मुंबई : (Mumbai Climate Week) हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कृती आवश्यक असून मुंबई क्लायमेट वीक हा त्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असून हवामान बदलावरील कृती कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.(Mumbai Climate Week)
जिओ वर्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई क्लायमेट वीकचे उद्घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, मुंबईच्या महापौर रितू तावडे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रम विभागाचे संचालक मार्टिन क्रुसे आदी मान्यवर उपस्थित होते.(Mumbai Climate Week)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हवामान कृती ही केवळ पर्यावरणीय जबाबदारी नसून भविष्यातील आर्थिक स्पर्धात्मकतेची किल्ली आहे. मुंबईसारख्या किनारी महानगराला हवामान बदलाचा फटका बसत आहे. अतिवृष्टीमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणे, घरे पाण्याखाली जाणे, व्यवसाय ठप्प होणे आणि उपजीविकेवर परिणाम होणे ही परिस्थिती वारंवार दिसत आहे. त्यामुळे हवामान बदल हा आज प्रशासनासमोरील गंभीर प्रश्न बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक विकास आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा समतोल साधण्याचा मार्ग स्वीकारला. देशाने अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली असून स्वच्छ ऊर्जेच्या विस्तारामुळे भारत जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. महाराष्ट्रही या परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. महाराष्ट्र हवामान कृतीकडे केवळ नियमांचे पालन म्हणून पाहत नाही, तर ती गुंतवणूक, नवकल्पना आणि रोजगारनिर्मितीची मोठी संधी मानतो. हवामान कृती ग्रामीण भागातही तितकीच महत्त्वाची आहे."(Mumbai Climate Week)
"मुंबई जागतिक हवामान वित्तासाठी प्रभावी केंद्र बनू शकते. हवामान न्याय ही संकल्पनाही तितकीच महत्त्वाची असून विकसनशील देशांना विकास आणि पर्यावरण यापैकी एकाची निवड करण्यास भाग पाडता कामा नये. योग्य भागीदारीतून दोन्ही उद्दिष्टे साध्य होऊ शकतात. हवामान कृती ही घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिसली पाहिजे. मुंबई क्लायमेट वीक हा चर्चेचा मंच न राहता कृतीचा मंच ठरावा, गुंतवणूकयोग्य प्रकल्प आणि अंमलात येणाऱ्या भागीदाऱ्या निर्माण व्हाव्यात. हवामान कृती ही आपल्या पिढीची मोठी आर्थिक संधी ठरू शकते," असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.(Mumbai Climate Week)
पीएम कुसुम योजनेद्वारे महाराष्ट्राला आणखी १ लाख पंप देणार - केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
मुंबई क्लायमेट वीक (Mumbai Climate Week) हा हवामान विषयक चर्चा कृतीत रूपांतरित होत असल्याचे प्रतीक आहे. महाराष्ट्राने लोकसहभागातून अक्षय ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली असून लाखो घरांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प बसवले गेले आहेत. हवामान कृती लोकचळवळ बनल्यास परिवर्तन अधिक वेगाने घडते. भारत विकास आणि उत्सर्जन यांचे विभक्तीकरण साध्य करत जागतिक स्तरावर आदर्श निर्माण करत असून मुंबईने जागतिक दक्षिणेचा आवाज बनावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा व पीएम कुसुम योजनेमध्ये महाराष्ट्राने अतिशय प्रभावी कामगिरी केली आहे. यामुळे पीएम कुसुम योजनेतील महाराष्ट्राच्या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्रसाठी आणखी एक लाख पंप मंजूर करण्याची घोषणा केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केली.(Mumbai Climate Week)
हवामान कृती ही सर्वांची सामूहिक जबाबदारी - मंत्री पंकजा मुंडे
"हवामान कृतीसाठी शासन, शहर संस्था आणि नागरिक यांची भागीदारी आवश्यक असून युवकांचा सहभाग विशेष महत्त्वाचा आहे. समुदाय जनजागृती, हवामान साक्षरता आणि युवक उपक्रमांद्वारे शाश्वत महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. विविध देशांतील प्रतिनिधी या मंचावर एकत्र येत असून, जागतिक सहकार्य आणि व्यवहार्य भागीदारीतूनच हवामान कृती यशस्वी होईल. भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण निर्माण करणे हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे. 'संपूर्ण जग एक कुटुंब आहे' ही आपल्या संस्कृतीची भावना असून हवामान कृती ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करते. सर्वांनी या मंचातील चर्चांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून व्यवहार्य उपाय सुचवावेत," असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.(Mumbai Climate Week)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....