140 कोटी भारतीयांच्या बळावर भारत ‘एआय’ क्षेत्रात आघाडी घेण्याच्या तयारीत आहे. त्याच वेळी तंत्रज्ञानाच्या या नव्या शक्तीने व्यापक जनहितच साधले जावे, असा भारताचा ठाम आग्रह आहे. ‘आधी केले, मग सांगितले’ या न्यायाने ‘एआय’च्या अचाट सामर्थ्याचा उपयोग जनहितासाठी करून जगाला सर्वसमावेशक विकासाचा नवा संदेशही भारताने ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट - 2026’च्या निमित्ताने दिला आहे.
जग आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. औद्योगिक क्रांती, माहिती-तंत्रज्ञान क्रांतीनंतर आता ‘एआय क्रांती’ ही मानवजातीसमोरील सर्वात मोठी परिवर्तनशक्ती म्हणून उभी आहे. या पार्श्वभूमीवर भारताने केवळ सहभागी म्हणून नव्हे, तर दिशादर्शक म्हणून पुढे येण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट - 2026’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक बुद्धिमत्तेवर आधारलेले, भारताचे ‘एआय’ भविष्य जगासमोर मांडले. ही परिषद निव्वळ तंत्रज्ञानविषयक चर्चेपुरती मर्यादित नसून, जगभरातील धोरणकर्ते, तंत्रज्ञ, संशोधक, उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी आणि स्टार्टअप-जगतातील नवोन्मेषक अशा अनेक स्तरांतील प्रतिनिधी भारतात एकत्र आले. ही उपस्थिती भारतावरील वाढत्या विश्वासाची पावती आहे.
या परिषदेची संकल्पनाच ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ अशी मांडण्यात आली. ‘एआय’ ही काही मोजक्या धनदांडग्यांच्या हातातील शक्ती न राहता, ती समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचावी, हाच भारताचा सुरुवातीपासूनचा दृष्टिकोन आहे. पाश्चिमात्य जगात ‘एआय’ प्रामुख्याने नफा, बाजारपेठ आणि तंत्रस्पर्धा या चौकटीत चर्चिला जातो; भारताने त्यात सामाजिक न्याय, समावेशकता आणि भाषिक वैविध्य यांचाही धागा जोडला, हेच भारताचे वेगळेपण आहे. मागील ‘एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये पंतप्रधानांनी एक सूक्ष्म निरीक्षण नोंदवले होते आणि ते म्हणजे, ‘एआय’ने निर्माण केलेल्या चित्रांमध्ये बहुतेक वेळा डाव्या हाताने रेखाटन दाखवले जाते. या उदाहरणातून त्यांनी सांगितले की, तंत्रज्ञान हे ज्या डेटावर प्रशिक्षित होते, त्याच्याच छायेत विचार करते. डेटामध्ये विविधता नसेल, तर ‘एआय’ची दृष्टीही एकांगी राहते. या विधानाने भारताचा ‘एआय’कडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन जगासमोर आला.
भारताची ‘एआय’ क्षेत्रातील कामगिरी गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. सुमारे एक हजार, 500 स्टार्टअप्स भारतात ‘एआय’ क्षेत्रात सध्या कार्यरत आहेत. या स्टार्टअप्सचे एकत्रित मूल्य अब्जावधी डॉलर्समध्ये पोहोचले आहे. आरोग्य, कृषी, शिक्षण, वित्त, संरक्षण, शहरी व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत हे भारतीय स्टार्टअप्स नवोन्मेष घडवत आहेत. सरकारी पातळीवर भारताने स्पष्ट धोरणात्मक चौकट उभारली असून, ‘इंडिया एआय मिशन’ हे त्याचे केंद्रबिंदू. दहा हजार, 372 कोटी रुपयांच्या तरतुदीसह भारत ‘एआय’ निर्मितीसाठी 38 हजारांहून अधिक ‘जीपीयूं’च्या संगणकीय क्षमतेचा वापर करीत आहे. ही स्वदेशी ‘एआय’ पायाभूत सुविधांची उभारणी आहे. जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांवर पूर्ण अवलंबित्व न ठेवता, स्वतःचे प्रारूप, स्वतःचे डेटा सेंटर आणि स्वतःची संशोधनक्षमता उभारण्याचा हा भारताचा प्रयत्न आहे.
भाषिक वैविध्याच्या दृष्टीने ‘भाषिणी’ हा उपक्रम विशेष उल्लेखनीय असाच. भारतासारख्या बहुभाषिक देशात ‘एआय’चा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर तंत्रज्ञानाची भाषाही सर्वसमावेशक हवीच. विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद, संवाद आणि माहितीप्रवेश सुलभ करणारे ‘भाषिणी’, हेच ‘सर्वजन हिताय’ या संकल्पनेचे मूर्त रूप ठरावे. ‘भारत जेन’ आणि ‘एलएलएम’ यांच्या माध्यमातून, मोठी भाषा प्रारूपांच्या विकासाचा प्रयत्न सुरु आहे. ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण - 2020’ अंतर्गतही ‘एआय’ शिक्षणाचा समावेश करून, शालेय पातळीवरच तंत्रज्ञानाची बीजे पेरली जात आहेत.
‘एआय’चा वापर भारतात कृषी क्षेत्रात हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन आणि रोगनियंत्रण अशा कामांसाठी होत आहे. आरोग्य क्षेत्रात निदान प्रक्रिया, टेलिमेडिसिन तयार करण्यासाठी साहाय्य, वित्तीय क्षेत्रात फसवणूक पकडणे, डिजिटल व्यवहारांचे विलेषण, शहरी व्यवस्थापनात वाहतूक नियंत्रण, स्मार्ट सिटी उपक्रम अशांमध्ये होणाऱ्या ‘एआय’च्या वापराचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. ‘डिजिटल इंडिया’, ‘आधार’, ‘यूपीआय’, ‘जनधन’ यांसारख्या उपक्रमांनी डेटा आणि डिजिटल पायाभूत सुविधा तयार केल्या. त्याच पायावर ‘एआय’ची उभारणी होत आहे. नागरिकांना शासनसेवा अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने देण्यासाठीही शासकीय पातळीवर ‘एआय’चा वापर वाढतो आहे.
‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना ‘एआय’चा सकारात्मक वापर कसा करावा, याचे उदाहरण दिले. ‘एआय’ ही शॉर्टकट नाही; ती शिकण्याचे साधन आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कौशल्यवृद्धीसाठी ‘एआय’चा उपयोग करा; पण विचारशक्ती गमावू नका, हा संदेश नव्या पिढीला देण्यात आला. यातूनच भारत या नव्या तंत्रज्ञानाचा विस्तार पुढील पिढीकडे विवेकाच्या आधारेच देत असल्याचे अधोरेखित होते. या क्षेत्रातले भारताचे स्वतःचे संशोधनही सातत्याने वाढते आहे. ‘जागतिक जर्नल्स’मध्ये भारतीय संशोधकांची उपस्थिती वाढली आहे.
या सर्व प्रक्रियेत भारताची सॉफ्ट पॉवरही ठळकपणे समोर आली. योग, आयुर्वेद, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि लोकशाही मूल्ये यांचा संगम भारताला वेगळेपण देतो. ‘एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये जगभरातील प्रतिनिधींनी भारताच्या या सर्वसमावेशक दृष्टिकोनाची दखल घेतली. केवळ तंत्रज्ञानच नव्हे, तर तंत्रज्ञानाचा नैतिक वापर या विषयावरही भारत नेतृत्व करू शकतो, असा संदेशच यातून भारताने जगाला दिला आहे.
भारतासाठी या परिषदेचा लाभ बहुआयामी आहे. गुंतवणूक वाढ, संशोधन सहकार्य, स्टार्टअप्सना जागतिक बाजारपेठ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक धोरणनिर्मितीतील सहभाग. ‘एआय’चे भवितव्य केवळ काही मोजक्या देशांनी ठरवू नये; विकसनशील जगाचाही आवाज असावा, हीच भारताची आग्रही भूमिका आहे. 140 कोटी भारतीय ही लोकसंख्या एक विशाल डेटा, कौशल्य आणि नवोन्मेषाची शक्ती आहे. या शक्तीला योग्य दिशा मिळाली, तर भारत ‘एआय’ क्षेत्रात विश्वगुरु ठरू शकतो. पंतप्रधानांनी व्यक्त केलेला आत्मविश्वास हा धोरण, पायाभूत सुविधा आणि मानवी संसाधन यांच्या एकत्रित प्रयत्नांवर आधारलेला आहे. ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट - 2026’ने जगाला स्पष्ट संदेश दिला आहे आणि तो म्हणजे, भारत तंत्रज्ञानाचा वापर जगाच्या कल्याणासाठी ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ याच शुद्ध भावनेने करणार असून, या प्रवासात 140 कोटी भारतीय हीच त्याची सर्वात मोठी शक्ती असणार आहेत.