छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेष : १९५२ ते २०२६मध्ये आलेले उत्तम चित्रपट, मालिका पाहिल्यात?
19-Feb-2026
Total Views |
मुंबई : १९ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा मानला जातो. याच दिवशी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा केवळ उत्सव नसून स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रप्रेम जागवणारा दिवस आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका, व्याख्याने आणि अभिवादन सोहळे आयोजित केले जातात. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेची गाथा मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीसाठी नेहमीच प्रेरणादायी विषय राहिला आहे. ऐतिहासिक भव्यता, युद्धनीती, निष्ठा आणि स्वाभिमान यांचे दर्शन घडवणारे अनेक चित्रपट आणि मालिका प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. खालील चित्रपट व मालिकांमधून शिवचरित्र विविध अंगांनी उलगडले गेले आहे. त्याविषयी थोडक्यात,
छत्रपति शिवाजी (१९५२) या चित्रपटाचे दिग्दर्शन भालजी पेंढारकर यांनी केले होते. हा शिवचरित्रावर आधारित जुना आणि महत्त्वपूर्ण चित्रपट मानला जातो. या चित्रपटात चंद्रकांत मांढरे यांनी साकारलले शिवराय अजरामर ठरले.
गनिमी कावा (१९८१) या चित्रपटाचे दिग्दर्शन भालजी पेंढारकर यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा इ.स. १६७० मधील घटनांवर आधारित आहे. सिंहगडानंतर मुघलांनी लोहगडमार्गे कोकणावर आक्रमण करण्याचा डाव आखल्याचे समजताच छत्रपती शिवाजी महाराज बहिर्जी नाईक यांच्यावर गुप्त मोहीम सोपवतात, जेणेकरून शत्रूचा दारुगोळा नष्ट करून त्यांची योजना हाणून पाडता येईल. या चित्रपटात चांद बीबी, उषा चव्हाण आणि यशवंत दत्त यांनी प्रमुख भूमिका साकारल्या असून मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे.
मराठा तितुका मेळावा (१९६४) या चित्रपटाचे दिग्दर्शन भालजी पेंढारकर यांनी केले आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका महत्त्वपूर्ण प्रसंगावर आधारित असून राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकट झालेली त्यांची दूरदृष्टी, शहाणपण आणि शौर्य यांचे प्रभावी चित्रण यात करण्यात आले आहे. या चित्रपटात अल्हाद, काशिनाथ घाणेकर आणि चंद्रकांत गोखले यांनी प्रमुख भूमिका साकारल्या असून हा चित्रपट आजही शिवचरित्रावर आधारित उल्लेखनीय कलाकृती मानला जातो.
बाल शिवाजी (१९८२) या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभाकर पेंढारकर यांनी केले आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणातील संस्कार, राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व यांचे चित्रण करण्यात आले आहे. मधू आपटे, आनंद जोशी आणि जान्हवी खांडेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (२००९) या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले आहे. तर महेश मांजरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर सचिन खेडेकर आणि मकरंद अनासपूरे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाची कथा दिनकर भोसले या सर्वसामान्य मराठी माणसाच्या स्वाभिमानाच्या संघर्षावर आधारित असून त्याला शिवाजी महाराजांचे मार्गदर्शन लाभते, अशी कल्पनारम्य मांडणी यात करण्यात आली आहे.
हर हर महादेव (२०२२) या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत शिरीष देशपांडे यांनी केले असून सुबोध भावे आणि शरद केळकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. पावनखिंडीतील शौर्यगाथा यात दाखवण्यात आली आहे.
फत्तेशिकस्त (२०१९) या चित्रपटात सिंहगडाच्या लढ्याचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले असून चिन्मय मांडलेकर आणि मृणाल कुलकर्णी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. शेर शिवाजी (२०२२) या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले असून चिन्मय मांडलेकर यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. अफजलखान वधाची ऐतिहासिक घटना यात उलगडली आहे.
रणपति शिवराय स्वारी आग्रा (२०२६) या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. आग्र्यातील स्वारी आणि सुटका या ऐतिहासिक प्रसंगावर हा चित्रपट आधारित आहे. अभिजीत श्वेतचंद्र याने शिवरायांची भूमिका साकारली आहे.
शिवप्रताप गरुडझेप (२०२२) या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले असून अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. आग्रा मोहीमेवर आधारीत हा चित्रपट आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यशाली जीवनकालावर आधारीत टीव्ही मालिकासुद्धा येऊन गेल्या आहेत.
राजा शिवछत्रपती या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांनी केले असून अमोल कोल्हे यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
वीर शिवाजी या मालिकेत बालशिवाजींच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला असून या मालिकेचे प्रसारण हिंदी वाहिनीवर झाले.
जय भवानी जय शिवाजी ही मालिका शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली.
या सर्व चित्रपट आणि मालिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवली आहे.