भारत-फ्रान्स सहकार्याची नांदी! मॅक्रॉन -मोदी चर्चेनंतर 'विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी'ची घोषणा

    17-Feb-2026   
Total Views |

PM Modi - Macron Meet

मुंबई : (PM Modi - Macron Meet) फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही मुंबई दौऱ्यावर आले. मुंबईतील लोकभवन येथे मंगळवार दि. १७ फेब्रुवारी रोजी दोन्ही वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही देशातील व्यापार धोरणांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर पंतप्रधान मोदींनी माध्यमांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारत आणि फ्रान्स यांच्यातील 'विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी'ची घोषणा केली.(PM Modi - Macron Meet)
२०२६ हे वर्ष भारत-युरोप संबंधांसाठी टर्निंग पॉईंट ठरणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, २०२६ हे वर्ष भारत-युरोप संबंधांसाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे. नुकतेच भारताने युरोपियन युनियनसोबत सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement) केला असून त्यामुळे भारत-फ्रान्स व्यापार आणि गुंतवणुकीत मोठी वाढ होईल. तसेच डबल टॅक्सेशनविरोधातील करारावर सहमत होत दोन्ही देशांनी गुंतवणुकीसाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.(PM Modi - Macron Meet)
भारत-फ्रान्स भागीदारी जागतिक स्थिरतेसाठी एक शक्ती बनेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "भारत-फ्रान्स भागीदारीला कोणत्याही सीमा नाहीत. या दोन्ही देशांतील भागीदारी खोल महासागरांपासून सर्वात उंच पर्वतांपर्यंत पसरलेली असेल. जग अनिश्चिततेच्या काळातून जात असताना, भारत-फ्रान्स भागीदारी जागतिक स्थिरतेसाठी एक शक्ती बनेल, भारत-फ्रान्सच्या द्विपक्षीय संबंधात संरक्षण, स्वच्छ ऊर्जा, अवकाश आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील सहकार्यावर भर दिला जाईल. हा उपक्रम उद्योग, स्टार्टअप आणि एमएसएमई यांना जोडेल. विद्यार्थी आणि संशोधकांमधील देवाणघेवाणीला प्रोत्साहन देईल आणि फ्रान्ससोबत संयुक्त करारासाठी नवीन केंद्रे स्थापन करेल.
भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष २०२६ निमित्त मॅक्रॉन यांचा हा चौथा भारत दौरा आहे आणि मुंबईला त्यांचा पहिलाच दौरा आहे. हा दौरा दोन्ही राष्ट्रांमधील वाढत्या धोरणात्मक आणि तांत्रिक भागीदारी मजबूत करेल.(PM Modi - Macron Meet)
मॅक्रॉन यांनी मानले आभार
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि द्विपक्षीय संबंधांना उल्लेखनीय आणि अद्वितीय असल्याचे म्हटले. ते म्हणाले की दोन्ही राष्ट्रांनी त्यांचे संबंध विश्वास, मोकळेपणा आणि महत्त्वाकांक्षेवर आधारित विशेष धोरणात्मक भागीदारीकडे नेण्याचा निर्णय घेतला आहे. मॅक्रॉन यांनी इंडो-पॅसिफिकमधील सहकार्य, तंत्रज्ञान आणि नियम-आधारित व्यवस्थेवर प्रकाश टाकला आणि आयएमईसी कॉरिडॉर, कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी यासारख्या संयुक्त उपक्रमांचा उल्लेख केला.(PM Modi - Macron Meet)
सावरकरांच्या ऐतिहासिक उडीचा मोदींकडून उल्लेख

गेल्या वर्षी फ्रान्सच्या दौऱ्यादरम्यान मार्सेलिस शहराच्या भेटीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि सामायिक मूल्यांनी दोन्ही देशांना जोडल्याचे सांगितले. मार्सेलिस हे फ्रान्सचे सर्वात मोठे बंदर असून, पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतीय सैनिकांनी याच ठिकाणाहून युरोपमध्ये पाऊल ठेवले होते. मोदींनी मार्सेलिस भेटीच्या आठवणींना उजाळा देताना राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्सेलिसमधील ऐतिहासिक समुद्रउडीची आठवण करून दिली आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या शौर्याचा गौरव केला.(PM Modi - Macron Meet)

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\