महापौरांचे स्वच्छतेचे धडे

    17-Feb-2026
Total Views |
Nashik
 
नाशिक महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता काळात तत्कालीन महापौर दशरथ पाटील यांनी प्रशासनाला काबूत ठेवत, शहराचा विकास कसा करायचा याचा वस्तुपाठ घालून दिला होता. अधिकारी आणि ठेकेदारांना वठणीवर आणत, त्यांनी शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले. त्यांच्या कामाची नाशिककरांनी चांगलीच वाहवा केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. 2017 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शहर दत्तक घेत, सर्वांगीण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. परंतु, मागील चार वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्याने, महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करत नाशिककरांना चांगलेच वेठीस धरण्याचे काम केले. मात्र, शहरातील भाजप आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे आणि आमदार राहुल ढिकले यांनी, शासनदरबारी पाठपुरावा करत नाशिकच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले.
 
आता नाशिक महापालिकेत मोठ्या बहुमताने भाजपची सत्ता आली असून, त्याला शिवसेनेची साथही लाभली आहे. शहराला लाभलेल्या प्रथम नागरिक अर्थात, महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच जोमाने कामाला सुरुवात केली आहे. 100 दिवसांचा कार्यक्रम निश्चित करून त्यादृष्टीने काम करणार असल्याची केवळ घोषणा न करता, महापौरांनी प्रत्यक्ष पावले उचलत कामाला सुरुवातही केली. गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्याच्या आणि पर्यायाने नाशिककरांचे आरोग्य सुदृढ राखण्याच्या उद्देशाने त्यांनी, शहरात उभारल्या जात असलेल्या चार मलनिःस्सारण प्रकल्पांना भेटी दिल्या आणि सुरू असलेल्या कामाचा आढावा देखील घेतला. त्यानंतर प्रशासकीय काळात शहरात निर्माण झालेले कचऱ्याचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी, तसेच कामातून नाशिककरांसमोर आदर्श घालून देण्याच्या उद्देशाने, त्यांनी स्वतः हाती झाडू घेत ‌‘डीप क्लीन ड्राईव्ह‌’ हा उपक्रमही राबवला. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे, असा संदेश त्यांनी नाशिककरांना कृतीतून दिला. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर देश-विदेशातील भाविकांसमोर आदर्श ठरावे, यासाठी महापौरांनी आपल्या कार्यातूनच धडे दिले.
 
पर्यटननगरीच्या गौरवासाठी
 
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची चाहूल लागली असून, शहराचे चित्र हळूहळू पालटताना दिसू लागले आहे. अनेक प्रकल्प प्रत्यक्ष सुरू झाले असून, काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. या सर्व कामांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बारकाईने लक्ष आहेच. तर, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन सिंहस्थाचे यशस्वी आयोजन व्हावे, यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत. सिंहस्थ ध्वजारोहणानंतर देश-विदेशातून साधू-महंत साधुग्राममध्ये दाखल होण्यास सुरुवात होईल. त्यानुसार, आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे कामही वेगाने सुरू आहे. नाशिकची ओळख जागतिक स्तरावर अधिक भक्कम व्हावी, पर्यटनाला चालना मिळावी आणि स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जुनी पर्यटनस्थळांच्या विकासाबरोबरच, नव्या स्थळांचीही उभारणी केली जात आहे. त्यासाठी शासनानेही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. येत्या वर्षभरात नाशिकचा चेहरामोहरा बदलून खऱ्या अर्थाने, सिंहस्थासाठी सज्ज असे आधुनिक आणि सक्षम शहर उभे राहण्याची चिन्हे दृष्टीक्षेपात आहेत.
 
नवनियुक्त महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनीही, नाशिकचा पर्यटननगरी म्हणून असलेला लौकिक अधिक उंचावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नाशिकमध्ये काय नाही यापेक्षा नाशिकमध्ये काय आहे, याचा विचार करून जमेच्या बाजूंना प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका ठळक आहे. पर्यटनाला केंद्रस्थानी ठेवत शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांचा मानस असून, सिंहस्थाचे यशस्वी आयोजन करताना, नाशिकचे रंगरूप बदलणे हेच आपल्या कार्यकाळाचे प्रमुख ध्येय असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः पर्यटन आणि वैद्यकीय पर्यटन या क्षेत्रांकडे लक्ष केंद्रित केल्यास, नाशिकच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळू शकते, याची जाणीव त्यांना आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांची साथ लाभलेली असताना, नाशिककरांनीही महापालिकेची धुरा विश्वासाने त्यांच्या हाती सोपवली. या सर्व अनुकूल पार्श्वभूमीवर महापौरांच्या संकल्पांना यश लाभून, नाशिक सिंहस्थात देश-विदेशातील भाविकांसमोर आदर्श ठरो, हीच अपेक्षा.
 
 
- विराम गांगुर्डे