केरळमध्ये मुस्लीम संघटनेचा ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ला विरोध

    17-Feb-2026   
Total Views |

Vande Mataram
 
राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ हा राष्ट्रचेतनेचा मंत्र म्हणत हसतमुखाने सर्वस्वाचे बलिदान केले. त्यांच्या बलिदानाने मिळालेले स्वातंत्र्य विनासायास उपभोगताना या मंत्राचा उच्चार करणेही देशातील मुस्लीमांच्या जीवावर येत आहे. ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ म्हणण्याचा कायदा केल्याने त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून, हा कायदा मागे घेण्याची मागणी वाढली आहे...
 
सर्व शासकीय कार्यक्रम, शाळा, महाविद्यालये, अन्य सार्वजनिक कार्यक्रम इत्यादी स्थानी राष्ट्रगीताबरोबरच राष्ट्रीय गीतही संपूर्ण म्हणण्यात यावे, असा आदेश केंद्र सरकारने अलीकडेच जारी केला. या आदेशाचे देशभरात मोठ्या प्रमाणात स्वागत झाले असले; तरी काहींना हा निर्णय रुचला नसल्याचे दिसून येते. यामध्ये काही मुस्लीम संघटनांचा समावेश आहे. केरळमधील समस्त सुन्नी संघटनेचे मुखपत्र असलेल्या ‌‘सुप्रभातम‌’मध्ये जे संपादकीय प्रसिद्ध करण्यात आले आहे, त्यामध्ये केंद्र सरकारने ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ या राष्ट्रीय गीतासंदर्भात काढलेल्या आदेशाला विरोध केला आहे. केंद्राने आपला आदेश मागे घ्यावा, अशी मागणी या संपादकीयात करण्यात आली. ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ या राष्ट्रीय गीतामध्ये जो उल्लेख आहे, त्यामुळे घटनात्मक मूल्ये, धार्मिक संवेदना याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. केरळमधील सुन्नी मुस्लिमांच्या संघटनेचे नाव ‌’समस्त केरल जेम -इय्यातुल उलमा‌’ असे असून, ‌‘सुप्रभातम‌’ हे त्यांच्या मुखपत्राचे नाव आहे.
 
‌‘सुप्रभातम‌’ने दि. 13 फेब्रुवारी रोजी लिहिलेल्या संपादकीय मध्ये, ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’संदर्भात केंद्र सरकारने जो आदेश काढला आहे, तो मागे घ्यावा; अशी मागणी केली. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली, तरी या देशातील मुस्लीम समाजाची या राष्ट्रीय गीतासंदर्भातील आपली मानसिकता बदलली नसल्याचेच यावरून दिसून येते. ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’मध्ये मूर्तिपूजेचा उल्लेख असल्याचे नमूद करून, अन्य धर्माचे जे अनुयायी आहेत ते हे राष्ट्रीय गीत म्हणू शकणार नाहीत, असे त्यात म्हटले आहे. ‌‘घटना समिती‌’ने दि. 24 जानेवारी 1950 रोजी, ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’चा राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकार केला होता. या राष्ट्रीय गीतामध्ये दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती या देवतांचा उल्लेख आहे. आता केंद्र सरकारने या उल्लेखांसह हे गीत गाण्याची सक्ती केली असल्याने, अशी सक्ती करून देशाची विविधता, घटनात्मक मूल्ये यांना सरकारने आव्हान दिल्याची टीका करण्यात येत आहे. तसेच सरकारचा सदर आदेश फेटाळून लावण्यात आला पाहिजे, धार्मिक आणि देवतांचा उल्लेख असलेले हे गीत म्हणण्याची सक्ती लोकांवर करणे, हे अयोग्य आहे. हा निर्णय घटना आणि लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाही, असेही ‌‘सुप्रभातम‌’ने आपल्या संपादकीयात म्हटले आहे. देशातील सलोखा नाहीसा करण्यासाठी या गीताचा वापर करता कामा नये, असे तारेही संपादकीयामध्ये तोडण्यात आले आहेत. आपल्या देशातील ऐक्य विविधतेतून निर्माण झाले आहे. तसेच हा निर्णय घटनेच्या धर्मनिरपेक्ष विचारांशीही सुसंगत नाही. धर्म, वैयक्तिक श्रद्धा आणि संस्कृती यांचा उपयोग राजकीय हेतूंसाठी केला जाता कामा नये, असेही त्या संपादकीयात म्हटले आहे. ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ हे गीत राष्ट्रीय ऐक्यास धोका असल्याचेही त्यामध्ये म्हटले आहे.
 
‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ या गीतास नुकतीच 150 वर्षे पूर्ण झाली. हे गीत गात आणि ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’चा जयघोष करीत, अनेक स्वातंत्र्यवीर हसत-हसत मृत्यूला सामोरे गेले. देशवासीयांना प्रेरणा देणाऱ्या या गीतास त्यावेळीही काही मुस्लीम नेत्यांनी विरोध केला होता. आता देश स्वतंत्र होऊन इतकी वर्षे झाली, तरी या देशातील काही मुस्लीम नेत्यांच्या मनातील ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ संदर्भातील आकस काही केल्या जात नाही. त्यामुळे ‌‘इस देश में रहना होगा, तो ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ कहना होगा,‌’ असे सर्वांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. केरळमधील मुस्लीम समाजाची ‌‘री‌’ आणखी किती मुस्लीम नेते आणि संघटना ओढतात, ते नजीकच्या काळात दिसून येईलच.
 
एका आठवड्यात हिंदूविरोधी 53 घटना!
 
हिंदू समाजाविरुद्ध ठरवून गुन्हे करण्याच्या आणि हल्ले करण्याच्या 53 घटना, फेब्रुवारी महिन्याच्या केवळ पहिल्या आठवड्यात घडल्याचे दिसून आले आहे. या घटना भारत आणि शेजारी देशांसह, जगभरातील अन्य देशांमध्ये घडल्या आहेत. हिंसाचार, भेदभाव, छळ आदी घटनांचा यामध्ये समावेश आहे. बांगलादेशमध्ये मंदिरांची तोडफोड, हिंदू जनतेला ठरवून लक्ष्य करणे, लैंगिक अत्याचार, समाजमाध्यमांद्वारे अन्य लोकांना हिंदू समाजाविरुद्ध भडकाविणे आदी घटना घडल्या आहेत. तसेच भारतात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, प. बंगाल, छत्तीसगढ या राज्यांमध्येही, हिंदू समाजावर अत्याचार होण्याच्या घटना या महिन्यातील एका आठवड्यात घडल्या. बांगलादेशप्रमाणे पाकिस्तान, नेपाळ, नायजेरिया, रशिया या देशांमध्येही हिंदूविरोधी घटना घडल्या आहेत. अत्याचारांच्या या घटनांचे स्वरूप वेगळे असले तरी हिंदूंना लक्ष्य करणे, समाजमाध्यमांमध्ये अपप्रचार करणे, अफवा पसरविणे, प्रशासनाच्या कामाबद्दल शंका उपस्थित करणे, अशा घटनांचा त्यात समावेश आहे.
 
दि. 2 फेब्रुवारी ते 8 फेबृवारीदरम्यान या घटना घडल्या. दि. 2 फेब्रुवारीस बांगलादेशमधील राजबरी जिल्ह्यात हिंदू देव-देवतांची विटंबना करण्यात आली; तर बांगलादेशमधील ढाका येथील विद्यापीठातील प्रवेश परीक्षेत प्रथम आल्याबद्दल एका हिंदू विद्यार्थ्यास ठार मारण्यात आले. त्याच दिवशी भारतात मुस्लीम समुदायाकडून 40 हिंदू कुटुंबांना त्रास देण्याची आणि त्यांच्यावर हल्ले करण्याचीही घडली. उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात या घटना घडल्या. कर्नाटकमध्ये एक हिंदू तरुण मुस्लीम महिलेसमवेत दिसल्याबद्दल त्यास मारहाण करण्यात आली. कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यामध्ये ही घटना घडली असून, चिक्कबल्लापूर येथे एक हिंदू विद्याथ एका मुस्लीम विद्यार्थिनीसमवेत दिसल्याबद्दल, दोन मुस्लीम तरुणांनी त्यास मारहाण केली. कानपूर येथे एका मुस्लीम तरुणाने आपल्या पत्नीची हत्या केली. तीन महिन्यांपूव त्या दोघांचा विवाह झाला होता.
 
महाराष्ट्रात वसई (पूर्व) येथे साहिल कासीम आणि हुसेन या दोघांनी, एका अल्पवयीन मुलीवर घरात घुसून हल्ला केला. याची तक्रार करूनही कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नाही. कर्नाटकमधील यादगीर जिल्ह्यातील एका हिंदू कुटुंबाने महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरावर फडकविण्यात आलेल्या भगव्या ध्वजाचे चित्र समाजमाध्यमावर टाकल्याबद्दल, त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. बिहारमध्ये हिंदूविरोधी चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आली असून, त्यामध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्यात आले होते. 53 पैकी काही घटनांचाच उल्लेख येथे करण्यात आला आहे. हिंदू समाजावर विविध ठिकाणी कसे हल्ले होत आहेत, त्याची कल्पना यावरून यावी. या सर्व घटना एका आठवड्यातील आहेत. मग, महिनाभरात आणि वर्षभरात हिंदू समाजावर किती आणि कसे हल्ले होत असतील, याचा विचार करा. केवळ नुसता विचार नको, असे हल्ले होऊ नयेत म्हणून काहीतरी ठोस कृतीही करा.
 
‌‘जैश‌’कडून महिला सुसाईड बॉम्बर?
 
पाकिस्तानस्थित ‌‘जैश-ए-मोहम्मद‌’ आणि ‌‘लष्कर-ए-तय्यबा‌’ या दहशतवादी संघटनांकडून भारतावर हल्ले करण्यासाठी, नवीन डावपेचांचा वापर केला जात आहे. आता ‌‘सुसाईड बॉम्बर‌’ म्हणून या संघटनांकडून मुस्लीम दहशतवादी महिलांची भरती केली जाऊ लागल्याची माहिती, भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. दहशतवादी नेता मसूद अझर आणि हाफिज सईद यांच्याकडून, ‌‘सुसाईड बॉम्बर‌’ म्हणून महिलांचा वापर करण्याची योजना तयार केली जात आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात ‌‘जैश‌’ने ‌‘जमात-उल-मुमिनत‌’ या नावाने महिलांची शाखा उघडली आहे. सुशिक्षित महिलांना आपल्या जाळ्यात ओढणे आणि त्यांना दहशतवादी कृत्ये करण्यासाठी प्रवृत्त करणे, हे काम या महिला शाखेकडे देण्यात आले आहे. तसेच ‌‘लष्कर-ए-तय्यबा‌’ या संघटनेने, आपली महिला शाखा ‌‘तय्यीबत‌’चा विस्तार केला आहे. या महिला शाखेचा विस्तार पाकिस्तानमध्ये वेगाने होत आहे. भारतावर दहशतवादी हल्ले करण्यासाठी या महिलांना प्रशिक्षित करण्यात येत असल्याची माहिती आहे. यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांनीही सावध केले आहे. दहशतवादाची ही ‌‘महिला सेना‌’ सीमाभागात जमा केली जात असल्याने, भारताच्या सुरक्षा आस्थापनांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपल्या सर्व यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. दहशतवादी महिलांचे आत्मघातकी हल्ले होणारच नाहीत, याची दक्षता घ्यायला हवी.
 
 

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.