CM Devendra Fadnavis : येत्या काळात मुंबई जागतिक भांडवलासाठीचे प्रवेशद्वार ठरणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन २०२६’ परिषदेचे उद्घाटन

    17-Feb-2026   
Total Views |
CM Devendra Fadnavis
 
मुंबई : (CM Devendra Fadnavis) “जागतिकीकरणाच्या नव्या टप्प्यात विश्वासार्ह जागतिकीकरण ही संकल्पना पुढे येत असून महाराष्ट्राचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित होते. महाराष्ट्र भारताच्या जीडीपीमध्ये १४ ते १५ टक्के योगदान देतो. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशाच्या औद्योगिक उत्पादनात २० टक्के वाटा आणि पश्चिमेकडील बंदरांमधून ६० टक्क्यांहून अधिक कंटेनर वाहतूक महाराष्ट्रातून होते. मुंबई येत्या काळात जागतिक भांडवलाचे प्रवेशद्वार ठरणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक स्थैर्य घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. बहुध्रुवीय जगात विश्वासार्ह भागीदारीच यशस्वी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.(CM Devendra Fadnavis)
 
विदेश मंत्रालय, फ्युचर इकॉनॉमिक कोऑपरेशन कौन्सिल आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, एफइसीआयसीचे कार्यकारी संचालक विजय चौथाईवाले, एफइसीआयसीच्या सल्लागार मंडळाचे सदस्य बाबा कल्याणी, आदिल झैनुलभाई, सायरिल श्रॉफ, प्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील नेते, राजनैतिक समुदायाचे सदस्य आणि जागतिक भागीदार मोठया संख्येने उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, "आर्थिक सार्वभौमत्व म्हणजे आत्मनिर्भरता नव्हे, तर विविधीकृत व्यापार, उत्पादन क्षमता, ऊर्जा सुरक्षा आणि तंत्रज्ञान क्षमता यांचे संतुलित संयोजन होय. धोरणात्मक स्वायत्तता आणि सहकार्यपूर्ण सहभाग. हाच दृष्टिकोन महाराष्ट्र स्वीकारतो. भविष्यातील जागतिक व्यवस्था कॉरिडॉर-आधारित असेल. भविष्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका पार पाडेल. आर्थिक लवचिकता प्रभावी ठरेल. पारदर्शकता, नियमन आणि व्यापकता यात मुंबई आघाडीवर राहील."(CM Devendra Fadnavis)
 
ते (CM Devendra Fadnavis) पुढे म्हणाले की, "भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे. रोडपासून सुएझ कालव्यापर्यंत, अटलांटिक व्यापारमार्गांपासून पॅसिफिक पुरवठा साखळीपर्यंत – संपर्क हेच शक्तीचे मूळ आहे. आज इंडो-पॅसिफिक सागरी चौकट आणि नव्याने रचल्या जाणाऱ्या पुरवठा साखळ्या उदयास येत आहेत."
 
जगासाठी भारत आशेचा किरण; पंतप्रधान मोदी यांचा शुभेच्छा संदेश
 
“परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने फ्युचर इकॉनॉमिक को-ऑपरेशन कौन्सिल (एफईसीसी) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटनात्मक ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन (जीईसी) परिषद जागतिक पातळीवर झपाट्याने घडणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर सखोल आंतरराष्ट्रीय आर्थिक संवादाला चालना देण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे. व्यापक आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी ही परिषद उच्चस्तरीय व्यासपीठ म्हणून कार्य करते. ही परिषद धोरणात्मक नवोन्मेष आणि आर्थिक संधी यांच्या संगमावर विविध क्षेत्रांतील मंत्री, वरिष्ठ धोरणनिर्माते, अग्रगण्य अर्थतज्ज्ञ, जागतिक उद्योगनेते, गुंतवणूकदार आणि धोरणात्मक प्रतिनिधींना एकत्र आणते. अनिश्चिततेच्या काळात स्थिर नेतृत्वाच्या शोधात असलेल्या जगासाठी भारत आशेचा किरण ठरला आहे," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले.
 
‘डी-रिस्किंग’च्या जागतिक प्रक्रियेत भारत महत्त्वाचा भागीदार - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर
 
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, "जग सध्या अत्यंत अस्थिर आणि अनिश्चित टप्प्यातून जात आहे. धोरणात्मक, राजकीय, आर्थिक आणि तांत्रिक क्षेत्रांमध्ये एकाच वेळी मोठे बदल घडत असून जुन्या गृहितकांना आव्हान दिले जात आहे. अशा परिस्थितीत ‘डी-रिस्किंग’ आणि विविधीकरण हा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. कोविड-१९ आणि युक्रेन तसेच पश्चिम आशियातील संघर्षांमुळे पुरवठा साखळीतील कमकुवतपणा अधोरेखित झाला आहे. भारताने अलीकडेच युरोपियन युनियन आणि अमेरिकेसोबत व्यापार करार केले असून यापूर्वी युनायटेड किंगडम, ईएफटीए, न्यूझीलंड, ओमान, यूएई, ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशस देशांशी करार करण्यात आले. या करारांमुळे भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक प्रवेश मिळत असून ‘डी-रिस्किंग’च्या जागतिक प्रक्रियेत भारत महत्त्वाचा भागीदार ठरत आहे."
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....