भारतातील सर्व मुस्लीम शासकांचे एकच ध्येय होते, ते म्हणजे भारतातील सर्व हिंदूंना बाटवून मुस्लीम करणे! जे त्यास विरोध करतील, त्यांची त्यांनी निर्घृणपणे हत्या केली. छत्रपती शिवाजी महाराज हे आयुष्यभर मुस्लीम राज्यकर्त्यांशीच लढले; पण म्हणून त्यांनी आपल्या राज्यातील मुस्लीम जनतेची कत्तल केली नाही की, तिला जबरदस्तीने हिंदू केले नाही. हाच शिवाजी महाराज आणि अन्य मुस्लीम शासकांमधील फरक!
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कुठलेही कारण नसताना राज्यात उगाचच एक वाद पेटविण्याचा प्रयत्न केला; पण अखेरीस त्यांनाच माफी मागण्याची वेळ आली. सपकाळ यांनी प्रकरण अंगावर चांगलेच शेकल्यावर आता माफी मागितली असली, तरी त्यांची ही माफीही निर्मळ नाही. शिवाय, वाद त्यांनी प्रत्यक्ष केलेल्या वक्तव्यावरून झाला असून, त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. त्यांना जे म्हणायचे होते, ते सर्वांना ऐकू जाते. त्यामुळे त्यांच्या माफीच्या मखलाशीतही अर्थ नाही.
येत्या काही महिन्यांत प. बंगाल, केरळ, तामिळनाडू वगैरे राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेशातही निवडणूक होणार आहेत. या सर्व राज्यांतील मुस्लीम मतदारांना काँग्रेसकडे वळविण्यासाठी तर सपकाळ यांनी हे विधान केले नाही ना, हेही पाहावे लागेल. कारण, या सर्व राज्यांमध्ये ‘एमआयएम’ हा पक्ष मोठ्या प्रमाणावर आपले उमेदवार उभे करणार आहे. भारतातील मुस्लीम मतदार गेल्या काही काळापासून असदुद्दीन ओवेसी यांच्या ‘एमआयएम’ पक्षाकडे आकृष्ट होत असून, त्यामुळे मुस्लीम मतांचे ठेकेदार बनलेल्या काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रमुक यांसारख्या पक्षांच्या नेत्यांची झोप उडाली आहे. कारण, मुस्लीम मतदारांनी जर या पक्षांकडे पाठ फिरविली, तर या पक्षांचे अस्तित्वच धोयात येईल. या पक्षांची सारी भिस्त मुस्लीम मतदारांवरच आहे. त्यामुळे आपलाच पक्ष मुस्लिमांचे हित जपतो, हे दाखवून देण्याच्या धडपडीत सपकाळ यांनी हे वक्तव्य केले असावे, ही शयताही विचारात घ्यावी लागेल. कारण, असे वक्तव्य करण्याचे दुसरे काहीच प्रयोजन दिसत नाही.
"टिपू हा एक शूर राजा होता आणि शौर्याच्या बाबतीत त्याला शिवाजी महाराजांशी ‘समकक्ष’ म्हणून बघितले पाहिजे,” हे हर्षवर्धन सपकाळ यांचे आक्षेपार्ह विधान. त्याचा साधा-सरळ अर्थ असा होतो की, टिपू आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समान आहेत. सपकाळ यांनी केलेल्या याच बेजबाबदार तुलनेमुळे हा वाद उद्भवला. शिवाजी महाराजांप्रमाणे शौर्य दाखविणारे असंख्य राजे झाले. पण, त्यामुळे त्यांची तुलना शिवाजी महाराजांशी करता येत नाही. मिर्झा राजे जयसिंग हा राजपूत राजा होता. तोही खूप शूर होता. पण, त्याचे शौर्य हिंदूंच्या हितासाठी खर्ची पडले नाही. त्याने शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात येऊन लढाईत हरविले आणि आग्रा येथे पाठविले. तेथे औरंगजेबाने त्यांना अटकेत ठेवले आणि ठार मारण्याची योजना आखली. पण, आपल्या सुदैवाने ते तिथून निसटून परतले. राजस्थानात मुघलांविरोधात फक्त राणा प्रताप लढला. त्याच्या मदतीला अन्य हिंदू राजपूत राजे आले नाहीत. उलट, हेच राजपूत राजे अकबराचे मांडलिक झाले आणि त्यांनी मुघल साम्राज्य उभे करण्यासाठी आपले शौर्य कामी आणले. म्हणूनच राजपूत आणि शिवाजी महाराज यांनाही एकाच तागडीत तोलता येणार नाही.
टिपूनेही अनेक लढाया लढल्या आणि इंग्रजांशीही तो यशस्वीपणे लढला. मात्र, त्याच्या तेवढ्या कृतीवरून तो महान ठरत नाही. कारण, त्याने निव्वळ धर्मांधतेपायी लक्षावधी हिंदूंची हत्या केली होती. हिंदूंची हत्या हे त्याच्या जीवनाचे ध्येय होते. अलीकडेच उघड झालेल्या त्याच्या काही पत्रांतून तो किती कट्टर धार्मिक होता, ते दिसून आले आहे. त्याने एका पत्रात लिहिले आहे की, "मी मलबारमध्ये लाखो हिंदूंना ठार मारले. त्यांच्या प्रेतांची सुंता करून त्यांना मुस्लीम केले.” मृतदेहाचीही विटंबना करून, ज्याला आपले धार्मिक ध्येय साध्य करायचे होते, त्या जिहाद्याची तुलना शिवाजी महाराजांशी करणार्या सपकाळ यांची बुद्धी नाठाळ आहे, ते स्पष्ट होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे सदैव मुस्लीम राज्यकर्त्यांशीच लढले; पण म्हणून त्यांनी महाराष्ट्र किंवा भारतातील निरपराध मुस्लिमांचे हत्याकांड केले नव्हते. त्यांनी भारतातील मुस्लीम जनतेला सक्तीने हिंदू करण्याची मोहीमही चालविली नाही. उलट, भारतावर राज्य करणार्या सर्व मुस्लीम शासकांचे एक समान ध्येय होते आणि ते म्हणजे भारतातील यच्चयावत हिंदूंना बाटवून मुस्लीम करणे आणि जे त्यास विरोध करतील, त्यांची निर्घृणपणे हत्या करणे. सारा वाद त्याबद्दलच आहे. जे पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी गोव्यात केले, तेच मुस्लीम राज्यकर्त्यांनी भारतात केले. मुस्लीम राज्यकर्त्यांना जगभरात इस्लामी शासन प्रस्थापित करायचे होते आणि आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने इंग्रज आणि हिंदू हे समानच होते, म्हणजे ते काफिरच होते. काफिरांची हत्या करणे, हे त्यांचे धर्मकर्तव्य होते. टिपूने केवळ कट्टर धार्मिकतेतून लाखो हिंदूंची हत्या केली आणि अनेक मंदिरांचा विध्वंस केला. त्यामुळे तो कोणत्याही पातळीवर शिवाजी महाराजांशी ‘समकक्ष’ होऊच शकत नाही.
टिपू हा काही खरा, खानदानी राजा नव्हे. तो म्हैसूरचे राजे वोडियार यांच्या पंतप्रधानाचा मुलगा. त्याने पेशव्यांप्रमाणे म्हैसूरच्या राजांच्या वतीने लढाया केल्या आणि वोडियार राजांना नामधारी केले. महाराष्ट्रातही छत्रपती शाहूंच्या काळात पेशव्यांनी शस्त्र हाती धरले. पण, सहाही पेशव्यांनी स्वत:ला कधीही ‘राजे’ म्हणवून घेतले नाही की, राजसिंहासनाची अभिलाषा बाळगली नाही. ते सदैव छत्रपतींशी इमान राखून राहिले. टिपूने मात्र वोडियार यांना बाजूला सारून सारा राज्यकारभार आपल्या हाती घेतला. हाही टिपू आणि हिंदू शासकांमधील एक मूलभूत फरक.
ज्यांना राष्ट्रवाद आणि देशभक्ती म्हणजे काय, ते ठाऊक नाही असेच नेते स्वा. सावरकर यांची बदनामी करतात आणि टिपूसारख्या जिहाद्याची स्तुती करतात. काँग्रेसचे मुस्लीम लांगूलचालन ही काही नवी गोष्ट नव्हे. पण, आता राज्यात कोणत्याही निवडणुका नसताना आणि कोणतेही निमित्त नसताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी म्हैसूरचा संस्थानिक टिपू सुलतान याची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करून सार्वत्रिक रोष ओढवून घेतला. सपकाळ यांच्या वक्तव्यावर एकाही काँग्रेस नेत्याने टीका केली नाही. यावरून एकंदरीतच काँग्रेस नेत्यांची मानसिकता दिसून येते. अशा जिहादी प्रवृत्तीच्या काँग्रेसला राज्यातील राजकारणात कसलेही स्थान मिळता कामा नये.
- राहुल बोरगांवकर