मुंबई: (Sharad Pawar) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्या पक्षाचे विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मात्र, या चर्चांबाबत दोन्ही पक्षांकडून पूर्णपणे विसंगत भूमिका समोर येत आहेत. (Sharad Pawar)
त्यामुळे खरंच विलीनीकरण होणार की, केवळ राजकीय स्वार्थासाठी हा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय, असा संभ्रम सध्या निर्माण झाला आहे. खरेतर, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी तर सर्वात आधी राष्ट्रवादी एकत्र यावी अशी दादांची इच्छा होती, असे जाहीरपणे सांगितले. त्यानंतर शरद पवार यांनीही या चर्चांवर शिक्कामोर्तब केले. (Sharad Pawar)
शरद पवारांसह त्यांच्या पक्षातील नेत्यांनी केलेला विलीकरणाबाबतचा हा दावा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर आहे. मात्र, त्याचवेळी अजित पवार गटातील नेते हे सगळे ठामपणे फेटाळून लावताना दिसतात. शिवाय अशा कोणत्याही चर्चा झालेल्या नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे साहाजिकच शरद पवारांच्याच पक्षाला विलीनीकरणाची इतकी घाई का? असा प्रश्न उपस्थित होतो. (Sharad Pawar)
दोन्ही राष्ट्रवादींमध्ये विलीनीकरणाबद्दल खरंच चर्चा झाली असेल आणि अजित पवार यांनी यासाठी होकार दिला असेल तर, शरद पवार भाजपसोबत सरकारमध्ये सामील होणार होते का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. किंबहुना, शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील कुणीही यावर बोलायला तयार नाहीत. दुसरीकडे, शरद पवार गटाच्या आजच्या राजकीय वास्तवाकडे पाहिले, तर या पक्षाला अनेक आघाड्यांवर संघर्ष करावा लागतो आहे. महापालिका निवडणूकीनंतर तर जवळपास पक्ष संपल्यात जमा असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर विलीनीकरणाचा मुद्दा पुढे आणून 'पुन्हा एकत्र येऊ शकतो' असा संकेत देणे, हे कार्यकर्त्यांना सावरण्याचा आणि राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न तर नाही ना? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. शिवाय दोन्ही पक्ष एकत्रित झाले, तर अनेकांना आपणच पक्षाचे मालक असे स्वप्न पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच विलीनीकरणाची ही धडपड असावी का? (Sharad Pawar)
याऊलट अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असल्याने प्रशासनावरची पकड, संसाधने आणि राजकीय स्थैर्य यामुळे त्यांना विलीनीकरणाची कोणतीही तातडीची गरज दिसत नाही. त्यामुळेच कदाचित ते या चर्चांपासून अंतर ठेवताना दिसतात. शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याच्या राजकारणात ‘घाई’ हा शब्द सहसा वापरला जात नाही. पण त्यांच्या पक्षातील नेते ज्या पद्धतीने विलीनीकरणाच्या कथित चर्चांचा उल्लेख करत आहेत, त्यातून रणनीतीपेक्षा असुरक्षिततेची छाया अधिक गडद होताना दिसते. आजघडीला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांपेक्षा त्या चर्चांमागची घाई, गोंधळ आणि विरोधाभास अधिक ठळक दिसतो. त्यामुळे प्रश्न विलीनीकरणाचा नसून, कुणाला विलीनीकरण हवे आहे आणि का? असा आहे. या प्रश्नाचे उत्तर सध्या शरद पवार गटासाठी अधिक अस्वस्थ करणारे ठरते आहे. (Sharad Pawar)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....