जर्मनीत बसून मोदी सरकारविरोधी सातत्याने गरळ ओकणारा ‘कंटेंट क्रीएटर’ म्हणजे ध्रुव राठी. या ध्रुव राठीशी नुकताच काव्या कर्नाटक या अशाच एका कंटेंट क्रीएटरने पॉडकास्टमधून संवाद साधला. पण, हाच पॉडकास्ट ध्रुव राठीचा ढोंगीपणा सिद्ध करून पोलखोल करणारा ठरला आहे, त्याविषयी...
मोदीपेक्षा पंतप्रधानपदी एक गाढव परवडला. कारण, तो त्या खुचवर बसून काहीच करणार नाही. काही न करणे हे देशाला उद्ध्वस्त करण्यापेक्षा केव्हाही चांगलेच!” इति ध्रुव राठी! तोच ध्रुव राठी जो ‘जर्मन शेफर्ड’ म्हणून हिणवला जातो, तो त्याच्या अशाच मोदीविरोधी सातत्यपूर्ण भुंकण्यामुळेच! याआधी अशाच असंबद्ध शेकडो व्हिडिओंमधून ध्रुव राठीने त्याचा पराकोटीचा मोदीद्वेष सिद्ध केला आहे. भारतात जे-जे काही सुरू आहे, ते-ते सगळेच कसे अयोग्य, अमंगळ, हुकूमशाहीकडे झुकलेले आहे; याचे हजारो व्हिडिओ अपलोड करून त्यातूनच रोटी थापणारा हा राठी! परंतु, असे असले तरी त्याच्या व्हिडिओंना गांभीर्याने घेणारा, त्याने मांडलेल्या मुद्द्यांचा आधार घेऊन आपल्याच सरकारविरोधी अपप्रचार करणाऱ्यांची देशात अजिबात कमतरता नाही.
तो त्यांच्यासाठी मसिहाच! त्या सगळ्यांनी खरेतर ध्रुव राठीचा पॉडकास्ट मुद्दाम ऐकावा आणि त्याच्या वागण्या-बोलण्यातील पराकोटीचा फोलपणा ओळखता येतोय, ते पाहावे. त्याचा हा खोटारडेपणा त्याच्या व्हिडिओंमध्ये बरेचदा कथित तथ्य, दिशाभूल करणारे संदर्भ, सोयीस्कर वर्तमानपत्रांची कात्रणे यापुढे झाकोळलाही जातो. पण, या पॉडकास्टमधून ध्रुव राठीचा खरा चेहरा, त्याची विचार करण्याची, अजेंडा पसरविण्याची पद्धत यांसारख्या बऱ्याच बाबी अगदी सूर्यप्रकाशाइतक्या स्पष्ट होतात. त्यामुळे खरेतर काव्या कर्नाटकचे आभारच मानायला हवे की, दुबईमध्ये जाऊन हा 1 तास, 19 मिनिटांचा पॉडकास्ट तिने ‘व्ह्युज’साठी का होईना, चित्रित केला आणि ध्रुव राठीला जगासमोर बोलते केले.
ध्रुव राठी कोण आहे? तो कोणत्या प्रकारचे व्हिडिओ ‘युट्यूब’वर अपलोड करतो? हे खरेतर वेगळे सांगण्याची मुळी गरज नाही. कारण, आज तरुणांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांच्या व्हॉट्सॲपवर सर्वप्रकारचे व्हिडिओ आदळत असतात. काही मोदी सरकारच्या समर्थनाचे, तर काही टोकाच्या मोदीद्वेषाचे. त्या मोदीविरोधाचाच ‘युट्यूब’वरील आघाडीचा एक चेहरा म्हणजे ध्रुव राठी! तर अशा या ध्रुव राठीला भाजप, मोदी खुपतातच; पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघही त्याच्या निशाण्यावर असतो. म्हणूनच, त्याच्या पॉडकास्टच्या प्रारंभीच संघाची विचारसरणी ही जर्मनी, इटलीकडून प्रेरणा घेऊन अस्तित्वात आल्याचा फुटकळ आरोप करीत, संघामध्ये ‘भारतीय’ असे काहीही नाही, असा धादांत खोटा दावा करेपर्यंत त्याची मजल गेली. यावरूनच खरेतर ध्रुवच्या बुद्ध्यांकाची कीव करावी, तितकी कमीच.
डाव्यांच्या प्रभावाखाली संघाला ‘फॅसिस्ट’ संबोधण्याची ध्रुव राठी आणि त्यांच्यासारख्या कथित पुरोगाम्यांची ही जुनीच फॅशन. त्यामुळे संघ न वाचता, न बघता, न समजून घेता एकांगी विचारांतून केलेली टीकाच ध्रुव राठीच्या सगळ्याच ‘कंटेंट’चा पाया. आता जर्मनीमध्ये राहून खराखुरा संघ कळणार तरी कसा म्हणा? पण, संघच नाही तर भारताविषयी सगळेच व्हिडिओ हे महाशय जर्मनीवरूनच चित्रित करतात. त्यांना म्हणे, त्यांची भारतातील टीम ‘इन्पुट्स’ देते. आता जर्मनीत बसून भारतातील प्रत्येक परिस्थितीचे एखाद्याला किती परिपूर्ण आकलन होऊ शकते, ते वेगळे सांगायला नकोच. म्हणूनच, हे महाशय भारत आणि जर्मनीच्या वायुप्रदूषणाची तुलना करण्याचा खुळचटपणा करतात. पण, सध्या ज्या जर्मनीत ध्रुवचे वास्तव्य आहे, त्या देशातील नेत्यांविषयी, कारभाराविषयी एक तरी टीकात्मक व्हिडिओ करायची हिंमत कधी तरी ध्रुव राठी दाखवू शकेल का, हाच खरा प्रश्न.
एवढेच नाही, तर आपण नास्तिक असल्याचे मिरवणारा हाच ध्रुव राठी ‘रामायण’, ‘महाभारता’वर ज्ञान पाजळणारे व्हिडिओ बनवून हिंदूंचा ऑनलाईन बुद्धिभेद करताना दिसतो. का, तर म्हणे; ‘धर्मावर विश्वास नसला, तरी त्यातून लोकांनी शिकावे म्हणून.’ पण, मुळात ज्याचा धर्मावर, धार्मिक मूल्यांवर, परंपरांवर तीळमात्रही विश्वास नसेल, त्याने ‘रामायण’, ‘महाभारता’तील ज्ञानावर प्रवचने झोडणे, हा कुणीकडचा शहाणपणा? वर ‘रिलिजन हटा दिया तो दुनिया से ‘फ्लेवर’ कम हो जाएगा’ असे एकीकडे म्हणायचे आणि दुसरीकडे हिंदूंच्या सणांना पर्यावरणाच्या नावाखाली टोकाचा विरोधही करायचा, असा हा सगळा ढोंगीपणा. हे कमी की काय, म्हणून ज्योतिषशास्त्र आणि धर्माचा दुरान्वयाने संबंध नसून, ज्योतिषशास्त्र कुभांड असल्याचे स्वत:ला सर्वज्ञ समजणाऱ्या ध्रुव राठीने पाजळलेले असेच एक तत्त्वज्ञान. मग नवग्रहांची संकल्पना आपल्या पूर्वजांना कशी ठावूक होती, याचे संशोधनही ध्रुव राठीने करावे किंवा ज्यांनी केले आहे, त्यामागचे तथ्यही एकदा समजून घ्यावे. पण, मुळात ‘तथ्य’ आणि ‘ध्रुव राठी’ हे परस्पर विरोधी ध्रुवच!
आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये 90 टक्के विषय हे तथ्याधारित, दहा टक्के वैयक्तिक मत असल्याचा दावा ध्रुव राठी करतो. परंतु, परिस्थिती नेमकी उलट. त्यातही कोणत्या वृत्तसंस्थांचे सबस्क्रिप्शन तू घेतले आहेस, असा प्रश्न काव्याने विचारताच उत्तर येते ते - ‘न्यूज लाँड्री’, ‘वायर’, ‘स्क्रोल.’ म्हणजे एकूण एक अशीच माध्यमे, जी डाव्या आणि मोदी सरकारविरोधी विचारांच्या प्रचार-प्रसारातच अग्रेसर आहेत. म्हणूनच, तर ध्रुव राठीची आजवर एकाही व्हिडिओतून राहुल गांधी अथवा विरोधकांना जाब विचारण्याची हिंमत झालेली नाही. पण, तरीही आपली भूमिका ‘न्यूट्रल’ आहे, असा ‘कंटेंट क्रीएटर’चा बुरखा पांघरणारी ही जमात. ‘काँग्रेस प्रोॲक्टिव्ह नाही, रिॲक्शनरी आहे,’ एवढेच काय ते या पक्षाविषयीचे त्याचे त्रोटक मत. परंतु, मोदींविषयी विखारी बोलताना या ध्रुवला शब्दही कमी पडावे. त्या-त्या क्षेत्रातील अनुभवी मंडळींना मंत्रिपदी बसवावे, असा स्वत: कुणीतरी मुरब्बी ‘टेक्नोक्रॅट’ असल्याचा अविर्भाव आणत ध्रुव राठी सल्लाही देतो. पण, मग एस. जयशंकर, अश्विनी वैष्णव यांसारखे त्या-त्या क्षेत्रातील अनुभवी, कार्यकुशल मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत, याचा मात्र त्याला सपशेल विसर पडलेला दिसतो.
‘मी पत्रकार नाही, मी एज्युकेटर आहे, माध्यम संस्था मी चालवू शकत नाही,’ हे सांगतानाच, आपल्या व्हिडिओतील संपूर्ण माहिती ही दुय्यम स्रोतांवर अवलंबून असल्याची कबुलीही ध्रुवने दिली. याचाच अर्थ, त्याच्या व्हिडिओमधील सगळी माहिती 100 टक्के सत्य आहे, असे कदापि म्हणता येणार नाही. भारतीय चित्रपटसृष्टीलाही ध्रुवने नाहक लक्ष्य केले. सध्याचे चित्रपट हे सरकारच्या दबावाखाली, ‘सेन्सॉर’च्या आदेशांनुसार तयार होत असल्याचा ध्रुवचा दावा. मग काँग्रेस काळात नेमकी काय परिस्थिती होती, याचाही थोडा अभ्यास ध्रुव राठीने केला असता, तर कदाचित असे प्रश्न पडलेच नसते. परंतु, मुळातच ज्यांना भारतात बुद्धिभ्रमाची विषपेरणीच करायची आहे, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ती काय? म्हणूनच, ध्रुव राठीचा बोलघेवडेपणा, भूमिकांमधील दुटप्पीपणा आणि ‘कंटेंट क्रीएशन’मागचा निव्वळ व्यावसायिक दृष्टिकोन समजून घ्यायचा असेल, तर हा पॉडकास्ट खरं तर जरुर बघावा आणि समाजमाध्यमांतून बेमालुमपणे सुरु असलेल्या या बुद्धिभेदाचा वेळीच पर्दाफाश करावा!