नुकतेच ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतातीलही 16 वर्षांखालील मुलांच्या समाजमाध्यमांच्या वापरावर बंदी आणावी, या चर्चेने जोर धरलेला दिसतो. याचे कारण म्हणजे, समाजमाध्यमांचे जडलेले व्यसन. पण, केवळ निर्बंध हा त्यावरील एकमेव उपाय, मार्ग असू शकत नाही. मुलांमध्ये खेळाची गोडी निर्माण करण्याबरोबरच वाचनाचीही आवड निर्माण करणे ही काळाची गरज म्हणावी लागेल. त्यादृष्टीने क्रीडा क्षेत्रातील नामवंतांनी वाचन-लेखनासंदर्भात समाजाला प्रेरित करत स्वतःही त्याचे कसे पालन केले, याचा चित्ररुपी आढावा घेणारा आजचा लेख...
आता 2026 या नववर्षाच्या प्रारंभाला बघता बघता एक महिना उलटला. गतसालाच्या अखेरीस अनेकांनी नववर्षाचे काही संकल्प केले असतील. अनेकजणांनी त्यात ‘मी रोज कशाचे ना कशाचे तरी नियमित वाचन करत जाईन,’ तर काहींनी त्याच्या जोडीला ‘स्वहस्ते लिहित माझ्या हस्ताक्षराची सवय ठेवीन,’ असे ठरवलं असेल. अनेकांनी त्याचा श्रीगणेशा केलाही असेल. पण, जर काहींचे मुहूर्त टळले असतील, तर अशांना प्रोत्साहित करण्यासाठी आताच दोन दिनविशेष होऊन गेले आहेत. त्यातील एक आहे समर्थ रामदासांच्या दासबोधाचा. मंगळवार, दि. 27 जानेवारीला दासबोध जयंती होऊन गेली. समर्थ रामदासांच्या दासबोधातील एकेका समासात एकेक विषय मांडलेले आहेत. त्यांतील एका समासात, दररोज काहीतरी लिहिणे, वाचन करणे आणि आत्मचिंतन करणे, यावर भर दिला आहे. याचा अर्थ दैनंदिन जीवनात चांगल्या विचारांचे लेखन, अनुभव टिपणे आणि ज्ञानाचे संवर्धन करून स्वतःची प्रगती करणे असा होतो. समर्थांनी दैनंदिन लेखनाचे व वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे| प्रसंगी अखंडित वाचीत जावे॥’ असे म्हटले आहे. समर्थांच्या या विचारांना बळकटी देणारा दुसरा दिनविशेष म्हणजे शुक्रवार, दि. 23 जानेवारीला होऊन गेलेला ‘जागतिक हस्ताक्षर दिन.’
क्रीडा क्षेत्र या दिनांमध्ये मागे नाही. क्रीडा क्षेत्रातील नामवंतांनी वाचन-लेखन यासंदर्भात समाजाला प्रेरित करत स्वतःही त्याचे कसे पालन केले आहे, हे जाणण्याचा योग यावेळच्या आपल्या ‘क्रीडाविश्व’तील ‘वाचन द्वादशी’च्या माध्यमातून आपल्याला आला आहे.
शब्दप्रभू प्राचार्य शिवाजीराव भोसले त्यांच्या व्याख्यानात सांगून गेले आहेत की, वाचन-लेखन यांचा व्यासंग हा आपल्या उत्कर्षाचा मार्ग आहे, हे ध्यानी ठेवावे. भाषणे ऐकावी, उतारे लेखणीने उतरवावे, ग्रंथ वाचावे, पण त्याचा मनाशी विचारसुद्धा करावा. शब्दप्रभू आणि समर्थ रामदास स्वामींचे विचार या विविध देशांतील क्रीडापटूंनी अंगी बाणवले असतील, हे नक्की; म्हणून तर ते यशस्वी झालेले आपल्याला आज दिसत आहेत.
चला तर मग, ज्यांनी वाचन-लेखन नियमित चालू केले नसेल, त्यांनी आता चालू करायला हरकत नाही. कारण अशा शुभकार्याचा प्रारंभ करायला मुहूर्त लागत नसतो आणि वयदेखील!
जागतिक पातळीवर, जागतिक लोकसंख्या पुनरावलोकन आणि इतर अहवालांनुसार वाचनामध्ये अमेरिका आणि भारत आघाडीवर आहेत. अमेरिकन नागरिक वर्षाला सरासरी 17 पुस्तके वाचतात, तर भारतीय नागरिक सरासरी 16 पुस्तके वाचून दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पण वाचनाच्या वेळेचा विचार केल्यास, भारत आघाडीवर असून इथे प्रतिव्यक्ती दर आठवड्याला सुमारे दहा तासांपेक्षा जास्त वाचन केले जाते.
भारतीय हॉकीचा गोलरक्षक पीआर श्रीजेशने आता पुढील पिढीला हॉकीचे धडे देण्यात स्वतःला गुंतवून ठेवलं असलं, तरी त्याने वाचन-लेखन आवड अजूनही टिकवून ठेवलेली आहे. पुस्तकांमधून प्रभावी टिपणे काढणारा हा वाचन-लेखनप्रेमी पीआर श्रीजेश.
‘कँडीक्रश’ आणि ‘इन्स्टाग्राम’च्या दिवसांपूव, क्रिकेट सामन्यापूव दरवाजे उघडण्याची लांब प्रतीक्षा करतानाचा कंटाळा घालवण्यासाठी अमेरिकेत ‘कँडीपल्स’ आणि ‘कॉमिक्स’चा आधार घेतला जात असे.
श्रीजेश हॉकीच्या मैदानावर किंवा निवासस्थानी सापडला नाही, तर त्याला एखाद्या पुस्तकालयात शोधा; नक्की सापडेल!
क्रिकेटच्या मैदानावर खूप वाचन होत असते. खेळाडूंना परिस्थितीचा अंदाज घ्यावा लागतो. पंचांना प्रकाशाचा अंदाज घ्यावा लागतो. फलंदाजांना गोलंदाजांची लाईन आणि लेंथ ओळखावी लागते. पण, त्याव्यतिरिक्त, लिखित शब्दांवर वेळ घालवण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. कदाचित याच कारणामुळे, 2017च्या विश्वचषकातील एका सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याची वाट पाहात असताना रुमी नावाच्या एका सुप्रसिद्ध कवीच्या कवितांचे पुस्तक वाचतानात गुंगलेली भारतीय महिला क्रिकेटची माजी कप्तान मिताली राज एका फोटोत दिसत आहे.
लहानपणापासून आपल्या मुलांना पुस्तकं हाताळायला दिली, तर त्यांच्यात वाचनाची आवड लहानपणापासून निर्माण होते. त्यामुळे विकास आणि भाषा कौशल्यांमध्ये वाढ व्हायला मदत होते. मोबाईल फोन वापरण्यापेक्षा अगदी लहान वयातच पुस्तकांची ओळख करून देणे महत्त्वाचे आहे, असे जाणकार सांगतात. जेव्हा तुम्ही वाचायला बसता, तेव्हा बच्चेकंपनीलाही जोडीला घ्या. असे सिद्ध झालं आहे की, एकत्र वाचन केल्याने मुले आणि त्यांच्या पालकांमध्ये बंध निर्माण होण्यास मदत होते.
जय शेट्टीलिखित ‘थिंक लाईक अ माँक’ हे पुस्तक नकारात्मकता दूर करून अंतर्गत शांतता आणि जीवनाचे खरे उद्दिष्ट शोधण्यासाठी संन्याशासारखा विचार कसा करावा, हे शिकवते. या पुस्तकाची मूळ इंग्रजी आवृत्ती श्रीजेशसारख्या ऑलिम्पियनलाही स्वतःच्या आत डोकावून, मानसिक स्थिरता मिळवून एक उत्तम व्यक्ती बनण्यास प्रवृत्त करते.
चदलावदा आनंद सुंदररामन भवानी देवी अर्थात सीए भवानी देवी भारतीय तलवारबाज ऑलिम्पियन. हीपण वाचनप्रेमी
मग तुम्ही मोठे होता आणि खऱ्याखुऱ्या पुस्तकांकडे वळता; कारण रांगा काही लहान झालेल्या नसतात. गाडीची वाट बघता बघता आमचं पुस्तकप्रेमही मोठं होतं.
‘टायगर’ आणि नंतर ‘टायगर ॲण्ड स्पीड’ हे एक क्रीडाविषयक कॉमिक होते, ज्यामध्ये जिऑफ बॉयकॉट, इयान बोथम आणि टोनी ग्रेग यांच्यासारख्या व्यक्तींचे लेख असायचे. ते जाऊ द्या; कॉमिक बुक वाचण्यासाठी तुमचे वय कधीच जास्त होत नाही. इयान बॉथम सुनील गावस्करला सांगतानाचे एक संग्रहित छायाचित्र.
अर्थसंकल्प 2026-27: क्रीडा क्षेत्रासाठीच्या निधीत 18 टक्क्यांनी वाढ
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिभा विकास, क्रीडा विज्ञान, पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ विकासाला समाविष्ट करणारी एक सर्वसमावेशक योजना यंदाच्या अर्थसंकल्पात मांडली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 चा भाग म्हणून सुधारित ’खेलो इंडिया मिशन’ सुरू करण्याची घोषणा केली, ज्यामुळे खेळांना दीर्घकालीन राष्ट्रीय विकासाचे एक प्रमुख क्षेत्र म्हणून स्थान मिळाले आहे. संसदेत अर्थसंकल्प सादर करताना, सीतारामन यांनी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयासाठी 4,479.88 कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली, जी मागील वर्षाच्या 3 हजार 794.30 कोटी रुपयांच्या तरतुदीपेक्षा 685.58 कोटी रुपयांनी अधिक आहे. ही वाढ 18 टक्क्यांहून अधिक असून, एक संघटित आणि शाश्वत क्रीडा परिसंस्था निर्माण करण्यावर सरकारचे नव्याने लक्ष केंद्रित असल्याचे यातून अधोरेखित होते. प्रस्तावित ’खेलो इंडिया मिशन’ ही सध्याच्या ’खेलो इंडिया’ कार्यक्रमाची एक विस्तारित आणि सुधारित आवृत्ती आहे. अर्थमंत्र्यांच्या मते, हे मिशन केवळ प्रतिभावान खेळाडू ओळखण्यापुरते मर्यादित न राहता, पुढील दहा वर्षांत देशभरातील खेळाडूंसाठी सर्वांगीण विकासाचा मार्ग तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवेल.
’खेलो इंडिया मिशन’चा एक प्रमुख आधारस्तंभ क्रीडा विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण असेल. यामध्ये खेळाडूंचे दीर्घायुष्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी डेटा-आधारित कामगिरी विलेषण, दुखापत व्यवस्थापन प्रणाली आणि वैज्ञानिक प्रशिक्षण पद्धतींचा समावेश आहे.
प्रशिक्षण आणि स्पर्धा या दोन्हींसाठी पायाभूत सुविधांचा विकास हा आणखी एक मुख्य घटक म्हणून ओळखला गेला आहे, ज्याचा उद्देश सर्व प्रदेशांमध्ये दर्जेदार सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करणे आहे. सीतारामन यांनी ’समर्थ पहल’ योजनेचीही घोषणा केली, ज्याचा उद्देश परवडणाऱ्या क्रीडा उपकरणांचे उत्पादन आणि उपलब्धता वाढवणे, तसेच क्रीडा विकासाला रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासाशी जोडणे आहे. अर्थमंत्र्यांनी अधोरेखित केले की ’खेलो इंडिया मिशन’ भारताच्या व्यापक विकास उद्दिष्टांशी आणि जागतिक क्रीडा केंद्र म्हणून उदयास येण्याच्या महत्त्वाकांक्षेशी सुसंगत आहे. क्रीडा व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि कार्यक्रम संचालन या क्षेत्रांतील संधींचा विस्तार करून, हे मिशन आर्थिक वाढीस हातभार लावेल.
भारताचा क्रीडा विकासासाठीचा हा प्रयत्न अशा वेळी होत आहे, जेव्हा तो 2030 मध्ये राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करणार आहे आणि 2036 च्या ऑलिम्पिकसाठी बोली लावणार आहे.
- श्रीपद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू, पुणे आहेत.)
9422031704