उत्तर प्रदेशात योगी सरकार सत्तेत आल्यापासून अयोध्येतील ‘दीपोत्सव’ जगभरात प्रसिद्ध झाला. लाखो दिव्यांनी उजळलेल्या अयोध्यानगरीची अगदी परदेशी पर्यटकांनाही भुरळ पडते. योगी सरकारने यापूर्वीही रशियन कलाकारांना अयोध्येला आमंत्रित केले होते. तेथील उत्साह आणि भक्तिभाव पाहून हे कलाकार इतके प्रभावित झाले की, त्यांनी मॉस्कोमध्येही अशाच प्रकारची रामलीला सादर करण्याचा निर्णय घेतला. मॉस्कोमध्ये ही रामलीला ‘दिशा’ नावाची संस्था आयोजित करत असून, तिचे प्रमुख डॉ. रामेश्वर सिंह आहेत. भारतीय दूतावासही या कार्यक्रमाला पूर्ण सहकार्य करत आहे.
डॉ. सिंह यांच्या मते, रामलीला हा केवळ नाट्यप्रकार नसून, तो सत्य आणि चांगले संस्कार शिकवणारा आहे. त्यामुळे रशियातील लोकांमध्ये याबद्दल मोठा उत्साह आहे. दि. २० फेब्रुवारीपासून होणार्या रामलीलेची सर्वात खास बाब म्हणजे, यात काम करणारे कलाकार रशियन आहेत. भगवान रामाची भूमिका ‘इवगेनी’ साकारणार आहेत, तर माता सीतेच्या भूमिकेत ‘दारिया’ दिसणार आहे. तसेच लक्ष्मणाची भूमिका ‘मुरात’ आणि हनुमानजींची भूमिका ‘दिमित्री’ साकारणार आहेत. रशियन कलाकारांना भारतीय वेशभूषेत रामभक्ती करताना पाहणे, हा खरोखरच एक वेगळा अनुभव ठरेल, यात शंका नाही.
रशियातील रामलीलेचा इतिहास आजचा नसून, खूप जुना आहे. १९६०च्या दशकातही तेथे एका प्रसिद्ध रशियन अभिनेत्याने रामलीला सादर केली होती. आता पुन्हा एकदा तोच काळ परत येत आहे. २० फेब्रुवारी रोजी मॉस्कोमध्ये यासाठी खास मंच उभारण्यात आला असून, येथे रशियन संगीत आणि भारतीय संस्कृतीचा संगम पाहायला मिळेल. या रामलीलेसाठी विशेषतः भारतीय पोशाख आणि गीते तयार करण्यात आली आहेत. या कार्यक्रमात मॉस्कोतील अनेक स्थानिक नागरिक, तसेच तेथे राहणारे भारतीय सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. रशियन कलाकार जेव्हा मंचावर भगवान श्रीरामांच्या आदर्शांचे दर्शन घडवतील, तेव्हा सर्वत्र भारतीय संस्कृतीचीच चर्चा होईल.
भव्य रामलीलेचे जगभरातील विविध देशांमध्ये होणारे सादरीकरण हे सांस्कृतिक संवाद आणि भारतीय परंपरेच्या जागतिक प्रसाराच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जाऊ शकते. सत्य, धर्म, कर्तव्य आणि आदर्श जीवन ही ‘रामायणा’तील मूल्ये सार्वत्रिक असल्याने ती जगातील कोणत्याही समाजाला प्रेरणा देणारीच. सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या दृष्टीने पाहिल्यास, विविध देशांतील लोक भारतीय संस्कृती, परंपरा आणि आध्यात्मिक विचार समजून घेऊ शकतात. जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीचा प्रसार होतो, जेणेकरून भारताच्या सांस्कृतिक वारशाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळते. ‘रामायणा’तील नैतिकता, आदर्श नेतृत्व आणि कुटुंब-मूल्ये सर्व समाजांसाठी प्रेरणादायी ठरतात. अशा कार्यक्रमांमुळे देशांमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतात. एकूणच, जगभरात सादर होणारी ‘रामलीला’ ही केवळ धार्मिक किंवा नाट्यपरंपरा नसून, सांस्कृतिक एकात्मता आणि सार्वत्रिक मूल्यांचा संदेश देणारे प्रभावी माध्यम म्हणून त्याकडे पाहता येते.
इंडोनेशियासारख्या जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातही स्थानिक परंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांसह रामलीला सादर केली जाते, हे भारतीय संस्कृतीच्या जागतिक प्रभावाचे आणि सांस्कृतिक समन्वयाचे महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. इथल्या संस्कृतीवर प्राचीन भारतीय परंपरेचा मोठा प्रभाव आहे. ‘रामायण’ हे महाकाव्य तेथे धार्मिक ग्रंथ म्हणून नव्हे, तर सांस्कृतिक वारसा म्हणून जपला जातो. त्यामुळे रामकथा नृत्य, नाट्य आणि लोकपरंपरेतून सादर केली जाते.
आज थायलंड येथे ‘रामायण’ ‘रामाकियन’ नावाने प्रसिद्ध आहे; तर कंबोडियात ‘रीमकेर’ आणि लाओसमध्ये ‘फ्रा लाक फ्रा लाम’ नावाने ते सादर होते. त्याचप्रमाणे मलेशिया, नेपाळ, श्रीलंका, फिजी, मॉरिशस अशा विविध ठिकाणी स्थानिक कलाकारांकडून ‘रामलीला’ सादर झाल्या आहेत. दक्षिण-पूर्व आशियापासून कॅरिबियन आणि युरोपपर्यंत विविध देशांत स्थानिक परंपरांनुसार रामकथा सादर होत असल्याने भारतीय संस्कृतीचा जागतिक प्रभाव आणि सार्वत्रिक मूल्यांचा स्वीकार दिसून येतो. म्हणूनच ‘रामलीला’ ही केवळ धार्मिक किंवा कलात्मक परंपरा नसून, सांस्कृतिक एकात्मता, मानव मूल्ये आणि जागतिक बंधुभाव यांचा प्रभावी सेतू म्हणून पाहता येते.