महाराष्ट्रातील बालसंरक्षणाच्या इतिहासातील अत्यंत कठीण लढ्यांपैकी एका लढ्याचा केंद्रबिंदू ठरलेल्या अनिल अर्जुन गावडे यांच्याविषयी...
शेतावर पडलेले दवबिंदू, गुरांचा आवाज आणि कष्टानेच आयुष्य घडते, ही शिकवण देणारे वातावरण अशी लहानशा ग्रामीण गावातील पहाट नेहमीसारखीच होती. याच मातीमध्ये घडलेला एक तरुण पुढे महाराष्ट्रातील बालसंरक्षणाच्या इतिहासातील अत्यंत कठीण लढ्यांपैकी एका लढ्याचा केंद्रबिंदू बनेल, याची कुणालाच कल्पना नव्हती. हा तरुण म्हणजे अनिल अर्जुन गावडे!
अनिल यांचा जन्म मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात कष्टी या गावातला. अनिल यांचे बारावीपर्यंतचे शिक्षणही गावातच झाले. 2000 साली ते अहिल्यानगर शहरात आले. याचवेळी पेमराज महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्याशी त्यांची गट्टी जमली. त्यांच्याच मार्गदर्शनात अनिल यांची सामाजिक जडणघडण झाली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, त्यांनी ‘स्नेहालय’ या संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम सुरू केले. शेतकरी कुटुंबातून आलेल्या अनिल यांना गरिबी, अन्याय आणि संघर्ष यांची प्रत्यक्ष ओळख होती. स्वयंसेवक म्हणून सुरू झालेली ही वाटचाल लवकरच त्यांच्या आयुष्याचा ध्यास बनली. ‘स्नेहालय’चे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली 2001 साली त्यांनी औपचारिकरित्या ‘स्नेहालय’मध्ये प्रवेश केला आणि 2004 मध्ये ‘चाईल्डलाईन टीम’मध्ये पूर्णवेळ जबाबदारी स्वीकारली. ‘चाईल्डलाईन समन्वयक’ म्हणून काम करत असताना त्यांच्या आयुष्यातील सर्वांत कठीण परीक्षा सुरू झाली.
अनिल यांनी प्रत्यक्ष अनुभवलेली घटनाही तशीच होती. शहरातील एका छोट्याशा उद्यानात नवजात बालकाला कोणीतरी सोडून गेले. या बाळाची एकंदरीत परिस्थिती त्याचे भविष्य नेमके काय, अशा कित्येक प्रश्नाचं काहूर अनिल यांच्या मनात पेटले होते. हेच अनुभवत असताना 2005 ते 2013 या कालावधीत बाललैंगिक शोषण आणि तस्करीच्या एका भीषण प्रकरणात ते थेट केंद्रस्थानी होते. मुख्य तक्रारदार आणि साक्षीदार म्हणून अत्यंत प्रभावशाली आरोपींविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. जीवाला धोका, सततच्या धमक्या, सामाजिक दबाव आणि मानसिक ताण असूनही त्यांनी आठ वर्षे अखंडपणे न्यायासाठी लढा दिला. अखेर न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत 22 गुन्हेगारांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा विजय केवळ न्यायाचा नव्हता, तर शांत धैर्याचा आणि सत्यावरच्या अढळ विश्वासाचा होता.
कठोर क्षेत्रीय कामासोबतच अनिल यांनी आपली शैक्षणिक वाटचालही भक्कम ठेवली. त्यांनी ‘बीए (राज्यशास्त्र)’ आणि ‘एमएसडब्ल्यू’ पूर्ण केले. ‘चाईल्डलाईन समन्वयक’ (2006-2008), पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प व्यवस्थापक (2008-2010), साहाय्यक सचिव (2010-2015) आणि वरिष्ठ साहाय्यक संचालक (2015-2022) अशा कालांतराने त्यांच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि ‘स्नेहालय’च्या चौकटीबाहेरही त्यांचे कार्य विस्तारले.
श्रीगोंद्यामधील फासेपारधी आणि डोंबारी (आदिवासी) समुदायातील मुलांसाठी शिक्षणाच्या संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी ‘महामानव बाबा आमटे विकास सेवा समिती’ची सहस्थापना केली. दृष्टिहीन आणि दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या ‘भगिनी संस्थे’चे ते संस्थापक सदस्य आणि माजी विश्वस्त राहिले. तळागाळातील संघटनांना मार्गदर्शन करणे, भटक्या जमातींसाठी पुढाकार घेणे आणि शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे नेणारी ‘शेतकरी उत्पादक कंपनी’ (एफपीसी) उभारणे या सगळ्या भूमिका त्यांनी समान समर्पणाने निभावल्या.
उत्कृष्ट श्रोते, कुशल प्रशासक, रणनीतीकार आणि समस्या सोडवणारे म्हणून ओळखले जाणारे अनिल यांनी ‘स्नेहालय’च्या प्रमुख प्रकल्पांचे नेतृत्व केले. मजबूत धोरणे, प्रभावी प्रक्रिया आणि कामगिरी सुधारण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. ‘आयएसओ 9001 : 2008’ साठी लीड ऑडिटर म्हणून त्यांनी गुणवत्ता व्यवस्थापनालाही नवी दिशा दिली. मे 2022 मध्ये त्यांची ‘संचालक, ऑपरेशन्स’ आणि ‘कार्यकारी समिती सदस्य’ म्हणून नियुक्ती झाली. स्वयंसेवक म्हणून सुरुवात करून कार्यकारी अध्यक्षपदापर्यंत पोहोचलेल्या या प्रवासात त्यांनी चाईल्ड हेल्पलाईन, बालभवन, तस्करीतून वाचलेल्यांचे पुनर्वसन, स्नेहाधार, घरगुती हिंसाचारातून वाचलेल्यांसाठी कार्यक्रम आणि ‘एचआयव्ही’बाधितांसाठी सामुदायिक काळजी केंद्र यांसारख्या परिवर्तनकारी उपक्रमांचे नेतृत्व केले.
युवा संवेदनशीलता, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे त्यांनी अनेक आयुष्यांना नवी दिशा दिली. त्यांच्या कार्याची दखल घेत महाविद्यालयीन काळात उत्कृष्ट ‘एनएसएस’ स्वयंसेवक, ‘रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल’चा व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार यांसह अनेक सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. आज ‘स्नेहालय’ भविष्यातील नव्या टप्प्याकडे वाटचाल करत असताना, अनिल यांचा हा प्रवास एक गोष्ट ठळकपणे सांगतो की, खरा बदल मोठ्या आवाजाने घडत नाही; तो घडतो, शांत धैर्याने, सातत्यपूर्ण मेहनतीने आणि न्यायावर असलेल्या अढळ विश्वासातून. अनिल गावडे यांना त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या अनेकानेक शुभेच्छा!