हिमरांगातील क्रीडापर्व

16 Feb 2026 11:45:38

गुलमर्गच्या हिमाच्छादित डोंगररागांमध्ये दि. 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारीदरम्यान रंगणाऱ्या ‌‘खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा‌’, क्रीडाआधारित अर्थव्यवस्थेच्या व्यापक चित्राचा भाग आहेत. या स्पर्धा गुलमर्गमध्ये होत असल्याने, स्थानिक पर्यटनाला चालना मिळण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. केंद्र सरकारने क्रीडाक्षेत्राचा विकास केंद्रस्थानी ठेवण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे ठोस परिणाम आता दिसू लागले आहेत. ‌‘कलम 370‌’ रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग आला. रस्ते, बोगदे, रेल्वे संपर्क, पर्यटन सुविधा आणि गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी केंद्राने सातत्यपूर्ण प्रयत्न केले. त्याच धतवर क्रीडाक्षेत्रालाही प्राधान्य देण्यात आले. देशपातळीवरही केंद्र सरकारच्या प्रयत्नांतून होत असलेला, क्रीडाक्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विस्तार हा अभूतपूर्व असाच. विविध राज्यांत आधुनिक स्टेडियम, बहुउद्देशीय क्रीडासंकुले, प्रशिक्षण अकादमी आणि ‌‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम‌’सारख्या योजनांमुळे, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळू लागले आहे. परिणामी, भारतीय खेळाडू जागतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करताना दिसत आहेत. ही यशस्वी कामगिरी अचूक नियोजन आणि पायाभूत गुंतवणुकीचाच परिणाम आहे.

‌‘खेलो इंडिया‌’मुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील क्रीडाप्रतिभेला राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध झाले. यातूनच पूव झाकोळलेली गुणवत्ता आता प्रकाशझोतातही आली. क्रीडा-अर्थव्यवस्थेचा परिणाम स्थानिक उद्योगांवरही होतो. स्टेडियम उभारणी, क्रीडासाहित्य निर्मिती, प्रशिक्षण सुविधा, पर्यटन, प्रसारण आणि विपणन या सर्वच क्षेत्रांत रोजगारनिर्मिती होते. काश्मीरसारख्या प्रदेशात तर क्रीडा आणि पर्यटनाचा संगम आर्थिक स्थैर्याला नवे परिमाण देतो. देशविदेशांतून येणारे पर्यटक, अशा स्पर्धांमुळे वाढणारी प्रसिद्धी आणि स्थानिक उत्पादनांना मिळणाऱ्या बाजारपेठेमुळे काश्मीरची अर्थव्यवस्था अधिक सक्षम होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार क्रीडाक्षेत्राला केवळ स्पर्धात्मक क्षेत्र न मानता, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे साधन म्हणून पाहिले जात आहे. या क्षेत्रासाठीचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणीमधील सातत्यामुळे, लवकरच क्रीडा-अर्थव्यवस्थेचे हे नवे पर्व देशाच्या सर्वांगीण विकासाला भक्कम आधार देईल.

वाहनविक्रीची भरारी

भारतातील वाहनविक्रीत झालेली अलीकडील वाढ, अर्थव्यवस्थेच्या अंतर्प्रवाहातील बदलांचे द्योतक आहे. जानेवारी महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत 13 टक्के, दुचाकी वाहनांत 26 टक्के आणि तीनचाकी वाहनांत 30 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. गेल्या वषच्या 58 हजारम् 167 युनिट्सची झालेली विक्री, यंदा 75 हजार, 725 युनिट्सपर्यंत पोहोचली. ही आकडेवारी ग्राहकांमधील आत्मविश्वास, बाजारातील चलनवाढीवरील नियंत्रण आणि धोरणात्मक हस्तक्षेपांचे परिणाम यांचे द्योतक ठरते. या वाढीमागील पहिला घटक म्हणजे आर्थिक स्थैर्याची जाणीव. गेल्या काही तिमाहींमध्ये महागाईचा दर तुलनेने नियंत्रित राहिल्याने आणि व्याजदरांतील स्थैर्यामुळे, ग्राहकांनी दीर्घकालीन खरेदीचे निर्णय पुढे ढकलण्याऐवजी अमलात आणले. वाहनखरेदी ही भावनिक नसून आर्थिक निर्णय असतो; तो उत्पन्नावरील विश्वास आणि भविष्यातील स्थैर्याच्या अपेक्षांवर आधारलेला असतो. त्यामुळे प्रवासी वाहनविक्रीतील वाढ ही मध्यमवगय आशावादाची खूण आहे.

दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे सरकारी धोरणांचे परिणाम. वाहनांवरील जीएसटी कमी केल्याने, अंतिम ग्राहकांवरील किमतीचा ताण कमी झाला. विशेषतः दुचाकी व लहान प्रवासी वाहनांच्या श्रेणीत या करसवलतींचा अप्रत्यक्ष परिणाम दिसून आला. शिवाय, पायाभूत सुविधांवरील सार्वजनिक गुंतवणुकीमुळेही वाहनांची गरज आणि उपयुक्तताही वाढली. वाहन हे केवळ चैनीचे साधन न राहता, दैनंदिन व्यवहाराचे आवश्यक साधन बनले. दुचाकी विक्रीतील 26 टक्क्यांची वाढ ग्रामीण आणि निमशहरी अर्थव्यवस्थेतील खरेदीक्षमता दर्शवते. कृषी उत्पन्नातील सुधारणा, ग्रामीण रोजगार हमी योजनांचा प्रभाव, तसेच सूक्ष्म वित्तपुरवठ्याची उपलब्धतेमुळे ग्रामीण ग्राहक बाजारात सक्रिय झाले. तीनचाकी विक्रीतील झेपही सेवाक्षेत्रातील हालचालींचे द्योतक म्हणावे लागेल. ई-कॉमर्स वितरण, लघुव्यवसाय, प्रवासी वाहतूक या क्षेत्रांत वाढलेली मागणी यामागे आहे. वाहन उद्योग हा बहुआयामी परिसंस्थेचा केंद्रबिंदू असल्याने, त्यातील वाढीचा प्रतिध्वनी पोलाद, रबर, इलेक्ट्रॉनिक्स, लॉजिस्टिक्स, विमा, बँकिंग अशा अनेक क्षेत्रांत उमटतो. उत्पादनवाढ म्हणजे रोजगारवाढ; रोजगारवाढ म्हणजे क्रयशक्तीवाढ असा सकारात्मक चक्राकार परिणाम यातून दिसतो. एकंदरीत, वाहनविक्रीतील वाढ ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाची खूण आहे.

- कौस्तुभ वीरकर

Powered By Sangraha 9.0