मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचे निधन

    17-Feb-2026
Total Views |

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रवीणा देशपांडे (Praveena Deshpande) यांचे वयाच्या ६०व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून चाहत्यांसह सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांमधील त्यांच्या लक्षवेधी भूमिकांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्या नुकत्याच ‘तस्करी’ (‘Taskaree’) या वेब सिरीजमध्ये झळकल्या होत्या.

काही वर्षांपूर्वी त्यांना रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले होते. मात्र, अपार जिद्द आणि सकारात्मकतेच्या जोरावर त्यांनी या आजारावर मात केली. २०२३ साली त्यांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत नव्या सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. परंतु अलीकडेच त्यांना हा त्रास पुन्हा जाणवू लागला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुले असा परिवार आहे.

प्रवीणा यांच्या अधिकृत सोशल मीडियावरून कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची बातमी जाहीर केली. त्यांच्या छायाचित्रासोबत भावनिक संदेश शेअर करत, ‘श्रीमती प्रवीणा देशपांडे यांनी अखेरचा श्वास घेतला’ अशी माहिती देण्यात आली. तसेच दुपारी ३ वाजता अंधेरी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार देखील करण्यात आले आहेत. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ही बातमी समोर येताच मराठी चित्रपट व सिनेक्षेत्रातील अनेक कलाकारांनी श्रद्धांजली अर्पण केली.

गाजलेल्या भूमिका आणि कारकीर्द

प्रवीणा देशपांडे यांनी सिनेविश्वात अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या. घर एक मंदिर, कुमकुम, करम अपना अपना आणि कुल्फी कुमार बाजेवाला यांसारख्या मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. चित्रपटांमध्येही त्यांनी ठसा उमटवला. जलेबी आणि रेडी या चित्रपटांत त्यांनी साकारलेल्या सहाय्यक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. विशेषतः ‘रेडी’मध्ये सलमान खान आणि असीन यांच्यासोबतची त्यांची भूमिका उल्लेखनीय ठरली.

अलीकडेच त्या 'तस्करी' या वेब सिरीजमध्ये छोटेखानी भूमिकेत दिसल्या होत्या. दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या दिग्दर्शनाखालील ही मालिका त्यांच्या कारकिर्दीतील अखेरची ऑन-स्क्रीन उपस्थिती ठरली.

रंगभूमीपासून आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात करत त्यांनी दूरचित्रवाणी आणि चित्रपटसृष्टीत भक्कम पाय रोवले. मजबूत, संवेदनशील आणि कुटुंबवत्सल स्त्रियांच्या भूमिका साकारण्यात त्या विशेष पारंगत होत्या. त्यांच्या अभिनयातील भावनिक खोली आणि सहजता यामुळे प्रत्येक भूमिका प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचत असे. त्यांच्या अकाली निधनाने मनोरंजन क्षेत्राने एक गुणी आणि अनुभवी अभिनेत्री गमावली आहे. त्यांच्या आठवणी आणि अभिनयाची छाप मात्र कायम स्मरणात राहील.