मुंबई : (Sharad Pawar) राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील ७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झालाय. मात्र, या निवडणूकीत महाविकास आघाडीकडे एकच जागा जाणार असल्यानं कोणत्या पक्षाचा उमेदवार द्यायचा याबाबत आतापासूनच धडपड सुरु झाल्याचं दिसतंय. एकीकडे संजय राऊत शरद पवारांना (Sharad Pawar) राज्यसभेवर पाठवण्यास इच्छूक आहे तर, दुसरीकडे, आदित्य ठाकरे ही आमच्या पक्षाची जागा असल्याचा दावा करतात. त्यामुळे आताच त्यांच्यात तु तु मैं मैं सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र, एकूणच राज्यसभा निवडणूकीचं चित्र नेमकं काय आहे? शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेची निवडणूक लढवणार का? आणि तसं झाल्यास उबाठा गट आणि काँग्रेस त्यांना पाठींबा देणार का?(Sharad Pawar)
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीनंतर मोडकळीस आलेल्या महाविकास आघाडीचं भवितव्य पुन्हा एकदा पणाला लागलंय. आता होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या देशातील १० राज्यांमधील ३७ जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रासोबतच ओडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील रिक्त होणाऱ्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. येत्या १६ मार्च २०२६ रोजी या रिक्त होणाऱ्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.(Sharad Pawar)
२ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्य असलेल्या ७ खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये शरद पवार,(Sharad Pawar) डॉ. भागवत कराड, डॉ. फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा समावेश आहे.
आता महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल कसे आहे ते समजून घेऊया. विधानसभेत सध्या भाजपचे १३२, शिवसेना ५७, राष्ट्रवादी काँग्रेस ४१, उबाठा गट २०, काँग्रेस १६ आणि शरद पवार गटाचे १० आमदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे विधानसभेतील दोन जागा रिक्त आहेत. या आकडेवारीनुसार, महाविकास आघाडीला या निवडणूकीत जास्त जोर लावण्याची गरज आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, यावेळी आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून एकच उमेदवार निवडून आणता येणार आहे. या एका जागेसाठी मविआतील तिन्ही घटक पक्षांची मते एकवटून मोठी कसरत करावी लागणार आहे.
त्यातही शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्यास इच्छूक असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय. ते म्हणाले की, "शरद पवार यांनी राज्यसभेवर जाण्याची ईच्छा माझ्याजवळ व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी म्हणून ही जागा आम्ही लढणार असं ठरलं तर मविआचे तिन्ही पक्ष एकत्र बसतील. यात फक्त राज्यसभेचा विषय नसून विधानपरिषदेच्या निवडणूका सुद्धा आहे. त्यामुळे विधानपरिषदेत कुणी जायचे किंवा राज्यसभेवर कुणी जायचे यावर चर्चा होईल. उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात असणे गरजेचे आहे."(Sharad Pawar)
याऊलट आदित्य ठाकरे म्हणाले की, "शरद पवार यांच्या जागेबाबत अजून कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. पण ही जागा आत्तातरी शिवसेना उबाठा ची आहे. पक्षाच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीमध्ये यावेळी विधानपरिषद आणि राज्यसभा या दोन्ही शिवसेना उबाठाच्या जागा आहे," असा दावा त्यांनी केलाय.
दुसरीकडे, शरद पवार (Sharad Pawar) यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यात काँग्रेस सहमत नसल्याचीही चर्चा आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा झाली असून महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावाला पसंती दिल्यास काँग्रेसकडून त्याला विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांमुळे महाविकास आघाडीकडून नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, असं मत अनेकांनी व्यक्त केल्याचं समजतं.(Sharad Pawar)
थोडक्यात, ‘जागा एक, दावेदार अनेक’ अशी परिस्थिती सध्या निर्माण झालीये. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे तुलनेनं ही निवडणूक जिंकणं त्यांना अवघड नाही. मात्र, महाविकास आघाडीला प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. एकही मत इकडे-तिकडे झाल्यास मिळालेली एक जागाही हातातून जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळेच आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय काय होतो? काँग्रेसची कोणती भूमिका घेते? महाविकास आघाडी एकदिलाने उभी राहते का? यावरून या निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. अन्यथा, जर नेहमीप्रमाणं मविआत समन्वयाचा अभाव राहिला, तर महायुती ही निवडणुकीही एकतर्फी जिंकेल, असं दिसतंय.(Sharad Pawar)