
मुंबई : बॉलिवूडमधून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. अभिनेता सलमान खानचे (Salman Khan) वडील आणि ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान (Salim Khan) यांना मुंबईतील लिलावती रुग्णालय Lilavati Hospital येथे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवार (17 फेब्रुवारी) सकाळी त्यांना रुग्णालयात आणण्यात आले असून सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
मंगळवारी सकाळी सलमान खान रुग्णालयातून बाहेर पडताना दिसले. त्यांच्या सोबत सुरक्षा रक्षकही होते. तसेच जावई अतुल अग्निहोत्री आणि आयुष शर्मा यांनाही रुग्णालय परिसरात पाहण्यात आले. मुलगी अलवीरा खानदेखील वडिलांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचली होती. दुपारपर्यंत सलमान, आयुष आणि अतुल रुग्णालयातून निघून गेल्याचे समजते.
पीटीआयच्या वृत्तानुसार, सलीम खान यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मात्र त्यांना नेमकं कोणत्या कारणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं, याबाबत कुटुंबीयांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज लेखक
इंदूरमध्ये जन्मलेल्या सलीम खान यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर कथा दिल्या. जंजीर Zanjeer, शोले Sholay आणि डॉन Don यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या कथालेखनात त्यांचा मोलाचा वाटा आहे. जावेद अख्तर Javed Akhtar यांच्यासोबतची ‘सलीम-जावेद’ ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी लेखक जोड्यांपैकी एक मानली जाते. कथानकाची मांडणी आणि प्रभावी व्यक्तिरेखा उभारण्यात सलीम खान यांचे विशेष योगदान असे, तर संवाद आणि पटकथेची जबाबदारी जावेद अख्तर सांभाळत असत. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सलीम खान यांनी आपला ९०वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीय आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. सलीम खान यांनी आपल्या कुटुंबाला नेहमीच एकत्र ठेवले. त्यांनी दोन विवाह केले होते. पहिली पत्नी सुशिला चरक (सलमा खान) आणि दुसरी पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री हेलेन यांच्याशी त्यांनी लग्न केले.
सलीम हे सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान, अलवीरा आणि अर्पिता खान यांचे वडील आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे या प्रसंगी पुन्हा एकदा दिसून आले.' दरम्यान, सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची सर्वांना प्रतीक्षा आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना चाहत्यांकडून केली जात आहे.