मणिशंकर अय्यर... वयवर्षे ८४. काँग्रेसचे बुजुर्ग नेते आणि गांधी घराण्याचे निष्ठावंत. जन्म लाहोरचा असला, तरी त्यांचे कुटुंब तामिळनाडूमध्ये स्थायिक झाले. नंतर २६ वर्षे भारतीय मुत्सद्दी म्हणूनही त्यांनी काम केले आणि १९८९च्या सुमारास राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे मनमोहन सिंग सरकारच्या काळात पंचायतराज, पेट्रोलियम, युवा आणि क्रीडा यांसारख्या खात्यांचा कार्यभारही अय्यर यांनी सांभाळला. काँग्रेससाठी त्यांनी आपली लेखणीही वर्षानुवर्षे झिजवली. पण, काँग्रेसचा हाच ‘मणि’ आता पक्षाची उणीदुणी उगाळणारा कोळसा ठरल्याचेच चित्र दिसते. त्याचे कारण म्हणजे, मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेस पक्षावर आणि नेतृत्वावर पुनश्च डागलेली तोफ!
केरळमध्ये आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. पण, मणिशंकर अय्यर यांनी या निवडणुकांमध्येही काँग्रेसचा पराभवच होईल, अशी भविष्यवाणी केली. त्याचे कारणही सांगितले. ते म्हणजे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष. तसेच, "मी ‘नेहरुवियन’, ‘राजिवियन’ आहे; पण ‘राहुलियन’ नाही,” असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर काँग्रेस कार्यसमितीमधील पवन खेरा हे केवळ राहुल गांधींच्या हातातील बाहुले असल्याची टीकाही अय्यर यांनी केली. म्हणा, अय्यर यांनी त्यांच्याच पक्षावर तोंडसुख घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी वेळोवेळी काँग्रेसला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. पण, गांधी घराण्यासमोर पायघड्या घालण्याची परंपराच असलेल्या या पक्षाने साहजिकच अय्यर यांसारख्यांना अडगळीत टाकले. कारण, काँग्रेसला मुळी आपल्याच पक्षातील त्रुटी दाखवून देणारे, सुधारणा सुचवणारे आवाज ऐकूच येत नाहीत. इथे अगदी वरपासून ते खालपर्यंत फक्त गांधी घराण्यासमोर जी हुजुरी करणार्यांचीच चलती!
अय्यर असो वा थरूर, त्या गटात नाहीत, म्हणूनही ते पक्षात असूनही बाहेरचे. त्यामुळे भाजपमध्ये ज्येष्ठांना सन्मान दिला जात नाही, असा अपप्रचार करणार्या काँग्रेसींनी त्यांच्याच पक्षातील अय्यरांसारख्यांची अवस्था अशी का झाली, याचा जरूर विचार करावा. उत्तर मिळेलही कदाचित; पण तरीही त्यांचे तोंड आणि ‘हात’ बांधलेलेच असतील!
केवळ मणिशंकर अय्यरच नाही, तर पंजाबमधील माजी आमदार आणि काँग्रेसच्या माजी नेत्या नवजोत कौर सिद्धू यांनीही राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याच कारणास्तव दि. ६ फेब्रुवारी रोजी नवजोत कौर यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. राहुल गांधी यांना ‘पप्पू’ संबोधत, त्यांच्या नाकाखाली नेमके पक्षात काय सुरू आहे, त्याची त्यांना सुतराम कल्पना नसल्याचा गंभीर आरोप कौर यांनी केला. पण, त्यापेक्षाही कौर यांनी केलेल्या एका खळबळजनक आरोपामुळे पंजाब काँग्रेसची पोलखोल केली.
पंजाबमध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीसाठी पक्षाकडून ५०० कोटींची मागणी केली जाते, या कौर यांच्या सनसनाटी आरोपानंतर राज्यात गदारोळ माजला. कौर यांच्या आरोपांची चौकशी करण्यापेक्षा, त्यांची बाजू ऐकून घेण्यापेक्षा, उलट त्यांनाच काँग्रेस पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. म्हणा, अशाप्रकारे पक्षावर टीका केल्यामुळे गच्छंती झालेल्या नवजोत कौर या काही पहिल्यावहिल्या नेत्या नाहीत. यापूर्वी, पंजाबमधूनच माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग, सुनील जाखड, रवनित सिंग बिट्टू, मनप्रित सिंग बादल, अश्विनी कुमार, राजकुमार चाबेवाल यांसारख्या कित्येक पंजाब काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहेच. पण, एवढ्या नेत्यांच्या ‘एक्झिट’नंतरही पंजाब काँग्रेसमध्ये गळती अजूनही सुरूच दिसते. त्यामागचे कौर यांनी प्रामुख्याने सांगितलेले कारण म्हणजे, राहुल गांधी यांच्या आसपासचे कोंडाळे. ही ‘किचन कॅबिनेट’ राहुल गांधींना सत्यपरिस्थितीपासून दूर ठेवते आणि वेगळेच चित्र त्यांच्यासमोेर उभे करते. त्यामुळे पक्षपातळीवर, कार्यकर्ता स्तरावर पक्षात नेमके काय सुरू आहे, त्याची राहुल गांधींना सुतराम कल्पना नाही. तसेच पक्षांतर्गत राजकारणासह भ्रष्टाचाराचाही कौर यांनी चांगलाच भांडाफोड केला. तरी राहुल गांधी ढिम्मच!
पंजाब असो अथवा महाराष्ट्र, काँग्रेसची अवस्था गलितगात्र. पक्षांतर्गत कुरघोड्या, तिकिटासाठी पैशांची मागणी आणि ‘हम करेसे कायदो’ असाच देशातील सर्वांत जुन्या पक्षातील अनागोंदी कारभार. त्यामुळे, ‘मला बोलूच देत नाही’ असा आरोप करणार्या राहुल गांधींना त्यांच्याच पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांचे कळकळीचे म्हणणे कधीच ऐकू येत नाही. म्हणूनच या सोयीस्कर बहिरेपणावर त्यांनी इलाज करावा.