मुंबई : (Dhavalakshmi) डहाणूच्या किनाऱ्यावरुन सॅटेलाईट टॅग लावून सोडलेली धवललक्ष्मी नावाच्या मादी कासव ओमनपासून ६६० किलोमीटर अंतरावर आहे. येत्या काळात ती ओमनच्या दिशेने सरकरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही कासव ओमनच्या सागरी परिक्षेत्रामधून या ठिकाणी आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. (Dhavalakshmi)
सागरी कासवांचे स्थलांतर किंवा त्यांच्या कायमस्वरुपी अधिवासाचा मागोवा घेण्यासाठी दोन प्रकारे त्यांचा शास्त्रीय अभ्यास केला जातो. त्याच्या परांवर खुणचिठ्ठी (टॅग) लावून किंवा कवचावर ’सॅटेलाईट ट्रान्समीटर’ लावून. ’सॅटेलाईट ट्रान्समीटर’द्वारे आपल्याला दररोज त्यांची इत्यंभूत माहिती अवगत होते. 'कांदळवन कक्षा'ने 'भारतीय वन्यजीव संस्थान'च्या (डब्लूआयआय) मदतीने गुरुवार दि. २० नोव्हेंबर रोजी डहाणू येथील सागरी कासवाला 'सॅटलाईट टॅग' लावून समुद्रात सोडले होते. डहाणूच्या किनाऱ्यावर जखमी अवस्थेत वाहून आलेले हे मादी कासवाला उपचाराअंती सोडण्यात आले होते. त्यावेळी तिचे नामकरण धवललक्ष्मी, असे करण्यात आले होते. आता २८ जानेवारीपर्यंत तिने ओमनच्या दिशेने आपला प्रवास सुरु ठेवला आहे. कांदळवन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, धवललक्ष्मीने आपला वेग कमी केला असला तरी, ती नैऋत्य दिशेने पुढे जात आहे. ती सध्या मुंबईच्या पश्चिमेस सुमारे ९२० किलोमीटर आणि ओमानच्या किनाऱ्यापासून अंदाजे ६६० किलोमीटर अंतरावर आहे. (Dhavalakshmi)
समुद्रात सोडल्यानंतर १४ डिसेंबरपर्यंत धवललक्ष्मी डहाणूपासून ८० किलोमीटर अंतरावरच होती. मात्र, त्यानंतर तिने जोर धरला. २१ डिसेंबर रोजी तिचे स्थान सोमनाथ समुद्र किनाऱ्यापासून ८५ किलोमीटर अंतरावर, तर डहाणूपासून २०० किलोमीटर अंतरावरुन नोंदवण्यात आले. त्यानंतर २९ डिसेंबर रोजी ती पोरबंदरपर्यत पोहोचल्याची माहिती संशोधकांना मिळाली. २९ डिसेंबर ते २८ जानेवारी या महिन्याभराच्या काळात तिने पश्चिमेकडेच आपला प्रवास सुरू ठेवला आहे. आजपर्यंत तिने २ हजार २०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. विशेष म्हणजे ओमनमध्ये सॅटलाईट टॅग लावलेली कासवे ही अरबी समुद्राच्या मध्यापर्यंत पोहोचत नसल्याची नोंद करण्यात आली नव्हती. अशा परिस्थितीत डहाणूत आढळलेले हे कासव अरबी समुद्र पार करुन ओमनच्या दिशेने प्रवास करत आहे. (Dhavalakshmi)
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.