बाल ‘निकाह’च्या आड...

    20-Feb-2026   
Total Views |


Christian girl

१३ वर्षांच्या मरिया मसिहा या ख्रिश्चन बालिकेचे अपहरण ३० वर्षांच्या सेहरयार अहमदने केले. तिच्यावर क्रूर मानसिक-लैंगिक अत्याचार करत तिचे धर्मांतरण घडवून आणले. तिला त्याच्यापासून वाचवा, अशी तिच्या आईबाबांनी कोर्टात सातत्याने विनंती केली. कोर्टाने निकाल दिला. तिने इस्लाम कबूल केला. तसेच तिने त्याच्याशी ‘निकाह’ केला. त्यामुळे तिला आता त्याच्या सोबतच राहावे लागेल. कोर्ट तिला तिच्या आईबाबांसोबत पाठवणार नाही. ही घटना आहे, पाकिस्तानमधली. अत्याचार आणि क्रूरतेची हद्द तरी किती असावी? पाकिस्तानमध्ये न्याय हद्दपार झाला आहे, नव्हे, तो कधी नव्हताच! फाळणीनंतर निर्माण झालेला हा देश कायम अल्पसंख्याकांवरील अत्याचाराने रक्तरंजित झालेला आहे.

आताही या १३ वर्षांच्या बालिकेसोबत त्या ३० वर्षांच्या नराधमाने जे अत्याचार केले असतील, त्याचे परिणाम तिच्या शरीरासोबतच मनावर जखम बनून राहिले असतील. खेळण्याचे तिचे वय. मात्र, त्या नराधमाने तिचे भावविश्व आणि त्यासोबत तिचे बालपण क्रूरपणे चिरडले. या सगळ्यासाठी पाकिस्तानी कोर्टाचा न्याय काय, तर तिने त्याच्या सोबतच ‘बीबी’ बनून राहावे. अर्थातच, या नराधमाचा आधीचा ‘निकाह’ झालाच असेल. याआधीही २०२० साली मरियम नावाच्या १४ वर्षांच्या मुलीसोबत असेच घडले होते. मात्र, तिच्या राहत्या घरातून शस्त्राचा धाक दाखवत तिचे अपहरण करण्यात आले होते.तिच्या पालकांनी अपहरणकर्त्यांना ओळखले. पोलिसात तक्रार केली, तर पाकिस्तानी पोलिसांनी दटावून सांगितले, मुलीचे लफडे असेल. पण, काही महिन्यांनी त्या मुलीने स्वतःची सुटका केली आणि आईबाबांकडे आली. ती म्हणाली, तिथे तिला गुलाम बनवले गेले होते. त्या घरात खूप लोक होते. बायकाही होत्या. मरियमला घरकाम करणे, गुरे-गोठा सफाई करणे हे काम करावे लागे. तिला घराबाहेर जाता येऊ नये, कुणाशी संपर्कात येऊ नये म्हणून तिच्यावर पाळत ठेवली जाई.

घरकाम, गुलामी आणि लैंगिक शोषण यात ती पिळून गेली. तिने तिथून जीवाच्या आकांताने सुटका केली. मात्र, तेव्हाही न्यायालयाने गुन्हेगारांना सजा देण्याऐवजी मरियमला सल्ला दिला होता की, "अच्छी बीबी शौहर के साथ रेहती हैं|” हेच आहे पाकिस्तानचे खरे रूप. इथे अल्पसंख्याक हिंदू आणि ख्रिश्चन बालिकांवर-महिलांवर सातत्याने अत्याचार होत आहेत. अगदी दहा वर्षांच्या मुलीचेही अपहरण करून तिच्याशी ‘निकाह’ करण्याच्या घटना घडत आहेत. अर्थात, वर-वर देखावा म्हणून पाकिस्तानी कायद्यानुसार मुलींचे ‘निकाहा’चे वय १८ वर्षे आहे; पण लोकांच्या मते, ‘शरिया’नुसार १६ वर्षांखालील मुलींशी ‘निकाह’ काही बेकायदेशीर नाही. उलट, इस्लामी जीवन-पद्धतीचे अनुकरण करणे आहे.

एका सर्वेक्षणानुसार, २०२५ मध्ये पकिस्तानमध्ये सहा हजार, ५०० पेक्षा जास्त लैंगिक हिंसा आणि शारीरिक हल्ल्याच्या घटना घडल्या. विशेष म्हणजे, या घटनेतील ६० टक्के गुन्हेगार हे पीडितांच्या घरातलेच होते, तर २०२५ साली एक हजार, ४१४ हत्या आणि एक हजार, १४४ अपहरणाचे गुन्हे दाखल झाले. इतके गुन्हे दाखल झाले. मात्र, गुन्हेगारांना सजा होते का? तर गुन्हेगारांच्या समर्थनार्थ झुंडीच्या झुंडी उभ्या राहतात. त्यामुळे पाकिस्तानी न्यायालय काय करते; तर गुन्हेगाराने सजा म्हणून पीडित मुली-महिलेशी ‘निकाह’ करावा किंवा त्यांना तंबी देऊन सोडले जाते.

पाकिस्तानमध्येच असे आहे का? तर, जगभरातल्या इस्लामिक देशांमध्ये महिलांसोबत, त्यातही गैरमुस्लीम महिलांसोबत हेच घडते. आता तर काय, पाकिस्तानी आणि बांगलादेशी धर्मांध पाश्चात्त्य देशात जाऊन तिथेही गैरमुस्लीम मुली-महिलांना त्रास देण्यात पुढे आहेत. ब्रिटनमध्ये ‘ग्रुमिंग गँग’चे उदाहरण ताजेच आहे; पण इजिप्तचे उदाहरण पाहिले तर जाणवेल की, खरेच जगभरातले ते लोक सारखेच वागतात का? मागच्या वर्षी इजिप्तमधून आमना नावाची ख्रिश्चन बालिका शाळेत गेली, ती परत आलीच नाही. पोलिसांनी शोधाशोध केली. तिच्या सोशल मीडियाची तपासणी केली, तर तिची एक बेस्ट फ्रेंड होती, तिचे नाव अमिरा. अमिराच्या चॅटमधून खुलासा झाला की, ती आमनाला सातत्याने इस्लामची जादू, आशीर्वाद, इस्लाम स्वीकारला नाही; तर नरक मिळेल सांगायची. तिने आमनाची ओळख इस्लाम नावाच्या मुलाशी करून दिली. त्या दोघांनी मिळून आमनाचे धर्मांतरण केले आणि आमना पळून गेली. ‘लव्ह जिहाद’ नसतोच म्हणणारे या सगळ्या घटनांवर काय बोलतील? हिंदू मुलींचे आणि पालकांचेही डोळे उघडोत!

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.