनिर्माणाची चळवळ आहे. त्यांच्या अद्भुत कार्याविषयी...
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारताच अंगात वीरश्री संचारते. त्यांचे जीवितकार्य अन् इतिहास इतका देदीप्यमान आहे की, जगाच्या पाठीवरील कोणताही मराठी माणूस त्या जाज्वल्य इतिहासाच्या स्मरणाने नतमस्तक होतो. साहजिकच एखाद्या मराठी माणसाने कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यास त्याला गौरवाने ‘शिवाजी’ म्हणून संबोधण्यात येते त्या व्यक्तीचे नावही ‘शिवाजी’ असेल, तर मग त्या योगायोगाला ‘दुग्धशर्करा योग’ असेच म्हटले पाहिजे.
१९५९ रोजी जन्माला आलेले शिवाजी सखाराम चाळक यांच्याबाबत अजून एक अद्भुत योगायोग म्हणजे, त्यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन. मराठी साहित्यातील कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी. ‘नावात काय आहे?’ असे उद्गार जागतिक कीर्तीचा प्रतिभावंत विल्यम शेसपिअर याने काढले होते; पण शिवाजी चाळक यांच्या संदर्भातील नाव, जन्मदिवस आणि कर्तृत्व यांचा त्रिवेणीसंगम खरोखरच थक्क करणारा आहे. मराठीतील शिक्षणतज्ज्ञ आणि नामवंत कवी ग. ह. पाटील यांचे जन्मस्थळ असलेल्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीची चाळकवाडी ही एक छोटीशी वाडी. या चाळकवाडीतील प्राथमिक शिक्षकाच्या पोटी त्यांचा जन्म आणि कुटुंबातील वारकरी संप्रदायातील संस्कार, यामुळे बालपणापासून शिवाजी यांच्या सात्त्विक, सालस अन् संवेदनशील जीवनाची पायाभरणी झाली.
१९७२च्या दुष्काळाच्या झळा सोसताना किशोरवयात दुष्काळी कामातून श्रमसंस्कारही घडले. त्यापूर्वी १९७१च्या ‘बांगलादेश मुक्ती लढ्या’तील ‘नभोवाणी’वरील युद्धवार्ता ऐकत असतानाच, सुप्त काव्यप्रतिभा जागृत झाली आणि त्यातून वीरश्रीयुक्त ‘पोवाड्या’ने लेखनाचा ‘श्रीगणेशा’ झाला.पुढे शिक्षणानिमित्त घरापासून लांब उरळीकांचन येथे वसतिगृहातील वास्तव्यात मनातील एकाकीपण अन् घराची व्याकुळ करणारी आठवण त्यांनी कविता-लेखनाने काहीशी भरून काढली. स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना सुदैवाने साहित्यप्रेमी मित्रपरिवार लाभला अन् लेखन अधिकच प्रगल्भ होऊ लागले. विशेषत: शाळेपासून लाभलेली कवितेची सोबत जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अधिकच गहिरी होत गेली.
महाराष्ट्र शासनाच्या ‘जलसंपदा’ विभागातून ३८ वर्षांनंतर उपविभागीय अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतरही आजतागायत कविता त्यांच्या काळजाच्या कप्प्यात आराध्य देवतेप्रमाणे विराजमान आहे. याबाबत आणखी एक गमतीदार योगायोग म्हणजे, शिवाजी यांचे पाळण्यातील नाव ‘लक्ष्मण.’ लक्ष्मण ही व्यक्तिरेखा आपल्या भारतीय संस्कृतीत जानकीविषयी परम आदराचे प्रतीक म्हणून ज्ञात आहे आणि तीच अव्यभिचारी निष्ठा कविवर्य शिवाजी चाळक यांनी कवितेप्रति सदैव बाळगली. त्यातूनच ‘अर्घ्य’, ‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ हे कवितासंग्रह; ‘पाखरमाया’, ‘जंगल दंगल’, ‘उंदराचा टांगा’, ‘अंगतपंगत’, ‘चला जाऊ अंतराळी’, ‘पुस्तक माझे मित्र’ हे त्यांचे बालसाहित्य साकार झाले.
चाळक यांनी संपादनातही आपला ठसा उमटवून ‘नाणेघाटातील पाऊलखुणा’, ‘शेतीचे प्रातिनिधिक अभंग’, ‘मराठी भाषेवरील प्रातिनिधिक काव्यसंग्रह’, ‘म... मराठीचा भाग १’ व ‘२’ , ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यविश्व’ हा लेखसंग्रह अशी विपुल ग्रंथसंपदा सिद्ध केली. त्यांच्या साहित्यकृतींना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘एमए’च्या अभ्यासक्रमात ‘जंगल दंगल’ या बालकवितासंग्रहाचा समावेश करण्यात आला. याशिवाय, ‘गोल्डन पेज पब्लिकेशन्स’ प्रकाशित ‘इनसाइडर १६’ या मराठी-इंग्रजी प्रातिनिधिक काव्यसंग्रहात त्यांच्या कवितांचा समावेश आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांसह वेगवेगळ्या साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून शिवाजी चाळक यांनी व्यासपीठही गाजवले. खरे म्हणजे, ‘स्वान्त सुखाय’ वृत्तीच्या कोणत्याही साहित्यिकाने हे यश दिमाखात मिरवले असते; पण इथेच शिवाजी चाळक यांचे वेगळेपण जाणवते, ते म्हणजे सगळ्या कार्यात असूनही ते कुठेच दिसत नाहीत. कारण, त्यांचा मूळ पिंड हा कार्यकर्त्याचा. याच ऊर्मीतून त्यांनी १९९३ पासून ‘शिवांजली’ शैक्षणिक संकुलाची स्थापना केली. मागासवर्गीय मुलांसाठी शिक्षण आणि वसतिगृह, ‘तमाशा’ कलावंतांच्या मुलांना मोफत निवास व शिक्षण हा अभिनव प्रयोग त्यांनी यशस्वी केला. पुणे जिल्ह्यात चाळकवाडी, अंबोली आणि अहिल्यानगर जिल्ह्यात कळंब येथे त्यांनी सुरू केलेली माध्यमिक विद्यालये विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांना सुसंस्कारित करीत आहेत.
याचबरोबर १९९४ पासून त्यांनी ‘शिवांजली’ या नावाने साहित्य चळवळ सुरू केली. ‘कविता जगणार्यांची चळवळ’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या या साहित्य चळवळीच्या माध्यमातून कविवर्य शिवाजी चाळक यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरील असंख्य कवींना चळवळीशी जोडले आहे. प्रतिवर्षी २७ फेब्रुवारीला चाळकवाडी येथे भव्य ‘साहित्य महोत्सव’ साजरा केला जातो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला; त्यात नाणेघाटातील प्राचीन शिलालेख हा एक महत्त्वपूर्ण निकष होता; परंतु त्यापूर्वीच ‘शिवांजली’ महोत्सवात २० वर्षांपासून चाळकवाडी ते नाणेघाट यादरम्यान ‘भाषादिंडी’ काढण्यात येते. शिवाजी चाळक हे ‘भाषादिंडी’ व ‘शिवांजली’ महोत्सवाचे प्रवर्तक आहेत. कोणत्याही मदतीशिवाय ‘शिवांजली’ परिवाराने आजतागायत ३३ ‘शिवांजली’ महोत्सवांचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यामुळे मराठी साहित्य चळवळीतील ही दोन टोके ठळकपणे अधोरेखित होतात.
‘शिवांजली साहित्य महोत्सव’ हे चळवळीचे नुसते उत्साही स्वरूप नसून, साहित्यनिर्मिती मूल्ये जोपासणारी आणि वृद्धिंगत करणारी ही एक ग्रामीण चळवळ आहे, हे वेगळेपण जाणवते. ‘आमचा महोत्सव आमचे पाहुणे आमचे घरी... अन् आमचा महोत्सव आमचे पाहुणे आमची पंगत...’ ही अनोखी संकल्पना कल्पकतेने राबविली जाते. या उपक्रमांतर्गत चाळकवाडी पंचक्रोशीतील साहित्यिक आपल्या घरी पाहुण्यांच्या निवासाची सोय करतात. महोत्सवाची सांगता झाल्यावर पाहुण्यांना पंचक्रोशीतील पर्यटनस्थळांचे दर्शन घडविण्यात येते. अर्थातच, त्यामुळे एकदा ‘शिवांजली’ महोत्सवात सहभागी झालेला साहित्यिक वारकरी संप्रदायाप्रमाणे प्रतिवर्षी अंत:स्फूर्तीने चाळकवाडीला येतो.
सामाजिक भान असलेल्या शिवाजी चाळक आणि त्यांच्या समविचारी सहकार्यांनी अत्यंत अल्प शुल्कात सामूहिक विवाहाचा ‘चाळकवाडी पॅटर्न’ यशस्वीपणे राबविला. याशिवाय, वृक्षप्रेमी, पर्यावरणस्नेही ही त्यांची वेगळी ओळख पंचक्रोशीत आहे. शिवाजी चाळक ही व्यक्ती नसून, ती एक नवनिर्माणाची चळवळ आहे. सहधर्मचारिणी, सौभाग्यवती गीतांजली चाळक यांची स्नेहसावली, कुटुंबीयांची अन् समाजाची साथ, यामुळे शिवाजी चाळक विविध क्षेत्रांत अहोरात्र माणूसधर्माची पेरणी करीत आहेत. त्यांच्या कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
अतुल तांदळीकर