गीतासार भाग ५

19 Feb 2026 16:12:38
Gitasar
 
नंद-यशोदा : कृष्णाचे नंतरचे मातापिता
 
कंसाच्या कारागृहातून अगदी जन्मल्याबरोबर मुक्त होणारे श्रीकृष्ण, नंतरचे बालपण गोकुळात राहणाऱ्या नंद-यशोदेच्या पितृ-मातृ वात्सल्यात घालवितात. यातील नंद शब्दाला ‌‘आ‌’ उपपद लावल्यास ‌‘आनंद‌’ शब्द तयार होतो, जो साधकाच्या उत्तम अवस्थेत त्याला प्राप्त होतो. साधकाच्या साधना काळातील उच्च अवस्थेत प्राप्त होणारा सात्त्विक आनंदच साधकाचा दुसरा पिता असतो. साधनेत त्याला आनंद प्राप्त झालेला असल्याने, आता त्याचे जीवन यशदायी बनते. साधकाची असली यशदात्री अवस्थाच साधकाची दुसरी माता यशोदा होय. ‌‘गो‌’ म्हणजे इंद्रिये आणि गोकुळ म्हणजे इंद्रियांचे कुल शरीर होय. याच गोकुळात आत्मारूप गोपाळकृष्ण लहानाचे मोठे होतात.
 
सागरातील द्वारका
 
भगवान गोपाळकृष्ण गोकुळात लहानाचे मोठे झाले आणि त्यांनी भरतखंडाच्या पश्चिम सागरामध्ये ‌‘द्वारका‌’ नावाची नगरीही वसविली. द्वारका आणि पश्चिम सागर यांचा व्यास आशय पाहा. संस्कृत साहित्यात संसाराला सागराची उपमा दिलेली आहे. साधना जीवनाचे पूर्व अंग पूर्वसागर व साधना जीवनाचे पश्चिम अंग पश्चिम सागर आहे. ज्यामध्येच द्वारका वसल्याचे दाखविले आहे. साधनेचे पूर्व अंग परिपूर्ण झाल्यावरच, जीवनाच्या पश्चिम सागरात राहावे लागेल. त्यामुळे द्वारका पश्चिम सागरात वसलेली दाखविली आहे. ‌‘द्वार‌’ शब्दापासून ‌‘द्वारका‌’ शब्द झाला आहे. साधनेच्या पश्चिम सागरात, पूर्वेपेक्षा अधिक परिपूर्ण साधना क्षेत्रात ही द्वारका वसली आहे. साधनेचा पूर्ण पश्चिम भागच अतींद्रिय जगताचे द्वार आहे. या अतींद्रिय जगताकडे घेऊन जाणारे द्वार म्हणजेच, भगवान श्रीकृष्णाची द्वारका होय. जी प्रत्येक उन्नयनशील साधकाच्या जीवनरूप पश्चिम सागरात वसली आहे. साधनेचे पश्चिम अंग पूर्ण असल्यामुळे, ही द्वारका जीवनाचे सोने करणारी सुवर्णाचीच असणार, म्हणूनच संपूर्ण द्वारका सोन्याची दाखविली आहे. भगवान श्रीकृष्णाची द्वारका त्यामुळे पश्चिम सागराने वेष्टित आणि सोन्याची दाखविली आहे, जे आध्यात्मिक परिपूर्णतेचे प्रतीक आहे. आपल्या ‌‘गौ‌’ म्हणजे इंद्रियांच्या अध्यात्म प्राप्तीसाठी सुयोग्य पालन करणाऱ्या गोपालकृष्णाचे सुवर्णमय उत्तर जीवन म्हणजे संसाररूपी महासागराने घेरलेले द्वारका द्वीप असून, त्यावर जीवात्मा आणि श्रेष्ठ बुद्धीरूप भगवान गोपालकृष्णाचे अधिपत्य आहे.
 
पांडवांशी संबंध
 
पांडवांची माता कुंती भगवान कृष्णाची दुरान्वये आत्या दाखविली आहे; परंतु साधनेमध्ये अग्रेसर राहणारा श्रेष्ठ साधक अर्जुन, जो नेहमी ब्रह्मावस्थेत शर मारतो आणि साधनेमध्ये आपली प्रगती अत्यंत द्रुतगतीने करते अशी द्रौपदी, या दोघांमुळे भगवान कृष्णाचे पांडवांशी अधिक घनिष्ठ संबंध निर्माण झाले. कृष्ण द्रौपदीला आपली बहीण मानीत असे. श्रेष्ठ बुद्धीला साक्षी ठेवून आपल्या पंचप्राण आणि आपल्या पंच ज्ञानेंद्रियांद्वारे ज्ञानप्राप्तीसाठी कार्य करणाऱ्या पांडवांशी, श्रेष्ठ बुद्धीरूप भगवान श्रीकृष्णाचे संबंध अतिशय प्रेमाचे राहतात. 12 वर्षांचा वनवास व एक वर्षाच्या अज्ञातवासाची अट पूर्ण केल्यानंतर, पांडव आपले हरलेले वृत्तीरूप राज्य परत मिळविण्यासाठी दुर्योधनाकडे जातात. त्यामध्ये पांडवांच्या बाजूने श्रीकृष्णाने मध्यस्थी केली; परंतु जिद्दी आणि दुर्बुद्धी दुर्योधनामुळे ती यशस्वी झाली नाही. दुर्योधनाने युद्धाचा प्रस्ताव दिला. कौरव व पांडवामध्ये युद्धाची घोषणा झाली. ज्यासाठी कौरव व पांडवांनी आपापल्या अनेक मित्र राजांचे साहाय्यही मागितले. दुर्योधन आणि अर्जुन आपापल्या पक्षांच्या साहाय्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या जवळ गेले. श्रीकृष्ण त्यावेळी झोपले असल्याने, अहंकारी दुर्योधन त्यांच्या डोक्याजवळ व अती नम्र भाव ठेवणारा अर्जुन त्यांच्या पायाशी बसला.
 
श्रीकृष्णाने उठल्यावर साहजिकच पायाशी बसलेल्या अर्जुनाला ‌‘काय हवे‌’ असे विचारले. इतक्यात डोक्याजवळ बसलेला दुर्योधन श्रीकृष्णाजवळ प्रथम आल्याचा दावा करीत ‌‘श्रीकृष्णाजवळ काही मागण्याचा त्याचा प्रथम हक्क आहे,‌’ असे सांगू लागला. भगवान आता धर्मसंकटात पडले, कारण त्यांनी अर्जुनाला प्रथम पाहिले होते. त्यामुळे त्याची मागणी प्रथम पूर्ण करावी, असे भगवंतांना वाटत होते आणि ते योग्यच आहे. जो भगवंताच्या चरणी नम्र असतो, तोच भगवंताला सर्वांत जास्त प्रिय असतो आणि जो भगवंताच्या डोक्याजवळ म्हणजेच बुद्धीच्या अहंकारात राहतो, त्याला भगवंत नंतर पाहतात, परंतु प्रश्न आपोआपच सुटला. कारण दुर्योधनाने श्रीकृष्णाची करोडोंची यादव सेना युद्धासाठी मागितली. अर्जुनाने फक्त श्रीकृष्णप्राप्तीची इच्छा धरली, त्याने नष्ट होणारी यादव सेना मागितली नाही. अशा तऱ्हेने दुर्योधनानेच तो प्रश्न सोडविला. ‌‘अद्‌’ म्हणजे खाणे आणि ‌‘यादव‌’ म्हणजे खाद्य, जे खाल्ले जाते ते किंवा जे नष्ट होते, ते शरीर आणि त्याचे शक्तिरूप सैन्य. याचेच नाव वेदव्यासांनी खुबीने ‌‘यादव सेना‌’ असे ठेवले आहे. अर्जुन केवळ श्रेष्ठबुद्धी श्रीकृष्णालाच आपल्या बाजूला मागून घेतो. यादव सेना मिळाल्यामुळे दुष्टबुद्धी अहंकारी दुर्योधन आनंदित होतो, कारण त्याने इच्छिलेलेच त्याला अनायासे मिळाले. दुर्योधन अर्जुनाला मूर्ख समजतो; कारण त्याने श्रीकृष्णाजवळ शरीररूप शक्तिसेना न मागता केवळ श्रीकृष्णालाच मागितले. अर्जुनाला धन्यता वाटली; कारण त्याने श्रीकृष्णासारख्या श्रेष्ठ अध्यात्मबुद्धीला आपल्या पक्षासाठी मिळविले आणि तेसुद्धा दुर्योधनाच्या संमतीने! महाभारताच्या युद्धात कृष्णाने दुर्योधनाच्या मागणीवरून आपली सर्व यादव सेना कौरवांकडून लढण्यास दिली, तर अर्जुनाच्या इच्छेवरून स्वतः श्रीकृष्ण एकटेच पांडवांचे उपदेशक व साहाय्यक राहिले. प्रत्यक्ष ज्या मालकाने इतकी वर्षे ज्यांना पोसले, त्या श्रीकृष्णाच्या विरुद्धच यादव सेना महाभारत युद्धात का लढली? श्रीकृष्णांनी त्यांना सांगितले म्हणून काय झाले? काय ते आपल्याच मालकाविरुद्ध लढतील? यादवांना समजत नव्हते काय? तूर्तास तरी तसे समजूया. ‌‘यादव‌’ या शब्दाचा आशयही वर पाहिलाच आहे. यादव म्हणजे जे नष्ट होते ते. म्हणूनच यादवी वृत्तींचा आपसांत ‌‘यादवी‌’ घडून समूळ नाश झाला, असे महाभारतात दाखविले आहे. भगवान श्रीकृष्णांच्या निर्वाणानंतर आवश्यकता नसल्याने, त्यांची सोन्याची द्वारकासुद्धा संसार सागरात बुडाल्याचे दाखविले आहे. जीवात्मा ब्रह्मरूप पारध्याच्या ब्रह्मशराने घायाळ होऊन, निर्वाण ब्रह्माला गेल्यावर त्या द्वारकेची आवश्यकताच काय? किंवा आत्मबुद्धी परमात्मा स्वरूपात विलीन झाल्यावर त्या प्रकारच्या साधनासुद्धा म्हणजे द्वारकाद्वीपाची आवश्यकताच काय? साधनासुद्धा जीवन सागरात बुडून गेली! ती बुडालेली द्वारका धन्यकाम होऊन, श्रीकृष्णरूप होणाऱ्यास मिळेल. स्वतःतील पंचप्राणांशी श्रीकृष्ण सदैव प्रामाणिक राहिले; म्हणूनच श्रीकृष्णानी सदैव पांडवपक्ष घेतला. ‌‘असतो मा सद्गमय| तमसो मा ज्योतिर्गमय| मृत्योर्मा अमृतं गमय|‌’(क्रमशः)
 
- योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357
Powered By Sangraha 9.0