तापलेला हिवाळा

    16-Feb-2026   
Total Views |

समाजाच्या जीवनव्यवहारातून तंटे, वितंडवाद आपण समू़ळ नष्ट करु शकत नाही. किंबहुना, तसे केल्यास स्वर्गलोकीचचे नंदनवन आपण इथेच अनुभवू. परंतु, माणसांचे वेगवेगळे समूह, त्यांच्या धारणा यांमधूनच सातत्याने मानवजातीत विविध संघर्ष जन्माला येतात. काळाच्या ओघात माणसाची भांडण करण्याची क्षमता नुसती वाढलीच नाही, तर बदललीसुद्धा! दगड-धोंड्यापासून, पृथ्वीचा सर्वनाश करण्याऱ्या अणुबॉम्बपर्यंत माणसाने चमत्कारिक प्रगती केली. असे असले तरी, काळाच्या ओघात या संघर्षातून मुक्ती मिळवण्यासाठी समन्वय झाला पाहिजे, असा विचारही अनेकांनी केला. सातासमुद्रापार जाणारी एखादी कला, किमान दोन राष्ट्रांना जोडते. अशाच पद्धतीने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सवांचे आयोजन होते, तेव्हा खेळाप्रति असलेल्या निष्ठेतून एका प्रकारचा सकारात्मक संघर्ष आपल्याला अनुभवायला मिळतो. अशा क्रीडा महोत्सवांच्या संगमातील केंद्रबिंदू म्हणजे ऑलिम्पिक्स. सध्या ईशान्य इटलीमध्ये 2026 हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे. ‌‘मिलानो कोर्तिना 2026‌’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत, दि. 6 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीदरम्यान इटलीच्या अनेक भागांमध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, काही वादग्रस्त घटनांमुळे या क्रीडा महोत्सवाला वेगळेच वळण लागले आहे.

स्केलेटन रेसिंग या स्पर्धेमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या एका विवादास्पद घटनेने, साऱ्यांचेच लक्ष्य वेधून घेतले. युक्रेनचा स्केलेटन रेसर व्लादिस्लाव हेरास्केविच याने त्याच्या हेलमेटवर, रशिया-युक्रेन युद्धात मृत्युमुखी पडलेल्या 24 युक्रेनियन खेळाडू आणि मुलांचे स्मृतिप्रीत्यार्थ फोटो लावले होते. ‌‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती‌’ने याला ‌‘राजकीय‌’ मानून, ‌‘ऑलिम्पिक चार्टर‌’च्या कलमानुसार खेळाडूवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्याला हेलमेट बदलण्यास सांगण्यात आले होते, पण त्याने नकार दिल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. आपल्या राजकीय मतांचे प्रदर्शन केल्यामुळे, या कारवाईला खेळाडूला सामोरं जावं लागलं. युक्रेनचे राष्ट्रपती व्होल्दोमीर झेलेन्सकी यांनी अर्थातच यावर नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “ऑलिम्पिकसारख्या संस्थांनी आक्रमणकर्त्यांच्या कारस्थनाला बळी न पडता, युद्ध थांबवण्याच्या दिशेने प्रयत्न करायला हवे.”

बब्सले, स्केलेटन आणि लुज यांसारख्या खेळांसाठी स्लायडिंग ट्रॅक बांधावा लागतो. हा ट्रॅक बांधण्यासाठी सुमारे 118 दशलक्ष युरो (जवळपास 1 हजार, 100 कोटी रुपये) खर्च करण्यात आला. इतक्या मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी खर्च होतो, तिथे अर्थातच काही समाजघटकांना हा पैशाचा अपव्यय वाटू शकतो, त्याअनुषंगानेही याचा विरोध करण्यात आला. सोबतच, ट्रॅकसाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्षांच्या कत्तलीमुळेही इटली सरकारने चांगलाच रोष ओढावून घेतला आहे. स्की-जम्पिंग या खेळामध्ये विजयी होण्यासाठी, काही खेळाडू सूटच्या मापनात फेरफार करण्यासाठी आणि थोडे मोठे, अधिक वायुगतिकीय सूट मिळवण्यासाठी त्यांच्या जननेंद्रियांमध्ये पॅराफिन किंवा तत्सम इंजेक्शन घेत असल्याचा आरोप करण्यात आला. जर्मनीमध्ये पहिल्यांदाच प्रसिद्ध झालेल्या या अफवांमुळे ‌‘वर्ल्ड ॲण्टी डोपिंग एजन्सी‌’ आणि अनेक संस्था खडबडून जाग्या झाल्या आहेत.

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स आणि त्यांच्या पत्नी उषा यांना ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्यावेळी, लोकांनी ‌‘बू‌’ करून दाम्पत्याचा निषेध नोंदवला. या सगळ्या घटनांमध्ये अगदी हास्यास्पद ठरावी अशी कुठली घटना असेल, तर ती म्हणजे पदकांचं खराब होणं. स्पर्धेच्या पहिल्याच आठवड्यात अनेक दिग्गज खेळाडूंनी त्यांची पदके खराब झाल्याचे समाजमाध्यमांवर दाखवले. अमेरिकेच्या ब्रीझी जॉन्सन यांनी महिलांच्या ‌’डाऊनहिल स्कीईंग‌’मध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर, ब्रीझी आनंदाने उड्या मारत असताना तिचे पदक रिबनमधून निखळून खाली पडले. तिने पत्रकारांना तिचे तुटलेले आणि चिरा पडलेले सुवर्णपदक दाखवले. स्वीडनच्या एबा ॲण्डरसन हिचे रौप्यपदक बर्फात पडले आणि त्याचे दोन तुकडे झाले. आता ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेतसुद्धा अशा गोष्टी घडाव्या, यातून स्थानिक प्रश्नांचे जागतिक महत्त्व लक्षात येते. एकूणच काय, तर वितंडवादाच्या भोवऱ्यात हा तापलेला हिवाळा आपल्या आणखी कुठल्या गोष्टी दाखवणार, याकडे सगळ्यांचं लक्ष्य आहे.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.