भ्रमंतीच्या माध्यमातून स्वत: आनंद उपभोगत, तो दुसर्याला देण्यासाठी तळमळीनेकार्य करणार्या धनंजय मदान यांच्याविषयी...
भ्रमंती हा केवळ विरंगुळा नसून, आत्मानुभूतीचा, आत्मसंवादाचा आणि विश्वाशी नाते दृढ करणारा एक सृजनशील छंद आहे. त्यामुळे आजही धकाधकीच्या जीवनामध्ये संधी मिळताच भ्रमंतीसाठी बाहेर पडणार्यांची संख्या लक्षणीय अशीच. भ्रमंतीला छंद मानणारे आणि देश-विदेशात भ्रमंती करणारे असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे धनंजय मदान.
धनंजय यांचा जन्म १९५९ साली पनवेलमध्ये झाला. त्यावेळी पनवेल म्हणजे एक टुमदार असे गावच होते. पनवेलमधील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण धनंजय यांनी घेतले. त्यानंतर पुढील शिक्षण दुसर्या शाळेमध्ये घ्यावे लागले. उल्लेखनीय बाब म्हणजे, सातवीपर्यंत एकच शिक्षक असलेल्या शाळेमध्येच बागकामापासून विविध कलागुणांचे संस्कार धनंजय यांच्यावर झाले. पुढे आठवीसाठी प्रवेश घेतलेल्या नव्या शाळेने धनंजय यांना वाचनाची गोडी लावली. त्यामुळे आजवर मैदानात रमणारे धनंजय आता पुस्तकातही रमू लागले. वाचनाची लागलेली गोडी इतकी प्रबळ होती की, त्यांनी अल्पावधीतच मराठीमधील अनेक कादंबर्या वाचून काढल्या. त्यांची वाचनाची आवड पुढे शाळेनंतरही त्यांनी जपली.
गो. नी. दांडेकरांच्या असंख्य पुस्तकांमुळे जीवन जगण्याचा एक नवा दृष्टिकोन धनंजय यांना मिळाला, तर वाचनामुळे या पुस्तकापल्याडचे विश्व उलगडण्याचे विचार त्यांच्या मनात रुंजी घालू लागले.अशातच, बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकातील गड-किल्ल्यांची माहिती वाचून त्यांची पावले आपोआप शिवरायांच्या दुर्गांकडे वळली. रणजित देसाई, शिवाजी सावंत अशा लेखकांची पुस्तकेही वाचनात असल्याने इतिहासाकडे बघण्याचा धनंजय यांचा एक समग्र दृष्टिकोन विकसित होऊ लागला होताच, त्याचबरोबर किल्ल्यांकडे बघण्याचे एक भानही विकसित झाले. त्यामुळे किल्ले पाहण्याचा छंदच धनंजय यांना जडला. ‘एसटी’ने किल्ल्यांच्या पायथ्यापर्यंत जावे, तेथून पुढे चालत किल्ला पालथा घालावा, हा त्यांचा शिरस्ता. दरम्यान, किल्ला पाहताना त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसराचे सूक्ष्म अवलोकन करणे, वाटेत भेटणार्या वाटसरुंशी तन्मयतेने संवाद साधणे अशा गुणांचा विकासही या प्रवासादरम्यान झाला. यातूनच धनंजय यांना ट्रेकिंगची आवड निर्माण झाली आणि डोंगरमाथ्यावरून दिसणार्या सृष्टीवैभवाची त्यांच्या मनाला भुरळ घातली ती कायमचीच.
त्याचवेळी आनंद वाटल्याने वाढतो, या न्यायाने धनंजय यांनी एकट्याने हा आनंद उपभोगण्यापेक्षा इतरांनाही कसा वाटता येईल, याचा विचार सुरू केला. त्यांचे बालपणीचे मित्र धनंजय यांच्याकडे कर्नाळा दाखवशील का, अशी विचारणा करण्यासाठी आले. यातूनच धनंजय यांना आनंद वाटण्याचा मार्ग सापडला. धनंजय यांनी त्यांच्या या मित्रांच्या मदतीनेच ‘निसर्गमित्र’ या त्यांच्या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर या संस्थेच्या माध्यमातून ट्रेकिंग करणे, वृक्षलागवड, निसर्गभ्रमंती, सायकलिंग असे विविध उपक्रम राबविण्याचे कार्य सुरू झाले. कोणताही आर्थिक स्वार्थ न बाळगता, या संस्थेचे कार्य आजही अव्याहतपणे सुरू असून, उत्तरोत्तर ते वाढतेच आहे. आज जवळपास ३०० किल्ल्यांची पाऊलवाट धनंजय यांनी पालथी घातली आहे.
पुढे किल्ले आणि निसर्ग पाहून झाल्यानंतर, धनंजय यांनी सायकलभ्रमंतीचीही सुरुवात केली. अल्पावधीतच सायकलवरून भ्रमंतीसाठीचे कौशल्य आणि शारीरिक क्षमता विकसित केल्यानंतर देशभरामध्ये त्यांनी सायकलवरून भ्रमंती करण्यास सुरुवात केली. हे करत असतानाच, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील शांतिवार्तेच्या दरम्यान दोन्ही देशांतील सौहार्द वाढवण्याच्या प्रयत्नांचा छोटासा भाग म्हणू पनवेल ते पाकिस्तान अशी सायकलभ्रमंती करण्याचे ठरवले होते. पनवेलवरून निघून ते वाघा सीमेपर्यंत गेले आणि पाकिस्तानातील राजकीय वातावरण बदलल्याने त्यांना पुढील प्रवेश नाकारण्यात आला. तसेच त्यांनी पनवेल-श्रीलंका प्रवासही सायकलवरून केला. धनंजय यांनी युरोपही सायकवरूनच पालथा घातला. या प्रवासादरम्यान दिसणारी माणसे, निसर्ग, संस्कृती आपल्याला अधिक समृद्ध करते, असे धनंजय सांगतात.
नुकतीच धनंजय आणि त्यांच्या सहा सवंगड्यांनी थायलंड, लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम अशा चार आग्नेय देशांची सफरही सायकलवरून केली. भविष्यात बिहार आणि उरलेले काही देश धुंडाळण्याचे स्वप्न धनंजय यांनी पाहिले आहे. ‘नित्य नूतन हिंडावे| उदंड देशाटन करावे|’ हा समर्थ रामदासांचा बोधच धनंजय यांनी आचरणात आणला आहे. भ्रमंतीच्या माध्यमातून स्वत: आनंद उपभोगत, तो दुसर्याला देण्यासाठी तळमळीने कार्य करणार्या धनंजय मदान यांना पुढील मोहिमांसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!