जागतिक व्यासपीठावर डोंबिवलीचा ठसा;

डायबेटिसवरील परिषदेमध्ये डॉ.महेश पाटील यांचे मधुमेह नियंत्रणावर मार्गदर्शन

    19-Feb-2026
Total Views |
 
 
diabetes
 
 
 
 
डोंबिवली : डोंबिवली येथील आर्युवेदिक मधुमेह तज्ज्ञ आणि डायबेटीस रिव्हर्सल कोच डॉ. महेश पाटील यांनी अलीकडेच डायबेटिस इंडिया - २०२६- वर्ल्ड काॅग्रेस आॅफ डायबेटिस अॅण्ड ओबेसिटी या राष्ट्रीय परिषदेत आपले संशोधनपत्र सादर करून शहराचा मान उंचावला आहे. हैदराबाद येथील एचआयसीसी (हैद्राबाद इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर) येथे १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान झालेल्या या परिषदेत देश-विदेशातील नामांकित तज्ज्ञ सहभागी झाले होते.
 
"डायबेटिस ३६०°: ब्रिजिंग सायन्स अँड सुस्टेनेबिलिटी ” या मुख्य संकल्पनेवरील परिषदेत जीवनशैली-आधारित मधुमेह नियंत्रण या विषयावर डॉ. महेश पाटील यांनी आपले निष्कर्ष मांडले.
 
डॉ. पाटील यांनी आपल्या सादरीकरणात संतुलित आहार, नियोजित उपवास पद्धती, नियमित व्यायाम, ताण-नियंत्रण आणि शिस्तबद्ध दिनचर्या यांच्या साहाय्याने एचबीए१ सी मध्ये लक्षणीय घट साध्य करता येते, हे प्रत्यक्ष अनुभव व आकडेवारीच्या आधारे स्पष्ट केले. औषधांवर पूर्ण अवलंबित्व न ठेवता योग्य मार्गदर्शनाखाली मधुमेह नियंत्रण शक्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
 
या परिषदेत डॉ. व्ही. मोहन, डॉ. अनुप मिश्रा, डॉ. शशांक जोशी, डॉ. एस.आर. अरविंद आदी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मधुमेह तज्ज्ञ उपस्थित होते. इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशन, ईएएसडी (युरोपियन असोसिएशन फॉर द स्टडी डायबेटिस )पीसीडीई आणि इंटरनॅशनल एथेरोस्क्लेरोसिस सोसायटी यांसारख्या जागतिक संस्थांच्या संयुक्त सत्रांमुळे परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
 
भारतीय रुग्णांच्या जीवनशैलीचा सखोल अभ्यास करून तयार केलेल्या या फ्रेमवर्कचे परिषदेत विशेष कौतुक करण्यात आले. मधुमेह व्यवस्थापनात “रुग्ण सक्षमीकरण” ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
  
डोंबिवलीसह परिसरातील रुग्णांसाठी हे अभिमानाचे व प्रेरणादायी पाऊल मानले जात असून, स्थानिक पातळीवर जीवनशैली-आधारित आरोग्य चळवळ अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
 
 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------