छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या इच्छेने काही महाविद्यालयीन मुलांनी ‘गारद’नामक समाजसेवी संस्था स्थापन केली. दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्याने स्थापन झालेली ही संस्था उद्या आपला आठवा वर्धापन दिन साजरा करत आहे. ठाणे-मुंबईतील तमाम हितचिंतक कुटुंबांतील व्यक्तींच्या वाढदिवस आणि स्मृतिदिनानिमित्त ‘गारद’ला देणगी देतात. आजच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘लोकसहभागातून लोकसेवा’ करणार्या ‘गारद’ या समाजसेवी संस्थेविषयी...
२०१९ सालची गोष्ट. अकरावीत शिकणारे काही शिवभक्त कट्ट्यावर गप्पा मारत बसले होते. आजूबाजूला ‘डेज’चे वातावरण असताना या मावळ्यांच्या डोळ्यांसमोर मात्र ‘शिवजयंती’ हा एकच सण होता. या शिवजयंतीला म्हणजे दि. १९ फेब्रुवारीला काहीतरी वेगळं करायचं सगळ्यांनी मिळून ठरवलं. पण नेमकं काय, ते ठरत नव्हतं. सर्वसामान्य तरुणांप्रमाणे बाईकला झेंडे लावून रॅली काढायचीच कल्पना त्यांनाही प्रथम सूचली. पण त्यात वेगळेपण म्हणावं, असं काहीच नव्हतं आणि त्यांचं ध्येय तर छत्रपतींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं होतं. त्यासाठी आपण मोठ्यांपेक्षा लहान किंवा किशोरवयीन मुलांसोबत काम केलं पाहिजे, त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे.
उद्याचं भविष्य असणार्या आजच्या तरुणाईच्या मनात छत्रपतींचे विचार पेरण्यासाठी ते ‘विचार शिवशंभूंचे आणि ध्येय समाजसेवेचे’ ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून विचार करू लागले. त्यांनी ठाण्यातील एका शालाश्रमात जाऊन मुलांना महाराजांचे किस्से सांगितले, संवादात्मक चर्चासत्र आयोजित केले आणि स्वखर्चातून अन्नदान केले. महाराजांची ‘गडपती, गजअश्वपती, भूपती, प्रजापती...’ अशी ’गारद’ देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. त्याचसोबत महाराजांनी समाजासाठी तयार केलेल्या राखीव दलालादेखील ‘गारद’ असंच म्हटलं जायचं. त्यातूनच त्यांनी कल्पना सूचली आणि त्यांनी त्या कार्यक्रमाचं नाव ‘गारद’ ठेवलं होतं.
त्या दोन तासांच्या सत्रातून यांना खूप समाधान मिळालं. असंच कार्य पुढेही करत राहावं, असं मनापासून वाटलं. त्यामुळे पुन्हा एकदा लहान मुलांनाच लक्ष्य करत ‘शिक्षणाची गुढी’नामक एक कार्यक्रम आयोजित केला. ठाण्यातलीच काही कचरावेचक मुलं तेथेच डम्पिंग ग्राऊंडजवळ राहतात. काही मुलं सिग्नल शाळेत किंवा महापालिका शाळेत जातात, तर काही मुलं शिक्षणसाहित्याअभावी किंवा शुल्काअभावी शिक्षणापासून वंचितच राहिली आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पॉकेटमनीमधून काही शैक्षणिक साहित्य घेऊन त्या मुलांना दिले. त्यांच्याशी मैत्री करत त्यांनी सोबत वृक्षारोपण उपक्रमदेखील राबवला.
हे सर्व ‘गारद’चे मावळे एकदा सहलीसाठी पुण्याला गेले असता, त्यांनी जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या. त्यांच्या लक्षात आले की,मुलांना शिक्षणामध्ये रस नाही. या मुलांना शिक्षणात रस कसा वाटेल याबाबत त्यांनी काम करायचे ठरवले. पण, तेव्हा त्यांच्यापैकी कोणीच अर्थार्जन करत नव्हतं. मग हे कसं करता येईल? काही ज्येष्ठ समाजसेवकांना सूचना केल्या की नोंदणीकृत संस्था विधायक कार्यासाठी निधी गोळा करू शकतेे. त्यांनी ‘गारद फाऊंडेशन’ नावाने संस्था नोंदणी केली. शिवप्रेमाखातर लोगोसुद्धा महाराजांच्या राजमुद्रेच्याच आकाराचा तयार केला. याच सांस्कृतिकतेबरोबर भावनिकतेचा मेळ घालून एक कोवळा अंकुर आणि त्यावर पाच हातही लोगोमध्ये दाखवले आहेत.
‘गारद’ संस्थेने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘लीडरशिप ट्रेनिंग’सारखे उपक्रम घेतले. मुलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, म्हणून ‘गारद’कडून दरवर्षी दि. १९ फेब्रुवारीला ‘अभिव्यक्त’नामक वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. शाळेपासून बारावीपर्यंतच्या मुलांसाठी ‘अभिव्यक्त : आपल्या कलेतून व्यक्त होणारे व्यासपीठ’ ‘गारद’ने उपलब्ध करून दिले. एकदा स्पर्धेवेळी "महाराजांनी अफझलखानाला कसं मारलं?” असा प्रश्न विचारला, तेव्हा मुले एकसुरात "वाघनखांनी” असं म्हणाली; पण त्यामागचे जावळीच्या खोर्यातले नियोजन, युद्धनीती, जिवा महालाचे प्रसंगावधान आजच्या पिढीला ठावूकच नाहीये, असे गारदच्या कार्यकर्त्यांना लक्षात आले. त्यामुळे राजनीति, गनिमी कावा, युद्धनीति यांचीसुद्धा चर्चा या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाते.
मुंबईच्या आसपास असूनही दहा-बारा वर्षांपासून वीज न पोहोचलेल्या ठिकाणी ‘गारद’ने आपल्या ‘ऊर्जा प्रकल्पा’अंतर्गत संग्रहित निधीतून सोलार पॅनेल बसवून दिल्या आणि देखभालीसाठी तेथे एक टीमदेखील नेमली. ‘गारद’च्या स्वयंसेवकांना भविष्यात आरोग्यविषयक, विशेषतः चतुर्थ श्रेणी कामगारांच्या आरोग्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. सध्या ते या उपक्रमाचं कार्यक्षेत्र आणि नेमकी गरज यांचा अभ्यास करत आहेत. तसेच ‘युवा उद्योजक’नामक एक उपक्रम गारदकडून नजीकच्या भविष्यकाळात सुरू केला जाणार आहे. ‘गारद फाऊंडेशन’ला आज १०० स्वयंसेवक जोडले गेले आहेत. त्यांनी कामाची वाटणी करून घेतली आहे. ‘गारद’चे स्वयंसेवक हेच ‘गारद’च बळ आहे. ‘गारद फाऊंडेशन’च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा!
(अधिक माहितीसाठी)
९८६९३४५७५३