फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन तीन दिवसीय भारत दौर्यावर होते. सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी रात्री १२च्या सुमारास त्यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. कुलाब्यातील हॉटेल ताज महाल पॅलेसमध्ये त्यांचे वास्तव्य होते. दुसर्याच दिवशी मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ते चक्क मरीन ड्राईव्हवर ‘मॉर्निंग वॉक’साठी बाहेर पडले. अगदी ‘जॉगिंग’च्या कपड्यात आणि सोबत फक्त दोन सुरक्षारक्षक, तेही सामान्य वेशात. त्यानंतर ‘२६/११’ दहशतवादी हल्ल्यातील मृतांना त्यांनी ताज हॉटेलमध्ये श्रद्धांजली वाहिली. ‘लोकभवन’मध्ये पंतप्रधान मोदींशी द्विपक्षीय संवाद साधला आणि दुपारी काही बॉलीवूडमधील सिनेतारकांसह जेवणाचा आस्वाद लुटला. संध्याकाळी ‘गेट वे ऑफ इंडिया’वर ‘लाईट अॅण्ड साऊंड शो’ला हजेरी लावली आणि रात्री उशिरा जागतिक वारसास्थळांच्या यादीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरही फेरफटका मारला आणि बुधवारी, दि. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ते ‘एआय’ परिषदेसाठी दिल्लीला रवाना झाले. हा सगळा घटनाक्रम हेच सुचवितो की, मुंबई शहर हे अगदी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षनांही सुरक्षित वाटते.
कोणी म्हणेल, मॅक्रॉन हे तर एका देशाचे राष्ट्रप्रमुख आणि तोही फ्रान्ससारखा देश. त्यामुळे सुरक्षेचे तगडे जाळे, फौजफाटा दिमतीला असणारच. मग ते जगाच्या कुठल्या का कोपर्यात जाईना. हेही अगदी खरेच. पण, तरी कोणताही राष्ट्राध्यक्ष सुरक्षेचे वलय असले, तरी जे शहर, देश सुरक्षित नाही, तिथे इतका सहजासहजी फेरफटका मारायचा निर्णय घेईल का? तर मुळीच नाही. म्हणजे उद्या मॅक्रॉन चुकूनमाकून पाकिस्तान दौर्यावर गेलेच, तर ते ज्या सहजतेने मुंबईत वावरले, तेवढ्या सराईतपणे ते कराची अथवा लाहोरमध्ये फिरतील का? तर मुळीच नाही. काँग्रेस सरकारच्या काळात मुंबईवर एकामागोमाग एक दहशतवादी हल्ले झाले. लोकलपासून ते हॉटेल ताजपर्यंत. त्यानंतर अशा ‘स्टेट गेस्ट’च्या सुरक्षेतही लक्षणीय वाढ करण्यात आली. ओबामा असतील किंवा फ्रान्सचेच राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोझी हे २०१० साली मुंबई दौर्यावरही आले. पण, त्यांचे कार्यक्रम, भेटीगाठी आणि एकूणच दौरा तसा बंदिस्त, मर्यादित राहिला. त्याउलट चित्र परवा मॅक्रॉन यांच्या दौर्यात दिसले. हे चित्र सुखावणारे आणि देवाभाऊंच्या राज्यातील सुरक्षित मुंबईची देशासह संपूर्ण जगाला ग्वाही देणारेच म्हणावे लागेल.
‘मातोश्री’वर अविश्वास...
आतल्या आवाजांचा गोंधळ - ममता, स्टॅलिन की, आणखीन कुणी?’ या दै. ‘सामना’च्या कालच्या अग्रलेखातून काँग्रेसमधील अंतर्गत कलह, ‘इंडी’ आघाडीतील कुरबुरी यांवर बोट ठेवण्यात आले. ‘लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ‘इंडिया’ आघाडीचे काय झाले? हा प्रश्न अनेकांना पडला असला, तरी तो प्रश्न काँग्रेसला पडला आहे काय?’ असा रोकडा सवालही या संपादकीयातून उपस्थित करण्यात आला. एकूणच, काँग्रेसचे ‘इंडी’ आघाडीकडे दुर्लक्ष, राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह आणि ममता, स्टॅलिन यांची विरोधकांची मोट बांधण्याची क्षमता, असा या अग्रलेखाचा एकंदरीतच सूर. आता ‘सामना’चे संपादकीय म्हणजे ‘मातोश्री’चीच भूमिका मानली जाते. तेव्हा आता उद्धव ठाकरेंनाच राहुल गांधींचे नेतृत्व कमकुवत वाटू लागले आहे, असाच त्याचा स्वच्छ अर्थ. त्यातच २५ वर्षे हातात असलेली मुंबई महानगरपालिकेवरील ठाकरेंची सत्ताही यंदा महायुतीने काबीज केली. हा पराभव ठाकरेंना चांगलाच जिव्हारी लागला.
काँग्रेसने स्वबळावर मुंबईच्या निवडणुका लढवल्यामुळे मतांचे विभाजन झाले आणि सत्ता ना काँग्रेसची आली, ना ठाकरेंची; हीच धुसफूस ‘सामना’च्या कालच्या अग्रलेखातून शब्दबद्ध करण्यात आली. पण, ते काहीही असो, या अग्रलेखाने घेतलेल्या प्रामाणिक भूमिकेचे कौतुक करावे तितके कमीच! कारण, काँग्रेसकडून ‘इंडी’ आघाडीचे नेतृत्व हे ममता, स्टॅलिन यांच्याकडे जावे, असे सूतोवाच हा अग्रलेख करतोच; पण हेच नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे असावे, यावे, येऊ शकते, असा यत्किंचितही उल्लेख नाही. याचाच अर्थ, उद्धव ठाकरे, त्यांचा पक्ष हे विरोधकांच्या सोडाच, तर खुद्द ‘सामना’च्या सुद्धा खिजगणतीत नाही. कारण, यदाकदाचित तसे असते, तर ‘इंडी आघाडीचे नेतृत्व करायला आमचे उद्धवसाहेब खंबीर आहेत’ वगैरे शाब्दिक अतिशयोक्तीचा रतीब इथे घातला गेला असता. पण, संपादकांमधला पत्रकार चिमूटभर का होईना, जिवंत आहे म्हणायचा. असोे. आपल्याच मालकाच्या अक्षमतेवर किती तो दृढविश्वास... म्हणूनच, तर ‘इंडी’ आघाडीच्या धुरेसाठी वांद्य्राच्या साहेबांपेक्षा बंगालची ममता आणि सनातनद्रोही स्टॅलिन ‘सामना’वीरांना जवळचे वाटले, यातच सर्वकाही आले. ‘ब्रॅण्ड’बिण्ड काय ते फक्त निवडणुकीसाठी... नंतर घरचे तरी विचारतात का त्या ‘ब्रॅण्ड’ला? मग बाहेरच्यांचे काय घेऊन बसलात?