धरती रो जीव, धर्म रो मार्ग

    18-Feb-2026
Total Views |

Sant Sevalal Maharaj Jayanti

‘वाडी-वस्ती रो माणूस, धरती रो जीव सगळो आपलो,’ असा समतेचा संदेश देणारे संत सेवालाल महाराज आजही समाजाला दिशा देतात. त्यांच्या २८७व्या जयंतीनिमित्त लोधीवली व पुण्यातील उत्सवांनी गोर बंजारा समाजाची सांस्कृतिक व वैचारिक एकता ठळक केली. त्याचा घेतलेला मागोवा...

धरतीधर्म रो उजास: लोधीवलीतील भव्य जयंती

लोधीवली येथील गोर बंजारा तीर्थक्षेत्र ज्ञानपीठ हे गोर बंजारा समाजाच्या आध्यात्मिक जीवनात महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. १२ धामांचे निर्माते व धर्मरक्षक किसन राठोड यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या या तीर्थक्षेत्री सद्गुरू श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक लोधीवली येथे दाखल झाले होते. जयंती कार्यक्रमाची सुरुवात दि. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी संत सेवालाल महाराज यांच्या पालखी स्वागताने झाली. त्यानंतर महाआरती व भोगपूजा पार पडली. रात्री ठीक १२ वाजता जन्मोत्सव सोहळा राजमाता मातोश्री रत्नायाडी व धर्मरक्षक किसन राठोड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
 
महिलांनी पारंपरिक पाळणागीत सादर करत जन्मोत्सव साजरा केला. दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी भोगपूजेनंतर जयंती महोत्सवाची औपचारिक सुरुवात झाली. दिवसभर धार्मिक प्रवचने, बंजारा भजने, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच पारंपरिक विधी पार पडले. महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या जयंती सोहळ्यास बगलामुखी माता संस्थांचे प्रमुख धर्मगुरू हर्षवर्धन शुक्ला महाराज, ‘रा. स्व. संघ धर्मजागरण समिती’चे महेंद्र रायचूरा, मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष प्रमुख आरोग्यदूत रामेश्वर नाईक, जिल्हाधिकारी रवींद्र राठोड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण लोधीवली परिसर संत सेवालाल महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

हर्षवर्धन शुक्ला महाराज यांनी आपल्या भाषणात १२ धामांच्या निर्मितीमुळे गोर बंजारा समाजात धार्मिक चेतना अधिक बळकट झाल्याचे सांगितले. महेंद्र रायचूरा यांनी संत सेवालाल महाराज यांनी संपूर्ण देशभर भ्रमण करून समाजाला एकसंघ करण्याचे महत्त्वाचे कार्य केल्याचे अधोरेखित केले. आरोग्यदूत डॉ.रामेश्वर नाईक यांनी एकता, सामाजिक सलोखा आणि धार्मिक जागरूकतेचा संदेश दिला. धर्मरक्षक किसन राठोड यांनी संत सेवालाल महाराज यांच्या विचारांतून समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाची सांगता संत सेवालाल महाराज यांच्या जयघोषात ‘राष्ट्रीय बंजारा परिषदे’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अ‍ॅड. पंडित राठोड यांनी आभार मानून केली. सूत्रसंचालन ‘राष्ट्रीय बंजारा परिषदे’चे प्रदेश कार्याध्यक्ष संतोष राठोड यांनी केले.

संत सेवालाल महाराज यांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवायचे असतील, तर अशा जयंती सोहळ्यांमधून समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. समाजाला संघटित करणे, एकमेकांशी जोडणे आणि सामाजिक जाणीव जागृत करणे हाच या कार्यक्रमांचा मूळ उद्देश आहे. गुरुपरंपरेतूनच बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये समाजात दृढ होत जातात.

-डॉ. रामेश्वर नाईक
मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्ष प्रमुख

संत सेवालाल महाराज यांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी धर्मसत्ता अधिक मजबूत करत राजसत्तेकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. इतिहास, संस्कृती आणि परंपरेचे जतन करत समाजाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी अशा कार्यक्रमांतून ठोस आणि जबाबदार नेतृत्व उभे राहणे गरजेचे आहे.

-किसन राठोड, समाज प्रचारक
अध्यक्ष, राष्ट्रीय बंजारा परिषद


वाडीवस्ती रो साज:पुण्यातील सांस्कृतिक उत्सव

पुणे शहरात साजरी झालेली सद्गुरू श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती ही केवळ धार्मिक उत्सवापुरती मर्यादित न राहता, सामाजिक संवाद, सांस्कृतिक ओळख आणि समाजजागृतीचा व्यापक अवकाश ठरली. राष्ट्रीय बंजारा परिषद, पुणे जिल्हाराजगुरुनगर खेड यांच्यावतीने आयोजित या जयंती महोत्सवात समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. शहराच्या वेगवान जीवनप्रवाहातही आपल्या मुळांशी नातं जपणारा बंजारा समाज यानिमित्ताने एकत्र आला. जयंतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन, भोगपूजा आणि महाप्रसादवाटप करण्यात आले. यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून बंजारा संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवण्यात आले.

‘गोर बंजारा महोत्सव’ आणि ‘बंजारा मेळावा’ या उपक्रमांमुळे शहरात विखुरलेला बंजारा समाज एका व्यासपीठावर आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ. बाबाजी काळे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून बंजारा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी सदैव सहकार्य करण्याची भूमिका मांडली. विशेष उपस्थिती म्हणून गोर बंजारा समाजाचे युवा नेते व उद्योजक सुबोध पवार, तसेच ‘राष्ट्रीय बंजारा परिषदे’चे प्रदेश प्रवक्ता अमोल पवार उपस्थित होते. उद्योजक सुबोध पवार यांनी युवकांना उद्योग, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या संधींकडे वळण्याचे आवाहन करत समाजाच्या भविष्यासाठी आर्थिक सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. अमोल पवार यांनी संत सेवालाल महाराज यांच्या विचारांचे व्यापक प्रसारण ही काळाची गरज असल्याचे नमूद करत समाजप्रबोधनावर भर दिला.

या जयंती महोत्सवात संत सेवालाल महाराज यांच्या समतेच्या तत्त्वज्ञानावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. वाडी-वस्ती, बाल-बच्चे, जीव-जंतु सर्व समान हा त्यांचा विचार आजच्या सामाजिक वास्तवाशी जोडून मांडण्यात आला. पर्यावरणप्रेम, मानवता आणि सदाचार यांचा पुरस्कार करणारे त्यांचे विचार आजही समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन ठरत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक रमेश जाधव, अनिकेत जाधव, नितीन राठोड, सचिन राठोड, करण पवार, सूरज राठोड, बासू चव्हाण यांनी परिश्रम घेतले. तसेच बंजारा गायिका सोनू राठोड यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत प्राप्त झाली. पुण्यात साजर्‍या झालेल्या या जयंती महोत्सवातून शहरी पिढीला आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडण्याचे कार्य प्रभावीपणे घडून आले आणि संत सेवालाल महाराज यांच्या विचारांची उजळणी झाली.
 
’वाडी-वस्तीन साई वेस, किडी-मुंगीन न साई वेस, जीव-जणगाणीन साई वेस, बाल-बच्चान साई वेस, सेन साई वेस’ असा समतेचा मूलमंत्र देणारे संत सेवालाल महाराज समाजाला माणुसकीची आणि समतेची वाट दाखवतात. समाज एकत्र राहिला, तरच हे विचार पिढ्यान्पिढ्या जिवंत राहतील.
 
-अमोल पवार, प्रवक्ते, राष्ट्रीय बंजारा परिषद

गोर बंजारा समाजातील युवकांनी संत सेवालाल महाराज यांच्या विचारांवर विश्वास ठेवून शिक्षण, कौशल्य आणि उद्योगाच्या मार्गाने पुढे जावे. समाजाची सामाजिक व आर्थिक उन्नती साधणे हीच या विचारांची खरी पूर्तता आहे.

- सुबोध पवार, उद्योजक



- सागर देवरे