वेगवान जीवनशैली, बदलती आहारसंस्कृती आणि झटपट तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या वाढत्या प्रभावामुळे आपल्या पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांची चव हळूहळू हरवत चालली आहे. साधेपणातली चव, घरगुती पौष्टिकता आणि आपल्या संस्कृतीची ओळख जपणारे हे खाद्यपदार्थ काळाच्या ओघात हळुहळु मागे पडताना दिसत आहे. तर जाणून घेऊया अशाच काही पारंपरिक पदार्थांबद्दल...
पुरणाचे दिंड
पुरणाचे दिंड हा पदार्थ प्रामुख्याने नागपंचमी सणाला महाराष्ट्रात बनवला जातो. हा एक गोड पदार्थ आहे जो चवीला चविष्ट आणि नाजूक असतात. पुरणाचे दिंड हे बाहेरून गव्हाच्या पीठ आणि आत पुरणाची म्हणजेच हरभरा डाळ आणि गुळाचे सारण घालून, वाफवून बनवले जातात. काही ठिकाणी याला पुरणाचे कानोली किंवा कानवली असेही म्हणतात. पूर्वी सणावाराला हमखास बनणारा हा पूर्वी सणावाराला हमखास बनणारा हा पदार्थ आज क्वचितच पाहायला मिळतो.
ज्वारीचे धिरडे
ज्वारीचे धिरडे हा एक पौष्टिक, खमंग पदार्थ आहे. काळाच्या ओघाने हरवत चालेल हा पदार्थ कमी तेलात आणि झटपट तयार होणारा नाश्ता आहे. ज्वारीचे पीठ, चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार मसाला आणि रवा घालून त्याचे पातळसर पीठ भिजवून ते पीठ तव्यावर पसरवून कुरकुरीत असे धिरडे तयार केले जातात. हल्ली काळाच्या ओघात हरवत चालेला हा पदार्थ फार कमी घरी बनवला जातो.
गव्हाची खीर
तुटलेल्या गव्हापासून बनवलेली ही खीर पचायला हलकी, पौष्टिक आणि घरगुती गोड पदार्थ होता. रेडीमेड डेझर्ट्समुळे तिचं अस्तित्व कमी होतंय.
आंबिल
आंबील हा महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भ आणि खान्देशातील ज्वारी किंवा नाचणीच्या पिठापासून बनवला जाणारा एक पारंपारिक, पौष्टिक आणि आरोग्यदायी पदार्थ आहे. आंबीलमध्ये कॅल्शियम, आयर्न, फायबर आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. आंबिल ही कडक उन्हात शरीराला थंडावा देण्यासाठी आणि ऊर्जा टिकवून ठेवते. आज फार कमी घरांमध्ये आंबिल बनवलं जाते.
तांदळाची उकड
तांदळाची उकड हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक, हलका आणि चविष्ट नाश्ता आहे, जो तांदळाची पिठी (तांदूळ पीठ) आणि आंबट ताक वापरून बनवला जातो. हा मऊ लुसलुशीत नाश्ता पचायला हलका असून हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात गरम खाणे उत्तम ठरते. उकडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे तिचे साधेपण. कमी साहित्य, कमी खर्च आणि कमी वेळात तयार होणारा हा पदार्थ ग्रामीण जीवनशैलीशी घट्ट जोडलेला आहे. मात्र आधुनिक झटपट खाद्यपदार्थांच्या गर्दीत ही पारंपरिक चव हळूहळू मागे पडत आहे.