Odisha Blast CCTV: छतावर बॉम्ब तयार करताना भीषण स्फोट; CCTV फुटेजमुळे धक्कादायक खुलासा, NIA तपासात सक्रिय

17 Feb 2026 12:09:58

Odisha Blast CCTV
 
भुवनेश्वर (ओडिशा) : (Odisha Blast CCTV) ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील सुंदरपाडा परिसरात २७ जानेवारी रोजी झालेल्या भीषण स्फोटप्रकरणी नवे आणि धक्कादायक तपशील समोर आले आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून त्यामध्ये स्फोटाची तीव्रता स्पष्टपणे दिसत आहे. फुटेजनुसार स्फोट इतका जबरदस्त होता की संपूर्ण परिसर हादरून गेला आणि घाबरलेले नागरिक घराबाहेर धावताना दिसले.

 
छतावर स्फोटक तयार करताना भीषण स्फोट
प्राथमिक माहितीनुसार, एका घराच्या छतावर पाण्याच्या टाकीमागे काही जण स्फोटक साहित्य तयार करत होते. अचानक जोरदार स्फोट झाला आणि आगीच्या प्रचंड ज्वाळा उसळल्या. फुटेजमध्ये जखमी अवस्थेत लोक पळताना दिसतात. एका व्यक्तीने टाकीचे पाणी सोडून आग विझवण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसते. स्फोटाचा आवाज इतका तीव्र होता की आजूबाजूच्या परिसरातही जोरदार धक्के जाणवले. या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले. सर्वांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून उर्वरित दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
हिस्ट्रीशीटर शहनवाज मलिकचा मृत्यू
या स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये कुख्यात हिस्ट्रीशीटर शहनवाज मलिक आणि त्याची आई लिजातुन बीबी यांचा समावेश होता. उपचारादरम्यान ४ फेब्रुवारी रोजी शहनवाजचा, तर १० फेब्रुवारी रोजी त्याच्या आईचा मृत्यू झाला. शहनवाज, त्याची आई, बहीण आणि मित्र अमित रंजन मलिक हे या स्फोटात जखमी झाले होते. सर्वांना कॅपिटल रुग्णालयात हलवण्यात आले व नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
शहनवाज मलिकविरुद्ध खूनाचा प्रयत्न आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसह सात गुन्हे दाखल होते. सहा महिन्यांपूर्वीच तो जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता.
 






View this post on Instagram
















A post shared by MahaMTB (@themahamtb)


NIAकडे तपास; स्फोटकांचा शोध
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तपास राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडे सोपवण्यात आला आहे. एनआयए स्फोटामागील संभाव्य कट, मोठे नेटवर्क आणि इतर पैलूंवर तपास करत आहे. प्राथमिक अंदाजानुसार, छतावर एक किंवा अधिक देशी बॉम्ब तयार करताना हा स्फोट झाला असावा.
 
घटनास्थळावरून माती व मलब्याचे नमुने जप्त करण्यात आले असून फॉरेन्सिक तपासाद्वारे स्फोटकांचा प्रकार निश्चित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्फोटानंतर शहरातील संवेदनशील भागांत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
 
इतर जखमींची चौकशी लवकरच
उर्वरित दोन जखमींची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांची सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे. अवैध बॉम्बनिर्मितीत आणखी कोणाचा सहभाग होता का आणि यामागील उद्देश काय होता, याचा तपास केला जाणार आहे.
 
सध्या अधिकृतरीत्या कोणताही अंतिम निष्कर्ष जाहीर करण्यात आलेला नसला तरी हा प्रकार केवळ साधा गुन्हा नसून व्यापक सुरक्षेशी संबंधित गंभीर बाब असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Powered By Sangraha 9.0