अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या तीनच दिवसांत त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्राताई पवारांवर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा आणखीन एक अनपेक्षित प्रसंग ओढवला. एरव्ही असा शपथग्रहणाचा थाटामाटात संपन्न होणारा सोहळा अतिशय साध्या पद्धतीने पार पडला आणि सुनेत्राताई आपले ‘कर्तव्य’ निभावून पुन्हा बारामतीकडे रवाना झाल्या. पण, सुनेत्राताईंच्या नावाची उपमुख्यमंत्रिपदी चर्चा प्रारंभ होण्यापासून ते त्यांचा शपथविधी पार पडेपर्यंत शरद पवारांच्या गोटात पुरता कोलाहल माजल्याचे चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या अजितदादांबरोबर झालेल्या चर्चांचा दाखला देताना शरद पवार गटातील नेते थकत नव्हते.
पण, राजकारणात कधीही दोन अधिक दोन चार असे साधे गणित नसतेच मुळी. त्यातच जर समोर शरद पवारांसारखा मुरब्बी आणि धूर्त राजकारणी असेल, तर त्यांना राजकीय डावपेच खेळण्याची संधीच न देता, आपले राजकीय मोहरे चपळाईने खेळणे, हीच खरी राजनीती. अजितदादांच्या गटातील पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे ही मंडळी पवारसाहेबांच्याच हाताखाली तयार झालेली. त्यामुळे पवारसाहेब कधी, कसे ‘घड्याळा’चे काटे उलटे फिरवू शकतात, याची त्यांना पुरती कल्पना आहेच. अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर तर ही बाब प्रकर्षाने अधोरेखित झाली. म्हणूनच सुनेत्राताईंना पक्षाची सूत्रे आणि सरकारमधील उपमुख्यमंत्रिपद इतक्या घाईघाईत देण्याचा निर्णय झाला आणि सुनेत्राताईंसह अजितदादांच्या कुटुंबीयांनाही तोच मार्ग अगदी रास्त वाटला. पवारसाहेबांनी आपणच आता बारामतीचे सर्वेसर्वा आहोत, हे दाखवण्यासाठी दुसऱ्याच दिवशी नीरा नदीकिनारी दौराही केला. एवढेच नाही, तर पत्रकार परिषद घेत, सुनेत्राताईंच्या शपथविधीची कल्पना नसल्याचेही माध्यमांना सांगून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुनेत्राताईंनी दादांच्या निधनानंतर राजकारण करू नये, असा सूर आळवणाऱ्यांनी तोच तर्क ते पवारसाहेबांसाठी लागू करतील का, हाच खरा प्रश्न.
अजितदादांच्या राष्ट्रवादीने पवारसाहेबांना भावनिक, कौटुंबिक कार्ड खेळून दोन्ही पक्ष ताब्यात घेण्याच्या मनसुब्यांना सुरुंग लावला आहे. पवारसाहेबांच्या या एकेकाळच्या पठ्ठ्यांनीच त्यांनाच ‘चेक-मेट’ करून, काही क्षण बंद पडलेल्या राष्ट्रवादीच्या ‘घड्याळा’ची टीक-टीक पुन्हा सुरू करुन अचूक वेळ साधली, हेच खरे!
वहिनीसाहेब
सुनेत्राताईंनी अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या काही तासांत शपथ घेण्याबाबत दोन मतप्रवाह ठळकपणे दिसून आले. काहींनी सुनेत्राताईंनी दाखविलेल्या राजकीय समयसूचकतेचे कौतुक केले, तर काहींनी त्यांच्या या खेळीला असंवेदनशील ठरवत टीकेची झोडही उठवली. सामान्य जनमानसात समाजमाध्यमांवरून अशा संमिश्र प्रतिक्रिया उमटणे काहीसे अपेक्षितच होते. शंभर तोंडे आणि शंभर मते. परंतु, अग्रलेख मागे घेण्याचा कुलौकिक गाठीशी असलेल्या एका दैनिकाने थेट ‘सुनेत्राताई... तुम्ही चुकलात!’ म्हणून ‘विशेष संपादकीय’ खरडून आपली मळमळ व्यक्त केली. एवढेच नाही, तर याच दैनिकातील गेल्या दोन दिवसांतील मथळे पाहता, सुनेत्राताईंचा शपथविधी हे जणू ‘राजकीय षड्यंत्र’ असल्याचेच भासवण्याचा केविलवाणा प्रकारही तितकाच खेदजनक! कुणी म्हणेल, हा ज्याच्या-त्याच्या माध्यम-स्वातंत्र्याचा, दृष्टिकोनाचा भाग. असे असले तरीही पत्रकारितेत किमान साधनशूचिताही बाळगावी लागतेच. परंतु, कुणाला तरी खुश करण्यासाठी म्हणून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांवर असे ताशेरे ओढणे, हे सर्वस्वी दुर्दैवीच. म्हणजे एकीकडे अशा माध्यमांनी महिलांचे अधिकार, महिलांचा राजकीय सहभाग याविषयी प्रचंड आग्रही भूमिका मांडायची. पण, प्रत्यक्षात जेव्हा एखादी महिला तिच्यावर कोसळलेले मोठे संकट गिळून, पक्षासाठी, कार्यकर्त्यांसाठी आणि तिच्या स्व. पतीच्या स्वप्नपूतसाठी त्याची जागा घेते, तेव्हा तिची अशी निंदानालस्ती करणे, हे अशोभनीयच!
असो. सुनेत्राताई राजकारणात नवख्या नाहीत. त्यामुळे लोकांच्या, माध्यमांमधील टीका-टिप्पण्यांना कशा प्रकारे सामोरे जायचे, याची त्यांनाही कल्पना आहेच. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पवार कुटुंबीयांनाही त्या अंतर्बाह्य ओळखून आहेत. तेव्हा, कुणी चावी देईल आणि त्यानुसार सुनेत्राताई ‘घड्याळा’चे काटे फिरवतील, असे होणे नाही. त्या केवळ स्व. अजितदादांच्या पत्नी नाहीत, तर सामाजिक, शैक्षणिक पटलावरही त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. आता मात्र सुनेत्राताईंकडे बारामतीकरांच्याच नाही, तर अवघ्या महाराष्ट्रवासीयांच्या नजरा खिळून आहेत. तेव्हा, वहिनीसाहेबांना या संकटसमयी नेटाने उभे राहण्याचे, लढण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची