मुंबईतील मानखुर्दच्या लल्लूभाई कपाऊंड येथील रेणुकामातेच्या मंदिराचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोंढा यांच्या सहकार्याने करण्यात आले. दि. १३ फेबु्रवारी रोजी मंदिराचा नूतनीकरण पूजा समारंभ संपन्न झाला. ही पूजा मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आली. मंदिराची स्थापना करणारी आणि पुजारी म्हणून मंदिराची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती आहे, किन्नर भगिनी प्राची कांबळे. त्यानिमित्ताने अशा या सामाजिक समरसतेचा आगळावेगळा संदेश देणार्या मंदिराविषयी...
सामाजिक चळवळीत काम करताना काही लोकांशी अनेकदा सामना होत असतो. त्यांचे प्रश्न असतात, अमूक एका जातीचेच लोक पुजारी कसे? अमूक एका जातीच्या लोकांनाच संधी का किंवा तुमच्या जगात मागासवर्गीय आणि किन्नर यांना काय स्थान आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर एकत्र देणारी एक घटना नुकतीच अनुभवली. राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सहकार्याने लल्लूभाई कंपाऊंड येथे माता रेणुकादेवीच्या मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले. या मंदिराची स्थापना करणारी आणि पुजारी म्हणून व्यवस्थापन सांभाळणारी व्यक्ती आहे, नवबौद्ध समाजाच्या प्राची कांबळे. प्राची या किन्नर भगिनी आहेत. मंदिर कसे निर्माण झाले याबद्दल बोलताना, प्राची म्हणतात, ”काही वर्षांपूर्वी मला सारखं स्वप्न पडायचं की, या जागी रेणुकामाता आहे. मी खूप अस्वस्थ झाले. तसे या जागी रेणुकामातेच्या मूर्तीसारखा पाषाणही आढळला. मी इथे पूजा करू लागले. छोटं मंदिर बांधलं. या कामी अंबुमणी दादाने मदत केली. हळूहळू या मंदिरामध्ये लोक नवस करू लागले. त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या. देवीने महिमा सगळ्यांना कळला.”
प्राची कांबळे यांच्याशी संवाद साधून कळले की, त्यांचे गाव कोकणातले. पण, आईवडील कामानिमित्त मुंबई, वरळी येथे स्थायिक झाले. बाबा महानगरपालिकेत सफाई कामगार, तर आई गृहिणी. प्राची त्यांच्यासाठी मुलगाच होती. पण, लहान वयापासूनच प्राची यांना मुलींसारखे राहायला आवडे. त्याच काळात त्यांच्या वडिलाचा मृत्यू झाला; तर काही काळातच आईही देवाघरी गेली. या धक्क्याने प्राची यांची बहीणही निराशेच्या गर्तेत गेली. त्यातच तिचाही मृत्यू झाला. आता जेमतेम आठ-नऊ वर्षांची प्राची आणि त्यांचा भाऊ हे दोघेच राहिले. भावाला जगवण्याची जबाबदारी प्राचीवर होती. त्यांची ओळख किन्नर भगिनी संध्या माने यांच्याशी झाली. तसे संध्या माने आणि प्राची यांच्या वयात फारसे अंतर नाही. पण, संध्या यांनी प्राचीला लहान लेकीसारखं सांभाळलं. शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केलं. पुढे प्राची लल्लूभाई कंपाऊंडमध्ये राहू लागल्या. किन्नर समुदायाचे नियम पाळत, देवीची पूजाअर्चा करत त्या शिक्षणही घेऊ लागल्या. सध्या त्या रात्र महाविद्यालयामध्ये शिकत आहेत. त्याचबरोबर एका स्वयंसेवी संस्थेमध्ये कार्यरत आहेत. तिथे शोषित-वंचित समाजासाठी आणि महिला, तसेच किन्नरांसाठी काम करण्याची त्यांना संधी मिळाली. किन्नर म्हणून त्यांच्या आयुष्यातही अनेक खडतर प्रसंग आले. पण, आई रेणुकामातेवर विश्वास ठेवत त्यांनी मार्गक्रमण सुरू केले. परिसरातील लोकांच्या अडीअडचणीला त्या उभ्या राहू लागल्या. प्राची जेव्हा स्वयंसेवी संस्थेत स्थिरावल्या, तेव्हा त्यांनी त्यांच्या गुरू संध्या यांनाही शिक्षण घेण्यासाठी उद्युक्त केले. त्यांनाही स्वयंसेवी संस्थेत काम करण्याची संधी दिली.
प्राची यांनी त्यांचा जीवनमार्ग प्रकाशमान झाल्यानंतर त्यांना साथ देणार्यांच्या आयुष्यातही प्रकाश परावर्तित करण्याचे काम केले. या मंदिराच्या पूजेचा शुभांरभ करताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, "हे मंदिर म्हणजे धर्म आणि सामाजिक कार्याचे प्रेरणास्थान आहे.” त्यांचे म्हणणे योग्यच होते; कारण या मंदिराच्या माध्यमातून आता इथे किन्नरांच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी कार्य सुरू होणार आहे. परिसरातील शोषित-वंचित गरजू व्यक्तींसाठी जागृतीपर मदतकार्य उभे राहणार आहे. ते काम उभे राहील, याची खात्री वाटते; कारण लल्लूभाई कंपाऊंडमधले ते रेणुकामातेचे मंदिर, मांगल्य आणि पावित्र्य त्या परिसरात सामावलेलं. पूजेचे पवित्र मंत्र आणि धुपादिकाचा सुगंध याने वातावरण भारलेले आणि आज तर मंदिरामध्ये पूजाविधी सुरू होते. तसे मंदिर चहुबाजूंनी मुस्लीम आणि विविध समाजांच्या लोकांच्या वस्तीने वेढलेले. या मंदिराबाबत या वस्त्यांचे काय म्हणणे असेल? यावर एकजण म्हणाली, "माता रेणुकादेवीचं मंदिर बांधलं म्हणून त्यांनी मग मंदिराच्या भिंतीला लागूनच त्यांच्या इस्लामच्या नावानं काहीतरी बनवलं.” पण त्यांच्यातलीच दोन-चार शहाणीसुरती माणसं बोलली, "रेणुकादेवी हाई ती, तिच्याबरोबर ईर्षा करू नका, नाहीतर होत्याचं नव्हतं होतं.” मग त्या लोकांनी ते तिथून काढलं. अर्थात, श्रद्धेच्या अनुषंगाने धर्माचे अधिष्ठान राखले जात असेल, तर ती श्रद्धा केव्हाही वंदनीयच!
या पार्श्वभूमीवर सांगायलाच हवे की, परिसराला लागूनच असलेल्या गोवंडीमध्ये काही महिन्यांपूर्वी मुस्लीम असलेल्या गुरू माँ या किन्नरला पोलिसांनी अटक केली. कारण, ती किन्नर नव्हतीच, तर तो बांगलादेशी घुसखोर ’बाबू खान’ होता. त्याने भारतात घुसखोरी केली. कोणाला संशय येऊ नये, म्हणून किन्नर वेश धारण केला. स्वतःला गुरू माँ घोषित केले आणि त्याआड शेकडो बांगलादेशी पुरुषांना मुंबईत किन्नर म्हणून वसवले. चोरी, लूटमार, अपहरण, खंडणी असे गुन्हे हे करत असत. मात्र, किन्नर म्हणून त्यांच्याविरोधात कुणी आवाज करत नसे. पण, त्यांचे खरे रूप उघडकीस आले. याअनुषंगाने समाजातल्याच असलेल्या आणि मुख्यतः भारताच्या मातीतल्याच असलेल्या किन्नर भगिनी प्राची कांबळे यांचे विचार कर्तृत्व खरंच अभिनंदनीय आहे. या मातीशी या समाजाशी आणि या देशाशी त्या आणि त्यांच्या सोबतच्या किन्नर भगिनी एकनिष्ठ आहेत. मागासवर्गीय समाजाला आणि किन्नरांनाही मूळ समाजापासून तोडण्यासाठी चिथावणी देणार्यांनी जरा मानखुर्दच्या रेणुकामातेच्या मंदिरामध्ये जावे. समाजद्वेषावर नाही, तर पूर्वापार धर्मसंस्कृती आणि सलोख्यावर जिवंत आहे, हे त्यांना कळेल.