सलमानचे वडील आणि लेखक सलीम खान व्हेंटीलेटरवर, डॉक्टरांनी दिली नवी अपडेट

18 Feb 2026 15:53:37

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ पटकथालेखक आणि सलमान खान (Salman Khan) याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी श्वास घेण्यास त्रास झाल्यानंतर त्यांना फॅमिली डॉक्टरांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. सध्या ते आयसीयूमध्ये उपचाराधीन असून त्यांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष टीम लक्ष ठेवून आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार

सलीम खान यांच्यावर न्यूरोलॉजिस्ट, कार्डियोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन आणि क्रिटिकल केअर तज्ज्ञांची टीम उपचार करत आहे. रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठी कुटुंबीय आणि जवळचे मित्र मोठ्या संख्येने येत आहेत. मंगळवारी उशिरा रात्री सलमान खान, अरबाज खान, शूरा खान, अर्पिता खान शर्मा, अलवीरा खान, नातू निर्वाण आणि अरहान यांच्यासह ज्येष्ठ गीतकार जावेद (Javed Akhtar) आणि आमदार झीशान सिद्धीकी (Zeeshan Siddique) रुग्णालयात पोहोचले होते. त्यांच्या पत्नी सलमा खान आणि अभिनेत्री हेलेन (Helen) देखील उपस्थित होत्या. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

डॉक्टारांनी दिली माहिती

डॉ. जलील पारकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सलीम खान यांना रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा ते शुद्धीत होते. त्यांना सौम्य स्वरूपाचा ब्रेन हेमरेज झाला होता; मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले असून शस्त्रक्रियेची गरज भासलेली नाही.

त्यांनी पुढे सांगितले की, रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुरुवातीला त्यांना झटके येत होते आणि रक्तदाब वाढलेला होता. खबरदारी म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. काही आवश्यक तपासण्या आणि एक न्यूरोलॉजिकल प्रक्रिया करण्यात आली असून ती न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी केली. सध्या ते आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली आहेत.

दरम्यान, सलीम यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून कुटुंबिय आणि सगळेच जवळचे नातेवाईक सातत्याने सलीम यांच्या भेटीसाठी येत आहेत. सोहेल खान आपल्या मुलगा निर्वाण आणि पूर्वाश्रमीची पत्नी सीमा सजदेह यांच्यासह लीलावती रुग्णालयात काही वेळापूर्वीच पोहोचले होते. तसेच सलमाननेही त्याची सगळीच महत्त्वाची कामं बाजूला ठेऊन सध्या वडिलांच्या प्रकृतीकडे लक्षकेंद्रीत केलं आहे. कुटुंबीयांकडून सातत्याने त्यांच्या प्रकृतीची चौकशी सुरू आहे. ९० वर्षीय सलीम खान यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले असून, त्यांची स्थिती स्थिर असल्याचंही सांगितले आहे. चाहत्यांकडून सलीम हे लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

Powered By Sangraha 9.0