झेंडा भल्या कामाचा घेऊनी निघाला...!

    17-Feb-2026   
Total Views |
Ravi Naik
 
जीवाचीही पर्वा न करता, रात्रंदिवस समाजकार्य करणारे अत्यंत लोकप्रिय समाजसेवक म्हणजे मुंबईतील मुलुंडचे रवी नाईक. त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
 
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्‌‍|
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः॥
 
याचा अर्थ आहे, “हे अर्जुन, एक तर तू युद्धात वीरगती पत्करून स्वर्ग प्राप्त कर किंवा विजयी होऊन पृथ्वीचा उपभोग घे. त्यामुळेच तू निश्चित संकल्प करून अन्याय-अत्याचाराविरोधात युद्धाला तयार हो.” स्वाध्याय परिवारात आणि आजी, तसेच आईकडून ‌‘गीते‌’तले हे वचन रवी नाईक यांनी एकलेले. त्यातले सत्य त्यांना उमजलेले. त्यामुळेच कुठेही, कोणावरही अत्याचार झाला किंवा असत्य, अन्याय घडला, तर त्याविरोधात संघर्ष करण्यासाठी रवी नाईक सदैव पुढे असतात, तर मुलुंडचे रवी नाईक हे उद्योजक. ते म्हाडा कॉलनी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे संस्थापक असून, सध्या सल्लागार आहेत, तर ‌‘म्हाडा कॉलनी सोसायटीज असोसिएशन‌’चे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेतला तर जाणवते की, मराठा समाजाचे भास्कर नाईक आणि मंदाकिनी नाईक हे दाम्पत्य मूळच देवगडचे. कामानिमित्त ते मुंबईत स्थायिक झालेले. त्यांचे सुपुत्र रवी. भास्कर हे अत्यंत समाजशील. नाईक दाम्पत्य स्वाध्याय परिवाराचे अनुयायी.
 
रवी यांनी दहावीनंतर ‌‘आयटीआय‌’मधून प्रशिक्षण घेतले आणि वडिलांनी उभारलेल्या उद्योगात काम सुरू केले. याच काळात ते सामाजिक कार्यही करत असत. अडीनडीला लोकांची मदत करत असत. त्यांच्या कॉलनीत काही समाजकंटक मुलींची छेड काढायचे. एकेदिवशी त्या गुंडांनी मंगल नावाच्या मुलीची छेड काढली. रवी यांनी त्या गुंडांना चांगलाच धडा शिकवला. (त्यावेळी मंगलसोबतच आपला विवाह होईल, हे रवी यांच्या गावीही नव्हते.) दादागिरी करून झुंडशाहीने सामान्य माणसांना छळणाऱ्या, त्रास देणाऱ्यांमध्ये रवी नाईक यांची जरब होती आणि आहे.
 
असो. रवी नाईक यांचे नाते घट्ट आहे. त्यांनी हजारोंच्या वर आरोग्य शिबिरे आणि सामाजिक जागृती शिबिरांचे आयोजन केले. लोकआंदोलन करून समाजाच्या सहभागाने समाजाचे प्रश्न सोडवण्यामध्ये रवी नाईक यांनी अगदी मास्टरकीच मिळवलेली. त्यातली काही उदाहरणे- 2000 साल होते ते. म्हाडा कॉलनीच्या पाठीमागे जागा अडवून काही लोकांनी अवैधरीत्या झोपड्या बांधल्या. म्हाडा कॉलनीमध्ये जवळजवळ 60 लोकांच्या घरी घर फोडून चोरी करण्याच्या घटना झाल्या. ते गुन्हे या वस्तीतील गुन्हेगारांनीच केले, याचे पुरावे रवी यांच्याकडे होते. रवी यांनी लोकसंघर्ष उभा केला आणि या झोपड्या तोडल्या गेल्या. मात्र, झोपड्या तोडल्या म्हणून रवी यांच्या घरावर मोर्चा आणण्यात आला. त्यांना धमक्याही देण्यात आल्या; पण रवी यांची बाजू सत्याची होती. त्यामुळे शेवटी अनधिकृत झोपडी वसवणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले.
 
अशीच एक घटना, म्हाडा कॉलनीमध्ये काही लोकांनी जागा अडवून ‌‘समाजकल्याण‌’ बांधायचा घाट घातला. वास्तविक, ती जागा म्हाडा कॉलनीची होती. त्यावेळीही रवी यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हा डाव उधळून लावला. पुढे त्यांनी मुलुंड येथील शाळांच्या बाहेर 26 स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला; तर मुलुंड टोलनाका ते पम्पिंग सर्व्हिस रोडच्या दरम्यान त्यांनी 189 रस्त्यांवरचे पथदिवे बसवून घेतले. तसेच 2010 सालाच्या आसपास म्हाडा कॉलनीजवळ मोजून दहा अपघात झाले होते. अशा वेळी रवी यांनी लोकांना एकत्रित करत ‌‘रास्ता रोको‌’ आंदोलन केले. या आंदोलनामुळे प्रशासनाने पुढाकार घेतला आणि हा पूल तयार झाला, तर दुसरीकडे परिसरात फुटपाथ-पूल होता. त्याचा पाया बांधण्यात आला होता. बाजूला उच्चभू्र लोकांचे टॉवर होते. त्यांनी हा पूल झाला तर आम्हाला त्रास होईल, असा पवित्रा घेतला. त्यामुळे या पुलाचे कामही अर्धवट होते. रवी यांनी यासाठीही जनआंदोलन उभे केले.
 
त्यांनी तत्कालीन आयुक्त रत्नाकर गायकवाड आणि सहआयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली. पूल का आवश्यक आहे, हे पुराव्यासकट सांगितले. त्यामुळे हा पूलही तयार झाला. 2019 साली कॉलनीमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. बाहेरून कुणीतरी व्यक्ती येऊन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करायचा. घाबरून त्याविरोधात कुणीही तक्रार करायला पुढे आले नाही. रवी यांनी रात्रंदिवस एक करत, त्या गुन्हेगाराचा माग काढला. शेवटी तो गुन्हेगार जेरबंद झाला. ‌‘कोणी निंदा, कुणी वंदा, आमचा समाजहिताचा धंदा‌’ या उक्तीने रवी नाईक समाजकार्य करतात. ते म्हणतात, “मी आयुष्यभर समाजहिताचे कार्य करणार. मला लोकहितासाठी संघर्ष करण्याची भीती वाटत नाही.” रवी यांचे कार्य पाहून ते गीत आठवते-
 
झेंडा भल्या कामाचा
जो घेऊनी निघाला,
तू चाल पुढं तुला रं गड्या
भीती कुणाची? पर्वाही कुणाची?
 
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.