मुंबई : ‘शतक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट येत्या २० फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा प्रदर्शित झाला आहे. याचनिमित्ताने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ‘शतक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाबद्दल म्हणाले, हा चित्रपट म्हणजे भारताच्या राष्ट्रनिर्मितीच्या कमी परिचित अध्यायाची सिनेमॅटिक झलक आहे. संघाच्या कार्याबाबत चर्चा होत असली तरी प्रतिमा आणि वास्तव यामध्ये अनेकदा अंतर राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकांना संघ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा चित्रपट पाहाण्याचे आवाहन करत गडकरी म्हणाले, ‘’एक स्वयंसेवक म्हणून मला अनेकदा असे वाटते की, प्रतिमा आणि वास्तव किंवा समज आणि प्रत्यक्ष सत्य यामध्ये अंतर राहिले आहे. दुर्दैवाने हे संघाबाबत घडले आहे. मी आपण सर्वांना आवाहन करतो की, जवळ या, संघाची विचारधारा जाणून घ्या आणि त्याग, समर्पण व देशभक्तीची भावना समजून घ्या.’’
ते पुढे म्हणाले, ‘’मी रस्ते, पूल, एक्सप्रेसवे आणि बोगदे यांवर काम केले. मी अभियंता नव्हतो, ना मला आधीचा अनुभव होता. लोक विचारतात हे कसे शक्य झाले? मी सांगतो, मी संघाचा स्वयंसेवक आणि विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे. या संस्थांकडून मिळालेल्या मूल्यांनीच मला मार्गदर्शन केले आणि त्यामुळेच मी हे कार्य करू शकलो.’’
शतकपूर्ती वर्ष साजरे करण्याबाबत ते म्हणाले, ‘’आपण सर्वांनी एकत्र येऊन हे शताब्दी वर्ष साजरे करावे, संघाला समजून घ्यावे आणि त्याची विचारधारा आपल्या जीवनात स्वीकारावी. हा चित्रपट जरूर पाहावा आणि संघ समजून घेण्याचा प्रयत्न करावा, अशी माझी नम्र विनंती आहे.”
संघाबद्दल बोलताना गडकरी म्हणाले, ‘’ या १०० वर्षांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लाखो तरुणांना देशभक्ती आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा दिली आहे. मला अभिमान आहे की, मीसुद्धा त्या स्वयंसेवकांपैकी एक लहानसा कार्यकर्ता आहे ज्याला ही प्रेरणा मिळाली.”
ते पुढे म्हणाले, ‘’त्यांच्या समर्पणामुळे आज आपण ही ऐतिहासिक १०० वर्षे साजरी करत आहोत. मात्र कार्य अजून अपूर्ण आहे. भारताला जगातील अग्रगण्य राष्ट्र बनवणे, हे आमचे ध्येय आहे. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रात देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी आम्ही कार्य करणार आहोत.’’
दलित, वंचित आणि गरजू घटकांबद्दल बोलताना नितीन गडकरी म्हणाले, ‘’ गरीबी, भूक आणि बेरोजगारीशी झुंजणाऱ्या समाजघटकांचे जीवन बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण भारतीय आहोत आणि हिंदुत्व ही आपली भारतीय ओळख आहे. भारतीय ओळख म्हणजे हिंदुत्व. ही आपल्या पूर्वजांकडून मिळालेली सनातन सांस्कृतिक परंपरा आहे. हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही आणि ते कोणत्याही एका धर्माशी जोडलेले नाही. ते एक जीवनपद्धती आहे. सर्व धर्मांचे लोक भारतीय असू शकतात, कारण भारतीय ओळख आपल्या इतिहास, संस्कृती आणि परंपरेत रुजलेली आहे. हीच प्रेरणा संघाने आम्हाला दिली आहे.’’
‘शतक: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट संघाच्या विचारप्रवाहाचा प्रवास, सामाजिक उपक्रम आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या राष्ट्रसेवेचा मागोवा घेणारा आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरला असून चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.