वैयक्तिक संघर्षातून उभे राहिल्यामुळेच वंचित आणि दुर्बल घटकांच्या समस्यांची तीव्र जाणीव असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या रंजना गायकी यांच्या ध्येयवेड्या वाटचालीविषयी...
रंजना गजानन गायकी यांचा जन्म आणि बालपण यवतमाळचा. आई-वडील आणि एक लहान भाऊ असे त्यांचे चौकोनी कुटुंब. त्यांचे प्राथमिक शिक्षण नगर परिषदेच्या ज्ञानेश्वर मंदिर परिसरातील अंगणवाडीतून सुरू झाले. चौथीपर्यंतचे शालेय शिक्षण नगर परिषदेच्या शाळेत घेतले, तर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण काटेबाईंच्या सरकारी शाळेत पूर्ण केले. त्यानंतर अकरावी आणि बारावीचे शिक्षण महिला महाविद्यालयात घेऊन पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील नगर परिषदेत नोकरी करत होते, तर आई सुरुवातीला गृहिणी होत्या.
पुढे काही वर्षांनी त्यांनीही नगर परिषदेत कंत्राटी स्वरूपात काम करण्यास सुरुवात केली. त्या काळात कुटुंबाचे उत्पन्न मर्यादित असल्याने घर चालवणे कठीण जायचे. त्यामुळे रंजना यांनी दहावीनंतर ‘टायपिस्ट’ म्हणून नोकरी सुरू केली. यादरम्यान, त्यांनी पुढील शिक्षणाच्या परीक्षा दिल्या आणि त्यासोबतच शिक्षणही सुरुच ठेवले. त्यानंतर बारावीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असताना त्यांनी प्रकाश चोपरा या चार्टर्ड अकाऊंटन्टकडे नोकरी केली. घराची जबाबदारी सांभाळत आणि लहान भावाच्या शिक्षणाची काळजी घेत त्यांनी आपले शिक्षण व नोकरी दोन्ही यशस्वीपणे पूर्ण केले.
लहानपणी सामाजिक कार्याबद्दल विशेष जाण नसली, तरी त्यांच्या शेजारी काही सामाजिक कार्यात सक्रिय असणारे कार्यकर्ते वास्तव्यास होते. त्यांच्या कार्याचा प्रभाव रंजना यांच्यावर पडला आणि त्यातूनच समाजकार्याची ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली. या अनुभवांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण घडवून त्यांना पुढील आयुष्यात सामाजिक कार्याच्या दिशेने प्रेरित केले. लग्न झाले, कन्यारत्न जन्माला आले; या काळात त्यांचे समाजिक कार्य काही काळासाठी थांबले. मात्र, मुलगी अडीच वर्षांची झाल्यावर त्यांनी स्वतःची संस्था सुरू करून समाजकार्यात पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. या काळात त्यांचे पती आणि कुटुंबीयांचा त्यांना भक्कम पाठिंबा लाभला. रंजना यांचे सासरे वसंतराव गायकी (राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त) हेदेखील निवृत्तीनंतर या कार्यात सक्रिय होते.
आपली संस्था सुरू करण्याच्या मधल्या काळात रंजना यांनी ‘प्रियदर्शनी’ संस्थेत काहीकाळ काम केले. तिथे प्रचंड कष्टाने तयार झालेले संपर्क, समाजात राहून काम करत असताना आलेले अनुभव यातून बर्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. पुढे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दि. १७ सप्टेंबर १९९८ रोजी ‘नवविद्या बहुउद्देशीय संस्थे’ची त्यांनी स्थापना केली. विशेषतः महिलांसाठी काम करण्याच्या उद्देशाने सुरू झालेली ही संस्था गेल्या २० वर्षांपासून ग्रामीण आणि शहरी विकास क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहे. उपजीविका, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित परस्परांशी निगडित समस्यांचे निराकरण करणे, हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट. संस्था सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांसोबत शाश्वत विकासासाठी कार्य करत असून, महिला सक्षमीकरणावर विशेष भर देते.
संस्थेच्या स्थापनेनंतर लगेचच पहिला प्रकल्प म्हणून ‘एमआरसीपी’चा प्रकल्प मिळाला. या प्रकल्पाच्या माध्यमातून गावागावांत जाऊन लोकांशी संपर्क प्रस्थापित करण्यात आला आणि समाजात संस्थेची ओळख निर्माण झाली. संस्थेने ‘दारुबंदी अभियान’ राबवणे, गावांमध्ये बैठका घेऊन महिला बचत गटांची स्थापना करणे, तसेच नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे, अशी विविध समाजोपयोगी कामे हाती घेतली.
रंजना या ‘विदर्भ लोकविकास मंच’च्या अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी अनेक लहान संस्थांना ‘नवविद्या बहुउद्देशीय संस्थे’शी जोडून घेतले. या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यात सामाजिक कार्याचे एक व्यापक जाळे उभे राहिले. सध्या जरी हे जाळे कार्यरत नसले, तरी त्या काळात सामाजिक संघटनात्मक बळकटी निर्माण करण्यात या उपक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. सध्या संस्थेच्या माध्यमातून पतसंस्था कार्यरत असून, त्याअंतर्गत सुमारे पंधराशे बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करून दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना विकास-प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले. तसेच ‘नाबार्ड’च्या माध्यमातून ६०० बचतगट स्थापन करण्याचे उद्दिष्ट संस्थेला देण्यात आले होते, जे यशस्वीपणे पूर्ण केले.
संस्थेचे कार्यक्षेत्र सुरुवातीला पूसद आणि यवतमाळ या भागांपुरते मर्यादित होते. मात्र, कार्यविस्तारामुळे पुढे यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये संस्थेचे व्यापक कार्य सुरू झाले. या दोन जिल्ह्यांतील एकूण ४९९ गावांमधील १५ हजार, ५५८ कुटुंबांपर्यंत म्हणजेच सुमारे एक लाख, ६२ हजार, ५६२ लोकांपर्यंत संस्थेच्या विविध विकासात्मक उपक्रमांचा लाभ पोहोचला आहे. रंजना गायकी यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने अनेक शुभेच्छा!